অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पनवेल-माथेरान परिसरात जलयुक्त शिवारमुळे फुलले संसार

पनवेल-माथेरान परिसरात जलयुक्त शिवारमुळे फुलले संसार

पनवेल - माथेरान परिसर पावसाळ्यात भटकंतीसाठी अतिशय उत्तम असतो. पनवेल महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण वाहू लागले. त्याच्या बातम्या सर्वत्र दिसू लागल्या. एक आनंद मनात असताना एप्रिल मे महिन्यात या धरणाच्यावर असणाऱ्या गाव आणि वाडीवस्त्यात पाण्याची समस्या होती. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेने या परिसराचा कायापालट झाल्याचे मात्र आता पावसाळ्यात दिसून आले. या भागातल्या एक पत्रकार मित्राने फोनवरून माहिती दिली. आणि तडक जलयुक्त शिवाराची यशस्वी झालेली एक कहाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली.

माथेरानच्या डोंगरापासून खाली गडनदी वाहत जाते. पावसाळ्यात येणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते. या भागात उन्हाळ्यात नेहमी टंचाई जाणवते. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून या भागात एक किलोमीटरवर बंधारे बांधण्याचे निर्णय झाला आणि लगेच कामाला सुरुवात झाली. शासनात एखादा निर्णय झाल्यानंतर तातडीने काम सुरु झाले, याबाबत लोकांमध्ये अविश्वास दिसत होता. जसजसे काम पूर्ण होत होते. तसतसे लोकांची मानसिकता देखील बदलली आणि शासन प्रत्यक्ष लाभार्थ्यांसाठी शाश्वत काम करीत आहे. हे लोकांना दिसून आले.

पनवेलपासून 16 किलोमीटर अंतरावर डोंगर दऱ्यातून गाडी निघाली. या भागात 4 हजाराच्या जवळपास लोकवस्ती विखुरलेली आहे. आदिवासी बहूल असणारं धोधानी परिसर म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेली वस्ती. या भागात मालगुंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालगुंडे, धोधानी, देहरंग, धामणी या गावांचा समावेश होतो. हौशाचीवाडी, ताडपट्टी, सतीचीवाडी, टावरवाडी, चिंचवाडी, वाघाचीवाडी, बापदेववाडी, कोंडीचीवाडी असा परिसर या क्षेत्रात आहे. एप्रिलनंतर पावसाळा येईपर्यंत या भागातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दरवर्षी पाणीटंचाईने या भागातील लोक त्रस्त झाले आहेत. जलयुक्त शिवारामुळे आता या बंधाऱ्यात 8 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून बंधारे भरून वाहत आहेत. परिसरातले नैसर्गिक झरे पुन्हा पाण्याने वाहू लागले आहे.

जलयुक्त शिवारामुळे या भागात भाजीपाला लागवड वाढली आहे. आदिवासी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात पाण्याची टंचाई देखील जाणवणार नाही. जलयुक्त शिवाराच्या या भागातील छोट्या प्रयोगांमुळे मोठा लाभ परिसराला तात्काळ दिसून आला आहे. तेथील एक स्थानिक सहज म्हणाला, "जलयुक्त शिवारामुळे आमचा संसार फुलायला लागला!"

या भागात शेती करणारे लोक आता नगदी पिकाकडे वळले आहेत. पावसाच्या सुरुवातीलाच भाजीपाला आणि वेलीवर्गीय पिके घेऊन नजीकच्या बाजाराच्या ठिकाणी घेऊन विकायला लागले आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याला सहानुभूती नको तर गरज आहे विकासाच्या संधी देण्याची. जलयुक्त शिवारामुळे शासनाने या भागात ही संधी उपलब्ध करून दिली आणि शाश्वत शेतीचा विकास लगेचच पाहायला मिळाला. जिल्हा कृषी कार्यालय आणि परिसरातील लोकसहभाग यामुळेच ही किमया दिसून आली.

- राजेंद्र मोहिते

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate