অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोधवडे जलस्वयंपूर्ण

शेजारील अन्य गावांनाही पुरवले पाणी

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा माण तालुक्‍याला बसतात. सध्या या तालुक्‍यातील अन्य गावांना पाणीटंचाई भासत असताना लोधवडे गाव मात्र या परिस्थितीला अपवाद आहे. गावात लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे गावात चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना बागायती शेती करणे शक्‍य होत आहे. पाण्याबाबत स्वंयपूर्ण होऊन अन्य गावांनाही पाणी पुरविण्याचे आदर्श काम लोधवडे गावाकडून झाले आहे.
सातारा जिल्ह्यात सातारा-पंढरपूर रस्त्यावर गोंदवलेपासून चार ते पाच किलोमीटरवर लोधवडे गाव आहे. गावाची साधारणपणे दोन हजार लोकसंख्या आहे. सन 1993-94 मध्ये हे गाव आदर्श गाव या योजनेत सहभागी झाले. गावाने नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, चराईबंदी असा कार्यक्रम राबविला. लोकसहभागाच्या जोरावर राज्य शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात तिसरा, निर्मलग्राम व राष्ट्रीय ग्राम स्वच्छता अभियानात पहिला पुरस्कार मिळवला. पुरस्कार मिळवत असताना दुष्काळामुळे शेती तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती.

जलसंधारणाबाबत जागरूकता

कायमची दुष्काळमुक्ती करण्यासाठी जलसंधारणाची कामे केली पाहिजेत, याबाबत लोधवडे ग्रामस्थांत जागरूकता निर्माण झाली. या गावाचे सुपुत्र व माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा घेण्यात आली. पाण्याबाबत स्वंयपूर्ण होणे, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम शिक्षण, अशी अनेक उद्दिष्ट्ये त्यात ठरविण्यात आली. जलसंधारणातून विकास साधण्याबाबत ग्रामस्थांत आत्मविश्‍वास दृढ झाला. शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी श्रमदान करून लोकसहभाग दाखवला. ग्रामसभेत पाणलोट समिती स्थापन करण्यात आली. या समितीवर दिलीप चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच दरम्यान इंडो-जर्मन प्रकल्पाचे फादर रॉबर्ट डिकोस्टा यांनी गावाला दिलेली भेट दिशादर्शक ठरली. ग्रामस्थांमधील एकजूट व श्रमाची तयारी लक्षात घेऊन पुणे येथील सर्वांगीण व अधिवासी विकास संस्थेच्या माध्यमातून स्वित्झर्लंडमधील रोनाल्ड फुटिंग यांनीही गावाच्या विकासाला हातभार लावला.

पाणलोटाचे काम तीन विभागांत

पाणलोट समितीचे गतिमान पाणलोट, नंदनवन व हरियाली पाणलोट असे तीन विभाग करून कामांना सुरवात करण्यात आली. यामध्ये सलग समतल चर, बांधबंदिस्ती, उताराला आडवी पेरणी, बांधावर गवत लागवड, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे बंधारे याप्रमाणे कामे करण्यात आली. यामुळे पडणारा पावसाचा थेंबन्‌ थेंब जमिनीत मुरला जात आहे. या पाणलोटामुळे एकट्या लोधवड्यात 40 कोटी 93 लाख लिटर पाणीसाठा तयार झाला. या गावाने अन्य गावांसाठीही पाणीपुरवठा केला. गावच्या विकासासाठी विद्यमान सरपंच सुजाता माने, उपसरपंच दादासो माने, दिलीप चव्हाण, विजय घोलप जर्नादन मेढ यांनी परिश्रम घेतले.

लोधवड्यात पाणलोटातून झालेली महत्त्वाची कामे

1) एक मीटर रुंद व एक मीटर खोल चर काढण्यात आले.
2) सलग समतल चरांचेही काम झाले.
3) 495 हेक्‍टर क्षेत्रात बांधबदिस्ती करण्यात आली.
4) तीन गॅबियन पद्धतीचे बंधारे बांधले.
5) एक तलाव, दोन पाझर तलाव उभारले.
6) दगडी बांध 60 तर 28 माती नाला बांध उभारण्यात आले.
7) एकाच ओढ्यावर 12 सिमेंट बंधारे बांधले.
8) एक भूमिगत बंधारा उभारला.

लोधवडे गावातील विकासकामांची काही वैशिष्ट्ये

  • फक्त पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल घेण्यास परवानगी दिली जाते.
  • सन 1993 पासून ते आजपर्यंत गावपरिसरात सुमारे 32 हजार रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली. रोपे जगविण्याचाही तेवढाच प्रयत्न होत आहे.
  • पाणलोटाच्या कामांमुळे गावपरिसरातील 602 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले.
  • गावात सध्या 400 एकर क्षेत्र ऊसाखाली आहे.
  • पूर्वी गावात अवघे 300 लिटरपर्यंत दूध उत्पादन व्हायचे. आता त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
  • ऊस व केळी पिकासाठी पाणी जास्त लागत असल्याने ठिबक किंवा स्प्रिंकलरबाबत प्रबोधन करून ठिबक सिंचनाच्या क्षेत्रात वाढ केली.
  • ठिबक व स्प्रिंकलर सिंचनासाठी शासनाचा 50 टक्के, ग्रामपंचायत 25 टक्के तसेच संबधित शेतकऱ्यांचा 25 टक्के हिस्सा या पद्धतीने रचना केली. या कामातून पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. आतापर्यंत सूक्ष्मसिंचन पद्धतीच्या शंभर संचांचे वाटप करण्यात आले आहे.
  • लोधवडे गावातील पाणलोट कामांमुळे शेजारील गोंदवले, पिंपरी या गावांच्या पाणापातळीत वाढ झाली.

दुष्काळात इतरांना पाणी देणारे गाव

लोधवडे गावात 2003 पर्यंत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाणलोटाची कामे झाल्यानंतर जो पाऊस झाला त्यामुळे विहिराच्या पाणीपातळीत वाढ झाली. मागील तीन वर्षांत सर्वच तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. मात्र लोधवड्यात पाणलोटामुळे मुबलक पाणी होते. या गावातील विहिरींची पाणीपातळी चांगली होती. येथून दुष्काळात अडीच हजार टॅंकर पाणी दुष्काळी गावांना देण्यात आले. आजही विहिरीतील पाणीपातळी चांगली आहे. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

कोणतीही योजना असली तरी लोधवड्यातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन काम करतात, त्यामुळे सर्व योजना यशस्वी होतात, असा अनुभव आम्हाला आहे. पाण्याबाबतच्या सर्व नियमांचे पालन होते. त्यामुळे पाण्याचा पुरेपूर वापर करण्याबरोबर गावात बागायती क्षेत्रातही वाढ झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक ग्रामस्थांना उदरनिर्वाहासाठी शहराचा रस्ता धरावा लागला होता. मात्र पाण्याच्या उपलब्धतेमुळे अनेक जण माघारी येऊन उत्तम शेती करत आपले जीवन समाधानाने जगत आहेत.
दिलीप चव्हाण, पाणलोट समिती अध्यक्ष.

शेतीत प्रगती करण्याची मोठी इच्छा आहे. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोअरवेलही घेतल्या होत्या. मात्र पाणी पुरत नसल्यामुळे शेतीत मर्यादा येत होत्या. समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. पाणलोटाची कामे झाल्यापासून विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बारमाही पिके घेणे शक्‍य झाले आहे. माझ्याकडे तीन एकर ऊस असून, गावात चारशे एकरांवर उसाचे क्षेत्र गेले आहे.
भगवान माने, शेतकरी.

मी 2007 पासून डाळिंब पीक घेण्यास सुरवात केली. सुरवातीस पाणी कमी असल्यामुळे हे क्षेत्र कमी होते. जसजशी पाण्याची उपलब्धता वाढत गेली तसतसे डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ करणे शक्‍य झाले. पाणलोटाच्या कामांमळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. सध्या अकरा एकर डाळिंबाची बाग असून, सर्व बागेला पाणीपुरवठा होत आहे.
अनिल त्रिंबके, शेतकरी.

दिलीप चव्हाण - 9922643574.
अध्यक्ष, पाणलोट समिती, लोधवडे

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate