Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:00:36.985443 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / चुनखडीयुक्त जमिनी
शेअर करा

T3 2019/10/14 07:00:36.989978 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:00:37.014764 GMT+0530

चुनखडीयुक्त जमिनी

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.

आजवर आपण चांगल्या भौतिक दर्जा असलेल्या जमिनीतील अन्नद्रव्यांविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. या लेखामध्ये जमिनी चुनखडीयुक्त होण्याची कारणे जाणू घेऊ.

पिकांना आवश्‍यक असणाऱ्या १६ ते १८ अन्नद्रव्यांच्या पुरवठा करताना जमिनीची भौतिक स्थिती योग्य असली पाहिजे. जमिनीचा सामू (pH), क्षारता (EC), सेंद्रीय कर्ब (C) आणि चुनखडी (CaCO3) प्रमाण योग्य असेल तर पिकाची चांगली वाढ होऊ शकते. मात्र, जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यास पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यामध्ये अडचणी येतात. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.

भारतातील सद्यःस्थिती

 • जगाच्या पाठीवर चुनखडीयुक्त जमिनीचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त असून, मुक्त चुन्याचे प्रमाण जास्तीत जास्त ९५ टक्क्यांपर्यंत आढळले आहे.
 • भारतामध्ये जवळपास २२८.८ दशलक्ष हेक्टर जमीन चुनखडीयुक्त असून, हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ६९.४ टक्के आहे. समशीतोष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये अशा जमिनी हमखास आढळतात. या जमिनीत चुन्याचे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा (५ टक्क्यांपेक्षा) जास्त झाल्यास अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या समस्या निर्माण होतात.
 • महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टी, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथील काही जमिनींचे क्षेत्र वगळता, चुनखडीयुक्त जमिनी सर्वदूर आहेत. मराठवाडा आणि विदर्भामध्ये अशा जमिनीचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.

चुनखडीयुक्त (कॅल्शियम कार्बोनेटयुक्त) जमीन

ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचे (कॅल्शियम कार्बोनेट) सरासरी प्रमाण ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जास्त असते, त्या जमिनीस चुनखडीयुक्त जमीन म्हणतात.

 • चुनखडीयुक्त जमिनी ओळखण्यासाठी जमिनीचा उभा छेद घेऊन त्यावर सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल शिंपडावे. आम्ल शिंपडल्यानंतर जमिनीवर बुडबुड्यासारखा फेस दिसला, तर जमीन चुनखडीयुक्त आहे असे समजावे.
 • ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जमिनीच्या विनिमय क्षमतेपेक्षा अधिक असते, अशा जमिनी चुनखडीयुक्त वर्गामध्ये समाविष्ट होतात.

जमिनीची विनिमय क्षमता

एकूण धन आयन धारण करण्याच्या क्षमतेस जमिनीस विनिमय क्षमता म्हणतात. यामध्ये Ca++, Mg++, Na+, K+, Al+++, H+, Fe++ अशा धन आयनांचा समावेश होतो. चिकण आणि पोयट्याच्या जमिनीची विनिमय क्षमता इतर जमिनीपेक्षा जास्त असते. याउलट वालुकामय जमिनीची विनिमय क्षमता अत्यंत कमी असते.

चुनखडीयुक्त जमीन तयार होण्याची कारणे

 • चुनखडीयुक्त जमिनी नैसर्गिकरीत्या उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आणि वाळवंटी भागात आढळतात.
 • या जमिनी तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतील क्षारांचा निचरा होण्यासाठी लागणारा पाऊस अपुरा पडतो आणि मुक्त चुन्याचा निचरा जमिनीतून न होता तापमान वाढल्यानंतर खालच्या थरातील चुनाही वरच्या थरात येतो.
 • महाराष्ट्रातील जमिनी काळ्या बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. या खडकांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश आणि सोडियमयुक्त खनिजांचे प्रमाण अधिक असते. या खनिजांचे विदारण होऊन मुक्त चुन्याचे प्रमाण वाढते. अशा जमिनीमध्ये वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत मुक्त चुन्याचे प्रमाण वाढते आणि मशागतीमुळे (खोल नांगरणी) खालच्या थरातील चुना वरच्या थरात येतो.
 • जमिनीमध्ये चुनखडी दोन प्रकारची आढळते - १) चुनखडी खडे व २) चुनखडी पावडर. चुनखडी पावडर ही चुनखडी खड्यापेक्षा जास्त क्रियाशील असल्यामुळे जास्त दाहक असते.
 • बऱ्याच वेळा चुन्याचे प्रमाण खालच्या थरात वाढत जाऊन तेथे अत्यंत कठीण चुन्याचा पातळ थर तयार होतो. अशा थरामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते.
 • पाण्यामध्ये जर विद्राव्य चुन्याचे प्रमाण जास्त असेल (उदा. बोअरच्या पाण्यामध्ये जास्त चुना असण्याची शक्यता असते.) आणि ओलितासाठी या पाण्याचा उपयोग केला तर जमिनी चुनखडीयुक्त होतात.
 • जमिनीमध्ये चुन्याचे प्रमाण जर ३ ते ५ टक्क्यांपर्यंत असेल तर अशा जमिनी उत्पादनक्षम असतात आणि या जमिनीमध्ये अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचे प्रश्‍न निर्माण होत नाहीत.
 • जमिनीतील चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतर अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते.

 

डॉ. हरिहर कौसडीकर

स्त्रोत: अग्रोवन

 

 

3.0099009901
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:00:37.367223 GMT+0530

T24 2019/10/14 07:00:37.373699 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:00:36.889526 GMT+0530

T612019/10/14 07:00:36.907777 GMT+0530

T622019/10/14 07:00:36.975744 GMT+0530

T632019/10/14 07:00:36.976504 GMT+0530