অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केली पाणीटंचाईवर मात

लोकवर्गणीतून करजगावने राबविले जलसंधारणाचे उपाय

पाच वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या करजगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील ग्रामस्थांनी गावाजवळच्या डोंगरपट्ट्यातून उगम पावणाऱ्या नाथ नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले. त्यामुळे पाणी नदीपात्रात थांबले. त्याचबरोबरीने गावातील नाल्याचे खोलीकरणही करण्यात आले.यामुळे शेतशिवारातील पाणी पातळी वाढली. आजही दुष्काळी परिस्थितीत विहिरींतील पाणी पातळी टिकून आहे.

चाळीसगाव शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर करजगाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार दोनशे, शेती हाच मुख्य व्यवसाय. या गावातील जवळपास प्रत्येक घरातील कोणी ना कोणी शासकीय सेवेत नोकरीला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असली तरी ग्रामस्थांचा पाणीप्रश्‍न मात्र गंभीर होता. सन 2004 ते 2007 या काळात दुष्काळी परिस्थिती होती. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींशिवाय दुसरा स्रोत नव्हता. दुष्काळामुळे विहिरी आटल्यामुळे पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली. त्यामुळे ग्रामस्थांना जवळच्या घोडेगाववरून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. गावातील पाणीटंचाईची दखल घेऊन शासनाने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र विविध उपाययोजना करूनही गावातील पाणीटंचाई दूर होत नव्हती. या काळात गावातील दोन मुख्य विहिरींनीही तळ गाठला होता. गावाचा पाणीप्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी भूगर्भातील जलसाठा वाढविणे महत्त्वाचे होते. या दृष्टीने ग्रामस्थांनी उपाय शोधण्यास सुरवात केली.

बंधारा, नाला खोलीकरणामुळे जिरले पाणी


गावाजवळच्या डोंगरातून पावसाळ्यात नाथ नदीला पाणी यायचे, मात्र ते वाहून जात असल्याने या पाण्याचा करजगाववासीयांना पाहिजे तसा फायदाच होत नव्हता. करजगावचे पंचायत समितीचे तत्कालीन सदस्य (कै.) शरद साबळे यांनी शासनासह ग्रामस्थांच्या सहकार्याने नाथ नदीचे पाणी नाल्याच्या माध्यमातून गावाकडे वळविले. या पाण्याचा करजगावच नव्हे, तर जवळच्या घोडेगाव, शिंदी ग्रामस्थांनाही फायदा होऊ लागला. गावातील नाल्यामध्ये पाणी आल्यामुळे परिसरातील जलपातळी वाढण्यास मदत झाली. मात्र उन्हाळ्यात पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण होत होता. त्यामुळे (कै.) शरद साबळे यांनी पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करुन डोंगरपट्ट्यातील नाथ नदीवर ठिकठिकाणी सिमेंटचे बांध बांधले. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर राजदेहरे शिवारातील नदीपात्रात होती. बंधाऱ्यामुळे पावसाळ्याचे पाणी नदीमध्ये टिकून राहिल्याने आपोआप विहिरींमध्ये पाण्याचा झिरपा वाढला. यामुळे ग्रामस्थांची पाणीसमस्या काही प्रमाणात कमी झाली. नदीपात्रात ठिकठिकाणी बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांमुळे घोडेगाव शिवारातील विहिरींचीही पाणी पातळी वाढली. यादरम्यान करजगावचा शासनाच्या भारत निर्माण योजनेत समावेश झाला. या योजनेतून 25 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व विहिरीपासून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली.

जलसंधारणाच्या कामामुळे गावातील दोन्ही मोठ्या विहिरींतही पाणी अजूनही टिकून आहे. एप्रिलपासूनच गावात पाण्याचे टॅंकर सुरू व्हायचे तेथे सध्याच्या काळात एकही पाऊस झाला नसतानाही विहिरीत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतर्फे एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. सध्या गावातील दोन्ही मुख्य विहिरींसह इतर लहान-मोठ्या विहिरींचे पाणी टिकून आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला तर भविष्यात पाणीटंचाई उद्‌भवणार नाही, असा विश्‍वास ग्रामस्थांना आहे.

लोकवर्गणीतून नाला खोलीकरण

1) करजगावचा पाणीप्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी गावातील नाल्यावरील बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि खोलीकरण करणे महत्त्वाचे होते.
2) "शिरपूर पॅटर्न' राबविणारे सुरेश खानापूरकर यांनी या ठिकाणी भेट दिली असता, नाल्यांच्या खोलीकरणाने गावाचा कसा कायापालट होऊ शकतो, हे ग्रामस्थांना पटवून दिले.
3) नाला खोलीकरणासाठी अंदाजे दोन कोटी रुपये निधीची गरज होती. शासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा मिळणे शक्‍य नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून हे काम करण्याचा निर्धार केला. 2013 मध्ये नाल्याच्या खोलीकरणाचे काम करण्यात आले.
4) गावातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीमध्ये तीन हजारांपासून ते अगदी पंचवीस हजार हजारांपर्यंत रक्कम जमा केली. तत्कालीन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी शासनाकडून या सर्व कामांसाठी सात लाख रुपये उपलब्ध करून दिले. लोकवर्गणीतून जमलेले सुमारे आठ लाख आणि शासनाचे सात लाख अशा 15 लाख रुपयांतून सुमारे साडेचार किलोमीटरच्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. याचबरोबरीने नाल्यातील सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली.कृषी विभागाने नाल्याच्या खोलीकरणाच्या मोजमापासाठी सहकार्य केले.

5) खोलीकरण, बंधारे दुरुस्तीमुळे नाल्यामध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला. भूगर्भातील पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाली.

पीक पद्धती बदलली

नाल्यालगतचे शेतकरी पारंपरिक पद्धतीने ज्वारी, बाजरीचे पीक घेत होते. नाल्याचे खोलीकरण आणि बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे भूगर्भात पाणी मोठ्या प्रमाणात जिरले. यामुळे सध्याच्या काळात या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे. ज्वारी, बाजरीचे पीक घेणारे शेतकरी आता मका, कपाशी, तसेच डाळिंब, मोसंबी, ऊस यासारखी पिके घेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशी लागवड केली आहे.

खोलीकरणामुळेच कायापालट

पाच वर्षांपूर्वी जमिनीशी एकरूप झालेल्या नाल्याचे पंधरा फुटांपर्यंत खोलीकरण केले आहे. त्यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतर या नाल्यात पाणी साचते. त्यामुळे करजगावच्या परिसरातील भूजलपातळी वाढण्यास मदत होते. ज्या विहिरी पूर्वी एप्रिल महिन्यातच आटत होत्या, अशा विहिरींना जुलै महिना अर्ध्यावर येऊनही व पाऊस नसतानाही चांगले पाणी टिकून आहे.

पाणीप्रश्‍न सुटला

यापूर्वी आम्ही खूप दुष्काळात दिवस काढले होते. आता मात्र तशी परिस्थिती नाही. ठिकठिकाणी बांधलेले सिमेंट बंधारे व खोलीकरणामुळे सद्यःस्थितीत विहिरींना पाणी टिकून आहे.
- कमलबाई दराडे (शेतकरी)

बंधाऱ्यांचे महत्त्व पटले


पाण्याचे काय महत्त्व असते, हे आम्ही चार-पाच वर्षांपूर्वी अनुभवले आहे. बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा वाढून विहिरी आजही जिवंत आहेत. वाया जाणारे पाणी बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडले. त्यामुळे बंधाऱ्यांचे महत्त्व ग्रामस्थांना पटले आहे. भविष्यात पुन्हा बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत.
- सुलोचना तोंडे (माजी सरपंच)
तत्कालीन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात बंधाऱ्यांची कामे तर झालीच, शिवाय नाल्यांचे खोलीकरणही झाले. त्यामुळेच सध्या पाऊस नसतानाही किमान प्यायला तरी पाणी मिळते. पावसाच्या पाण्यावरच आमची मदार असल्याने भविष्यात शासनाने सिमेंट बंधारे व नाल्यांची खोली वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, तर ग्रामस्थही पुन्हा लोकवर्गणी गोळा करतील. यातून गावात बाराही महिने पाणी उपलब्ध राहील, असे नियोजन आम्ही करू.''
- नारायण पाटील

(माजी अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, करजगाव) 
संपर्क : 9730272424

----------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate