অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीला कायमस्वरूपी पाणी

बंधारे उभारणी, ओढ्याची सफाई व रुंदीकरण लोकसहभाग ठरला महत्त्वाचा

राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि शासकीय योजनांचा मिलाफ सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता. खानापूर) येथे झाला आहे. या एकत्रित प्रयत्नांतून बंधारे बांधणे, ओढ्याची सफाई व रुंदीकरण केल्याने गावांतील सुमारे दोनशे हेक्‍टर शेती क्षेत्राला कायमस्वरूपी पाण्याची सोय झाली आहे. बंधाऱ्यातील पाण्याबरोबर विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे.
सांगली जिल्ह्यात विटा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर गार्डी हे दुष्काळी पट्ट्यातले सुमारे चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या या भागातील शेतकऱ्यांना कायम जाणवते. प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष निर्यात करण्यासाठी या गावातील द्राक्षउत्पादक पुढे आहेत. दुष्काळी भाग असूनही कोणत्याही परिस्थितीत द्राक्षपीक यशस्वी करायचे, या उद्देशाने इथला शेतकरी धडपडत असतो.
गार्डी गावातून एक ओढा जातो. मात्र गावाला त्याचा उपयोग जवळपास संपला होता. याचे कारण म्हणजे, त्यावर गाळ आणि इतक्‍या वनस्पती वाढल्या होत्या, की त्या ओढ्याचे अस्तित्वच नाहीसे झाले होते. या ओढ्यातील गाळ काढणे आणि त्यावर बंधारे बांधून पाणी साठविणे, हे केवळ स्वप्नच होऊन राहिले होते. मात्र ग्रामस्थांची जिद्द, राजकीय इच्छाशक्ती व शासकीय योजनेचा सुरेख मिलाफ या गावांत झाला. त्यातून चक्क मे महिन्यातही या गावातील सुमारे दीडशे हेक्‍टरहून अधिक शेतीला शेतीच्या पाण्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा झाला.

विरोधातून उत्कर्षाकडे

गावचा ओढा स्वच्छ करून त्यावर साखळी बंधारे बांधण्याचा निर्णय झाला खरा; मात्र गावातील काही शेतकऱ्यांचा याला विरोध झाला. अनेक दिवसांपासून ओढ्याचे अस्तित्वच जणू नसल्याने, तशीच शेती होत होती. मात्र जलसंधारणाचे कठीण काम झाल्यास गावाला कायमस्वरूपी पाण्याची सोय होणार होती. अनिल बाबर व इतर राजकीय व्यक्तींच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना या कामाच्या महत्त्वाबाबत पटवून देण्यात आले. त्यातून गाळ काढणे व बंधारे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. हा निर्णय झाल्यानंतर ग्रामस्थांनी कामात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.

उन्हाळ्यातही पाणीदार बंधारा

गार्डी गावात तेरा बंधारे आहेत. त्यांपैकी तीन मातीचे आहेत. उरलेले चार बंधारे पाणलोट कामांमधून गेल्या वर्षी उभे राहिले; तर अन्य बंधारे 2003 पासून पन्नास टक्के लोकसहभागातून झाले आहेत. महात्मा फुले जलभूमी अभियानातूनही बंधारे बांधण्यात आले. साखळी पद्धतीचे हे बंधारे असल्याने, गावातील बंधाऱ्याचे पाणी तसेच पुढे सरकत राहते. त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. सध्या पावसाला अद्याप म्हणावी तशी सुरवात नाही. त्यामुळे गावातील अनेक बंधारे कोरडे असले तरी गावातील दोन बंधाऱ्यांत मात्र सध्या पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी जो बंधारा बांधला, त्यात पाणीसाठा आहे. या बंधाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकदम "धो धो' पाऊस पडून बंधाऱ्यात पाणी साठलेले नाही, तर गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये परतीचा पाऊस झाला. या पावसाचे शेजारील जमिनीतून मुरलेले पाणी बंधाऱ्यात साठले. याचा फायदा अद्यापपर्यंत या भागातील काही शेतकऱ्यांना होत आहे. या बंधाऱ्याचे हे यश म्हणावे लागेल.

बंधाऱ्यांमुळे टॅंकरमुक्तीकडे

गावात बंधारे होण्यापूर्वी गावातील विहिरींना फेब्रुवारीपर्यंत पाणी राहत होते. त्यानंतर पाण्याची मोठी चणचण भासायची. टॅंकरने पाणी आणून पिकांना द्यावे लागायचे. आता बंधाऱ्यामुळे सुमारे शंभर विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा झाली आहे. सध्या काही विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली असली तरी, मे महिन्यापर्यंत बंधाऱ्यांच्या शेजारील बहुतांश विहिरींमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात पाण्याचा साठा होता. मे महिन्यापर्यंतची पिकांची गरज यामुळे भागली.

चार हजार वृक्षांची लागवड

बंधाऱ्याच्या शेजारील जमीन खचू नये याकरिता बंधाऱ्याच्या शेजारी सुमारे चार हजार विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून रोपे आणून त्यांची जोपासना करण्यात येत आहे. निलगिरीसह बेट तयार करणाऱ्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे.

द्राक्ष, डाळिंबासह उसाचे क्षेत्र वाढले

गावात ज्या ठिकाणी कूपनलिका विहिरींचे पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी शेती होत होती; परंतु या बंधाऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना पाण्याचा स्त्रोत निर्माण झाला. यामुळे यंदा डाळिंब, द्राक्षे व उसाची शेतीही वाढत आहे, ही मोठी सकारात्मक बाब म्हणावी लागेल. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी साखळी बंधाऱ्याच्या बाजूला आहेत, त्यांना या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा झाला. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यापासून थोड्‌या दूर अंतरावर आहेत, त्यांच्या विहिरींनाही "परकोलेशन'चा फायदा झाला आहे. यामुळे उन्हाळ्यात किमान एक-दोन पाणी तरी पिकांना देता आले, याचे मोठे समाधान गावातील शेतकऱ्यांना आहे.

दोन तासांपर्यंत चालतो विहिरींचा उपसा
बंधारे बांधण्यापूर्वी व ओढ्याची स्वच्छता करण्यापूर्वी उन्हाळ्यात पाणीउपसा पंप एक तासापेक्षा जास्त चालायचे नाहीत. पाणी लगेच संपून जायचे. आता तीन ते चार तासांपर्यंत उपसापंप सुरू राहू शकतात. यामुळे पिकांना चांगले पाणी मिळते. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून उपलब्ध पाणी पिकांना कसे मुबलक प्रमाणात मिळेल, याचे नियोजन यंदा सुरू केले आहे.
प्रत्येक वर्षी उन्हाळा आला की आम्हाला पिकांसाठी टॅंकरची सोय करावी लागे. पाणी कोठून आणायचे, उन्हाळ्यात कोणती पिके घ्यायची, याची चिंता लागून राहत असे. यंदा मात्र ही चिंता बऱ्यापैकी मिटली. ज्या विहिरींचा तळ फेब्रुवारीतच दिसायचा, त्या विहिरींना मेअखेरपर्यंत पाणी उपलब्ध झाले. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून या पाणीसाठ्‌याचा पुरेपूर वापर करून घेतला. हा अप्रत्यक्ष फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला आहे.
- अतुल बाबर, शेतकरी

बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे मला आता शेतीचे चांगले नियोजन करणे शक्‍य झाले आहे. यापूर्वी पुरेसे पाणी नसल्याने उपलब्ध पाण्यात जिरायती शेती व्हायची. यंदा मी डाळिंबबागेसह उसाचीही लागवड केली आहे. ठिबकच्या साह्याने ही शेती आता सोपी होणार आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
-सुशांत रसाळ, शेतकरी

महात्मा फुले जल व भूमिसंधारण अभियानाअंतर्गत सिमेंट नालाबांधामधील गाळ काढणे, आणि नाला सरळीकरण करणे, ही कामे आम्ही गार्डीमध्ये केली. गावात जलसंधारणाची आठ कामे झाली आहेत. यामधून 75891 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे 75 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या एकूण 132 टीएमसी पाणीसाठा गावात आहे. यामुळे जवळपास दोनशे हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीला फायदा झाला आहे.
-रवींद्र कांबळे,
उपविभागीय कृषी अधिकारी, विटा.

बदलते आहे गार्डी गाव

  • पाण्याचा बारमाही स्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न
  • उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर पिकांसाठी करण्याकरिता नियोजन
  • जिरायती पिकांबरोबर ऊस, डाळिंबाचेही क्षेत्र वाढू लागले
  • दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या गावात मे-जूनमध्ये पहिल्यांदाच पाणीसाठा

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate