অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुधारतेय व्हेळ गावातील शेती

शासनाच्या जलसुधार प्रकल्पाने रत्नागिरी जिल्ह्यातील व्हेळ (लांजा) गावातील शेकडो शेतकऱ्यांना आधार देतानाच आर्थिक स्रोत उपलब्ध करून दिले. सन 2008-09 या आर्थिक वर्षात व्हेळ आणि कळवंडे ( ता. चिपळूण) या दोन गावांची या प्रकल्पासाठी निवड झाली. पीकबदल, प्रक्रिया उद्योग, गांडूळखत आदी प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीत बदल करून आर्थिक उन्नती साधणे शक्‍य झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहर वसले आहे. लांज्यापासून वीस किलोमीटर अंतरावर दऱ्या-खोऱ्यामध्ये वसलेल्या व्हेळ गावावर निसर्गाची उधळण झालेली आहे. या गावाच्या मध्यावर व्हेळ धरण आहे. दोन वर्षांपूर्वी या धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, त्यामुळे या वर्षी धरणात चांगला पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाच्या खालील भागात बंधारा घालून पाणी अडविण्यात आले. त्यातील पाणी पाट काढण्यासाठी वापरण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जमीन दुबार पिकाखाली आणण्यात यश आले आहे. भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना महिन्याचे उत्पन्न मिळवणे शक्‍य झाले आहे. या धरणाच्या पाण्यावरच भुईमुगाची देखील यशस्वी लागवड झाली आहे. 

गावात माजी सभापती व वजनदार व्यक्‍ती अशी अनंत लक्ष्मण पळसुले- देसाई यांची ओळख आहे. राजकीय व्यक्‍तिमत्त्व असले तरीही गावात राजकारण येणार नाही याची ते नेहमीच काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्या शब्दाला वजन आहे. जलसुधार प्रकल्पात काम करताना व्हेळचे कृषी सहायक संजय ससाणे यांनी त्यांना हाताशी धरले. त्यामध्ये पळसुले-देसाई यांनी झेंडू, कलिंगड लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुले अतुल आणि अमोल यांची साथ मिळाली. 
कृषी विभागाने जलसुधार प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी पुणे, नगर भागांत अभ्याससहल आयोजित केली होती. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासह बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील महत्त्वाचे कृषी प्रकल्प पाहिल्यानंतर अतुल यांना प्रेरणा मिळाली. वडिलांचे मार्गदर्शन त्यांना होतेच. त्यातूनच स्वतःची जंगल असलेली पाच एकर पडीक जमीन त्यांनी मोकळी केली. शेजारीच विहीर होती. सन 2008-09 या वर्षी दीड एकर जमिनीवर लागवड झालेल्या कलिंगडाचे 15 टनांपर्यंत उत्पादन घेतले. त्यातुन सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न तर दीड लाख रुपये फायदा मिळाला. उर्वरित जमिनीवर काजूची लागवड केली. प्रकल्पाला दीड लाख रुपये अनुदान मिळाले. त्याचा उपयोग बियाणे, ड्रीप यंत्रणा, खते आदींच्या खरेदीसाठी केला. आता या शेतीतून चांगले उत्पादन मिळत आहे. उत्पादित कलिंगडे मुंबई-गोवा महामार्गावर आणि लांजा मार्केटमध्ये विक्रीला ठेवली जातात. 
- अनंत पळसुलेदेसाई - 9422459762


काजू व तेलघाणा प्रकल्प


व्हेळमध्ये अन्वर युसूफ पन्हळेकर यांचे किराणा मालाचे दुकान होते. त्यांच्या बंधूने पूर्वी काजू प्रकल्प उभारला होता. तो पाहिल्यानंतर आपणही काहीतरी करायचे हा उद्देश बाळगून युसूफ प्रयत्नशील होते; परंतु मार्गदर्शन मिळत नव्हते. कृषी विभागाच्या सहकार्याने प्रकल्पांतर्गत त्यांनी काजू युनिट प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. सहा महिने हा व्यवसाय चालतो. युनिटमध्ये सुमारे 30 टन काजूवर प्रक्रिया केली जाते. काजू गर काढून त्याचे "ग्रेडेशन' करून तो मार्केटमध्ये नेला जातो. मुंबई, पुणे मार्केटला काजूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दर्जा असल्यामुळे दरही चांगला म्हणजे पहिल्या प्रतिच्या काजूला प्रति किलो साडेपाचशे रुपये दर मिळतो. दुसऱ्या क्रमांकाच्या काजूला 525, तिसऱ्या क्रमाकांला 500 याप्रमाणे दरांची विभागणी होते. काजू गराचा दर्जा चांगला राहावा यासाठी 10 किलोच्या हवाबंद डब्यात पॅकिंग केले जाते. या व्यवसायात सहा महिने कालावधीत चौदा व्यक्ती कार्यरत असतात. 

काजू युनिटबरोबर अन्वर यांनी तेलघाणा घेतला आहे. एका वेळी दहा किलो शेंगांमधून तेल काढणे शक्‍य होते. गेल्या वर्षी हे युनिट सुरू केले. प्रति किलो सात रुपये दर तेल काढण्यासाठी घेतला जातो. या वर्षी व्हेळ धरणात पाणीसाठा झाल्यामुळे गावात दहा हेक्‍टर क्षेत्रावर भुईमुग क्षेत्र वाढले आहे. तेल काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भुईमूग उपलब्ध होईल, असे अन्वर यांनी स्पष्ट केले. 
- अन्वर पन्हळेकर - 9970566020 

व्हेळचे सरपंच प्रकाश रामाणे आणि उमेश यशवंत पडिलकर यांनी जलसुधार प्रकल्पांतर्गत गांडूळखत प्रकल्प उभारला. त्याला पन्नास टक्‍के अनुदान देण्यात आले. दोन शेड उभारण्यात आली होती. त्यांना एक लाख रुपये अनुदान मिळाले. एका शेडमध्ये चार गांडूळ खत तयार करण्याच्या टाक्‍या आहेत. एका टाकीत सुमारे पाचशे ते 800 किलो खत तयार होते. या प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. गावातील शेतकरी सात रुपये प्रति किलो दराने हे खत खरेदी करतात. पडीलकर यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे. त्यांची दोन एकर शेती आहे. त्यात भाताचे उत्पादन घेतले जाते. रामाणे यांची घराशेजारी चार एकर शेती असून त्यांनी एक एकरात भुईमुगाची लागवड केली आहे. 
उमेश पडीलकर - 855208180


व्हेळ गावात घडतोय पीकबदल


व्हेळ गावात सुमारे 410 कुटुंबे आहेत. प्रत्येकाची शेती आहे. दोन हजार इतकी गावची लोकसंख्या आहे. जलसुधार प्रकल्पानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याची शेती विकसित करण्यासाठी लाभ होत आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र 945 हेक्‍टर आहे. त्यामध्ये 168 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यात भात, नागली, आंबा आणि फळबाग आदींचा समावेश आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यात वाढ झाली असून हे क्षेत्र 268 हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. भुईमूग, मिरची, वांगी, कलिंगड या पिकांतून पीकबदल घडत आहेत. जास्तीत जास्त क्षेत्र शेतीखाली आणण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न सुरू असल्याचे ससाणे यांनी सांगितले. 
गावात उन्हाळ्यात कुळीथ, नाचणी ही पारंपरिक पिके घेतली जायची. जलसुधार प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यांना भुईमूग पिकाचे प्रात्यक्षिक देण्यात आले. भाताचे संकरित बियाणे वापरल्याने श्रीपत अर्जुन शिगम यांना एका गुंठ्यात 78 क्‍विंटल उत्पादन मिळाले. प्रकल्पांतर्गत 20 शेतकऱ्यांची अभ्यास सहल काढण्यात आली. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना झाला. फुलशेती, उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती त्यांना पाहता आली. 
- कृषी सहायक - संजय ससाणे - 9422646710 

जिल्ह्यातील दोन गावांची जलसुधार प्रकल्पांतर्गत निवड केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले; परंतु तीन वर्षांच्या कालावधीनंतर ग्रामस्थांच्या सहकार्यातून प्रकल्प यशस्वी करण्यात यश आले आहे. याचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल यासाठी लवकरच मार्गदर्शन शिबिरे घेणार आहोत. 
- डी. जी. देसाई, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

 

लेखक : राजेश कळंबटे

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate