অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणलोट - विकासाची गंगा

पाणलोट - विकासाची गंगा

सुंदरवाडी (जि. औरंगाबाद) झटली "स्वतःचा विकास स्वतः करायचा' या भावनेने...
दुर्गम डोंगरदऱ्यात वसलेल्या, विकासापासून कोसो दूर असलेल्या, धड रस्ता नसलेल्या आणि ऊसतोडणी कामगारांच्या सुंदरवाडी (ता.पैठण, जि. औरंगाबाद) गावाने गावशिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी धडपड केली. त्याची ही यशकथा.

औरंगाबाद-बीड रस्त्यावरील आडूळ गावापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर 65 उंबरे असलेले सुंदरवाडी ता. पहे गाव. चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले. गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. अद्यापही गावाने एसटी बघितलेली नाही. दुर्गम असल्याने शासकीय अधिकाऱ्यांसह कोणतीही शासकीय योजना नेहमी गावापासून दूर राहिलेली. त्यात गावामध्ये बहुतांश कुटुंबे ही बंजारा समाजाची आहेत. शिक्षणाचे प्रमाण कमी, जोडीला आर्थिक उत्पन्न बेताचेच. प्रत्येकाकडे सरासरी शेतजमीन 3 ते 4 एकर आहे. बहुतांश शेती जिरायती असून, बाजरी, कुळीथ, मूग, तूर अशी पिके घेतली जात. तसेच पोटासाठी ऊसतोडीसाठी गावापासून सहा- सहा महिने दूर राहावे लागे. त्यातून मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडे. पाणी नाही, म्हणून शेती पिकत नाही; शेती नाही म्हणून ऊसतोडीसाठी मजुरी, त्यातून मुलांच्या शिक्षणामध्ये खंड , शिक्षण थांबल्याने पुढील पिढीही पुन्हा मजुरीमध्ये ... असे दुर्गतीचे चक्र गेल्या कित्येक पिढ्यांपासून तसेच सुरू.

पिण्याच्या पाण्यासाठीही होती वणवण...

गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी असल्या तरी उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नसे. गावापर्यंत रस्ता नसल्याने पाण्याचा टॅंकर आठवड्यातून एकदा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका खड्ड्यामध्ये खाली केला जाई. तिथून पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणावे लागे.

अशी झाली पाणलोटाच्या कामाला सुरवात...

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) आणि संजीवनी इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉव्हरमेंट अँड डेव्हलपमेंट या संस्थेने या गावामध्ये पाणलोटाचे काम करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांशी बोलून पाणी अडवण्याचे महत्त्व समजावून सांगण्याला प्रारंभ केला. त्यामुळे सुरवातीला गावकऱ्यांमध्ये आपल्या जमिनी हे लोक घेतील, सातबारावर काहीतरी बोजा चढेल, अशा भीती होती. त्यामुळे ते माघार घेऊ लागले. मात्र, संस्थेने याआधी पाणलोटाचे काम केलेल्या गावामध्ये भेटी आयोजित केल्यावर, तिथल्या गावकऱ्यांशी बोलल्यानंतर हळूहळू त्यांच्या मनातील कुशंका मिटत गेल्या. गावकरी एकत्र आल्यावर "गावाचा विकास करण्यासाठी कुणी येणार नाही, स्वतःचा विकास स्वतःच करायचा' या सूत्रांवर आधारित कामकाजाला सुरवात केली.

माथा ते पायथा पाणलोटाच्या कामाचे व्यवस्थापन

  • गाव चहू बाजूंनी डोंगराने वेढलेले असून, पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी माथ्यापासून सलग समपातळी चर खोदण्यात आले. तिथे चरालगत निम, सुबाभूळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ यांसारख्या काटक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 120 हेक्‍टर सरकारी वनजमिनीवर वृक्षारोपण केले.
  • लावलेली रोप जगविण्याकरिता झाडे मोठी होईपर्यंत गावामध्ये चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदी करण्यात आली.
  • पाण्याचे ओहोळ, प्रवाह यांच्यावर मातीचे, दगडांचे 80 बांध बांधण्यात आले. मोठ्या नाल्यावर पाच सिमेंट बंधारे बांधण्यात आले.
  • गावातील सुमारे 180 हेक्‍टर क्षेत्रामध्ये शेतांची बांधबंदिस्ती करण्यात आली. प्रत्येक शेतामध्ये 10 मीटर बाय 10 मीटर आकाराची शेततळी बांधण्यात आली.
  • गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर असून, 20 हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. या विहिरीमध्ये सध्या भरपूर पाणी असून, 15 मेपर्यंत पुरेल. त्यानंतर कायमस्वरूपी उन्हाळ्यातील पाण्यासाठी तजवीज म्हणून 20 मीटर बाय 20 मीटर आकाराचे प्लॅस्टिक आच्छादन असलेले शेततळे बांधण्यात आले.
  • पाणलोटाच्या कामातून गावामध्ये पाण्याची उपलब्धता वाढली असून, शेतकरी खरीप आणि रब्बी पिके घेऊ लागले आहेत. या गावामध्ये गहू पीक याआधी कुणीही केले नव्हते. तेही आता होऊ लागले. शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू लागल्याने मजुरीसाठी फिरणे कमी झाले. ऊसतोडीसाठी स्थलांतर थांबले आहे.
  • गावामधील चौथीपर्यंत शाळा आता पूर्ण क्षमतेने चालू असून, पुढील शिक्षणासाठी गावातील 12 मुले वसतिगृहामध्ये बाहेरगावी राहत आहेत. शिक्षणाच्या वाटेने किमान पुढील पिढी तरी या दुर्गतीतून बाहेर पडणार, याचा गावकऱ्यांना विश्‍वास वाटत आहे. त्यांचा आत्मविश्‍वास वाढण्यास मदत झाली.

ग्रामस्थांची एकी

पाऊस प्रत्येक वर्षी मुबलक पडून तो अडवण्यात आम्ही कमी पडत असल्याने, गावात कायम पाणीटंचाई असायची. आज सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावात जलक्रांती झाली आहे.
- कंवरसिंग पांडुरंग राठोड, 8975023886.

दुष्काळातही घेता आले कांद्याचे पीक

पाणी असले की शेती चांगली होते. मागील वर्षी दुष्काळ असतानाही गावामध्ये पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता होती. त्यामुळे मला कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले आहे. गावातील काही शेतकऱ्यांनी आता डाळिंबाचीही लागवड केली आहे.
- देवीदास गोटीराम राठोड, 8390314590.

समितीतर्फे पाण्याचा जागर

पाणी वाढले, त्याचे नियोजन व काटकसरीने वापर होण्यासाठी राणी लक्ष्मीबाई पाणलोट महिला समितीची स्थापना केली आहे. समितीतर्फे पाणीवापर योग्य पद्धतीने होण्यासाठी सुंदरवाडीसह परिसरातील दुर्गम गावांमध्ये जाऊनही या संदर्भात बैठका घेतल्या जातात. पारुबाई मोहन राठोड, अध्यक्ष, राणी लक्ष्मीबाई पाणलोट महिला समिती. 8806150951.

पिण्याच्या पाण्याचे नियोजन

गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. यंदा एप्रिल महिन्यातही विहीर तुडुंब भरलेली आहे. पिण्यासाठी पाणीटंचाई भासू नये म्हणून 20 मीटर बाय 20 मीटर आकाराचे प्लॅस्टिकचे शेततळे तयार केले. पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी थर्माकोलचे शीट व रसायनाचा वापर केला आहे. ओंकार काळू राठोड.

एकमेकांना साथ...

मी भूमिहीन असून, कमाईचे कुठलेही साधन नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मला त्यांच्या जमिनीतील काही भाग दिला. त्यात भाजीपाला लावला असून, त्यावर उदरनिर्वाह करीत आहे. माझ्या मुलींच्या लग्नांसाठीही ग्रामस्थांनी वर्गणी काढून मोठी मदत केली आहे. दादाराव निसर्ग.

जलसाक्षरतेसाठी पथनाट्ये...

सुंदरवाडी येथे भूजल नियोजन कार्यक्रमाच्या माध्यमातून भूजल मंडळे स्थापन केली. या भूजलमंडळातील कलापथकांनी सुंदरवाडीसोबतच भूजल नियोजनाचा मुद्दा परिसरातील अनेक गावांत पथनाट्याच्या माध्यमातून पोचवला. आदिवासी, दुर्गम भागातील ग्रामस्थ जलसाक्षर करण्याच्या हेतूने "वॉटर' संस्था काम करीत आहे.
- ईश्‍वर काळे, संशोधन असोसिएट, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर)

मागील दुष्काळात कचनेर परिसरातील पाच तांड्यांवर पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबवून तांडे पाणीटंचाईपासून मुक्त केले. आता सुंदरवाडी येथे पाणलोट कामातून पाणी साठले असून, शेतीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. काही शेतकऱ्यांना डाळिंबाची रोपे पुरवण्यात आली आहेत. जे. आर. पवार - कार्यकारी संचालक, संजीवनी इन्स्टिट्यूट ("सीड')

महत्त्वाचे मुद्दे...

  • शेतीचे क्षेत्रफळ 375 हेक्‍टर
  • गावची लोकसंख्या 350
  • गावकऱ्यांच्या एकमुखी विचाराने झाली जलक्रांती
  • मुरमाड जमिनीवर आले भरदार पीक
  • गटशेतीच्या पद्धतीने शेत मालाची विक्री
  • शेततळ्याच्या माध्यमातून पाणीबचतीचा अनोखा उपक्रम

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate