Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 10:08:1.488688 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / रब्बी फुलला, शेतकरी आनंदला
शेअर करा

T3 2019/05/20 10:08:1.493500 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 10:08:1.517602 GMT+0530

रब्बी फुलला, शेतकरी आनंदला

दुष्काळाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या माण तालुक्‍यात (जि. सातारा) किरकसाल हे गाव आहे.

दुष्काळाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या माण तालुक्‍यात (जि. सातारा) किरकसाल हे गाव आहे. गावातील भीषण पाणीसमस्या दूर करण्यासाठी जुने बंधारे गावकऱ्यांचे श्रमदान व लोकवर्गणीतून दुरुस्त करण्यात आले. या वर्षीच्या तीव्र दुष्काळातही पिके हाती राखण्यात येथील गावकऱ्यांना यश मिळाले आहे, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे.

कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त माण तालुक्‍यात किरकसाल गाव डोंगराळ भागात वसले आहे. श्री क्षेत्र गोंदवले बुद्रुकपासून दक्षिण बाजूस पाच किलोमीटर अंतरावरील या गावची लोकसंख्या सुमारे एक हजार 581 असून, एकूण क्षेत्र एक हजार आठशे हेक्‍टर आहे. खरिपात बाजरी, कांदा, मका, कडधान्य पिके; तर रब्बी हंगामात ज्वारी, कांदा, गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. उन्हाळ्यात डाळिंबाच्या बागा शेतकरी टॅंकरच्या पाण्यावर जगवतात.जनजागृती व कामांची आखणी

गावच्या एकूण क्षेत्रात तीन सूक्ष्म पाणलोट असून, या क्षेत्रांत तीन ओढे वाहतात. ओढ्यांवर सिमेंट व कोल्हापूर पद्धतीचे एकूण नऊ बंधारे, पैकी चार कोल्हापूर पद्धतीचे आहेत. या बंधाऱ्यांची पाणीसाठवण क्षमता अंदाजे 15 ते 20 लाख लिटर आहे. बंधाऱ्यांचे बांधकाम सन 2000 पूर्वी करण्यात आले; परंतु त्यातून पाण्याची गळती जास्त प्रमाणात सुरू होती. दुष्काळ तीव्र झाल्याने ग्रामस्थ शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीही चिंताग्रस्त होते. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनी पुढाकार घेऊन या शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवला. त्यांनी गावातील बांधकाम अभियंता अमोल काटकर यांच्या सहकार्याने ग्रामसभा घेतल्या. यापुढे पाणी अडविण्यासाठी जे प्रयोग करता येतील ते सर्व करायचे, असे त्यात ठरले. त्यानंतर कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे दुरुस्त करण्याचे निश्‍चित झाले. त्यात गावाशेजारून वाहणाऱ्या ओढ्यावरील खटकळी व नरसिंगमळा येथील जागा (साइट) निवडण्यात आली. दुरुस्तीकामात महत्त्वाचा प्रश्‍न होता निधीचा, तो प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते डॉ. भास्कर यादव यांनी सोडवला. बंधारा दुरुस्तीनंतर होणारे फायदेही शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यानंतर लोकसहभागातून जुलै 2012 मध्ये कामास प्रारंभ झाला. 

असा राबवला कार्यक्रम

1) कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची पूर्णतः दुरवस्था झाली होती. बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे गंज लागून सडले होते. अनेक ठिकाणी गळत्या होत्या. नरसिंग मळा येथील बंधारा दुरुस्तीचे काम सुरू झाले. बंधारा दुरुस्तीच्या बांधकामासाठी माजी सरपंच हणमंत काटकर यांनी पाणी उपलब्ध करून दिले, वस्तीवरील ग्रामस्थांनी श्रमदान केले, त्यामुळे दुरुस्तीसाठी केवळ 21 हजार रुपये खर्च आला. 

2) खटकळी येथील बंधारा दुरुस्ती बांधकामासाठी डाळिंब बागायतदार विनायक काटकर व ट्रॅक्‍टर मालक संतोष जाधव यांनी पाणी उपलब्ध करून दिले. बंधारा परिसरात शेती असणाऱ्यांनी श्रमदान केले, त्यामुळे बंधारा केवळ 27 हजार रुपये खर्चात दुरुस्त झाला. यामध्ये निवृत्त अधीक्षक अभियंता ए. आर. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. बंधाऱ्याच्या जुन्या बांधकामाचे "गॅप' भरण्यात आले. नरसिंग मळ्याच्या बंधाऱ्याला दोन गेट होते. ते बंद करण्यात आले. खटकळी बंधाऱ्याचेही चार गेट बंद करण्यात आले. 

कामांची झाली अशी फलश्रुती

- ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या 150 मिलिमीटर पावसामुळे बंधारे तुडुंब भरले. 
- त्यामुळे बंधाऱ्याखालील विहिरींना व बोअरवेलना पाण्याच्या पाझराचे प्रमाण वाढले. 
- लोकसहभागातून बंधाऱ्यांची दुरुस्ती झाल्याने भीषण दुष्काळातही परिसरातील विहिरींना मार्च 2013 पर्यंत पाणी उपलब्ध झाले. 
- शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक हाती लागले. 
- जनावरांचा चारा व अन्नधान्याचा प्रश्‍न काही प्रमाणात कमी झाला. 
- सन 2012 मध्ये डाळिंब व द्राक्ष बागेसाठी टॅंकरने पाणी पुरवावे लागत होते. कामे झाल्यानंतर मात्र बागायतदारांना मार्च 2013 पर्यंत टॅंकरची गरज भासली नाही. 

जिल्हा परिषद, कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यांना भेटी देऊन कामांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे माढा मतदारसंघातील स्वीय सहायक हेमंत देशमुख यांनी दोन सिमेंट बंधाऱ्यांसाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या बंधाऱ्यांचा फायदा येत्या पावसाळ्यानंतर होणार आहे. 

छतावरचे पाणी सोडून बोअरवेलचे झाले पुनरुज्जीवन....

डॉ. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली किरकसाल गावात गेल्या वर्षी आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली गेली, ती म्हणजे माध्यमिक शाळेच्या छतावरील पाणी एकत्रित करून ते बोअरवेलमध्ये सोडून पाण्याचा स्रोत वाढविण्यात आला. 

शाळेसमोरील बोअरवेलला गेल्या दोन वर्षांपासून अजिबात पाणी नव्हते. भूजल वैज्ञानिक श्री. मोहोटकर व पृथ्वी संग्राम संस्थेचे दादासाहेब यादव यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली संपूर्ण शाळेस पन्हाळी बसवून (पाइपलाइन) ती बोअरवेलजवळ आणली. त्याशेजारी खड्डा खोदून तो दगड, खड्यांनी भरायचा; शाळेच्या छतावरील पाणी संकलित करून बोअरवेल शेजारील खड्ड्यात ते सोडायचे, असे नियोजन केले; परंतु बोअरवेल असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात काळा पाषाण असल्याने पाणी मुरविण्याची प्रक्रिया होणार नाही, हे लक्षात आल्यावर बोअरवेलशेजारी आणखी दोन बोअरवेल खोदण्यात आल्या. जोपर्यंत पाणी लागत नाही, तोपर्यंत खोदाई केली. केसिंग पाइप छिद्रे पाडून बसवली. त्यानंतर खड्डा दगड व वाळूच्या साहाय्याने भरला. प्रयोगाचा परिणाम असा झाला, की दोन मोठ्या पावसांनंतर एक हापसा मारल्यानंतरही लगेच पाणी येऊ लागले. गावात आता आदर्श गाव योजनेचे काम सुरू झाले आहे. 

खटकळी येथील बंधारा दुरुस्तीच्या कामानंतर माझ्या शेतातील विहिरीची पाणी पातळी वाढली, त्यामुळे बागेला यंदा टॅंकरची गरज भासली नाही. सर्व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी उपलब्ध केल्यास शेतीसाठी चांगले पाणी उपलब्ध होईल.
विनायक काटकर (डाळिंब बागायतदार) 

बंधारे दुरुस्तीमुळे माझ्या विहिरीची पाणी पातळी वाढलीच, शिवाय अन्य शिवारात डाळिंब बागेसाठी पाणी बंधाऱ्याखालच्या विहिरीतून उपलब्ध झाले, त्यामुळे पाण्यावरील खर्च काही प्रमाणात वाचला. शासनाने प्रत्येक गावात, प्रत्येक ओढ्यावर सिमेंट बंधाऱ्यांची साखळी निर्माण केल्यास दुष्काळाला प्रत्येक वेळी सामोरे जावे लागणार नाही. 
उद्धव काटकर, शेतकरी, किरकसाल 


संपर्क - अमोल काटकर - 9822815740

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

2.9347826087
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 10:08:1.872246 GMT+0530

T24 2019/05/20 10:08:1.878946 GMT+0530
Back to top

T12019/05/20 10:08:1.391035 GMT+0530

T612019/05/20 10:08:1.408370 GMT+0530

T622019/05/20 10:08:1.478175 GMT+0530

T632019/05/20 10:08:1.479110 GMT+0530