Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:27:21.251990 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / भूजल पुनर्भरण काळाची गरज
शेअर करा

T3 2019/10/14 06:27:21.269593 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:27:21.352189 GMT+0530

भूजल पुनर्भरण काळाची गरज

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 80 टक्के पिण्यासाठीचा पाणीपुरवठा हा भूजलाद्वारे भागविला जातो

भूतकाळात गावागावांत भूजल व्यवस्थापन व पुनर्भरणाचे योग्य प्रकारे व प्रभावी नियोजन केले गेले असते, तर यंदाच्या दुष्काळी स्थितीवर काही अंशी तरी मात करणे शक्‍य झाले असते. यंदाच्या अनुभवापासून धडा घेत आता भूजल पुनर्भरणाचा व्यापक कार्यक्रम हाती घ्यायला हवा.


राज्यात विदर्भ व कोकण विभाग वगळता यंदा सर्वत्रच पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भागातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिके सुकून गेली. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर फळबागा जगवणे जिकिरीचे झाले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी फळबाग वाचविण्यासाठी हतबल झालेला आहे. एप्रिल महिन्यापासून तापमान वाढत आहे. भूजलपातळी खूप खोल गेल्यामुळे कूपनलिका व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी विंधन विहिरी तीनशे फूट खोल घेऊनसुद्धा पाणी लागत नाही. भूतकाळात भूजलाचे योग्य प्रकारे नियोजन केले गेले नाही म्हणून ही समस्या निर्माण झालेली आहे. 

- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 80 टक्के पिण्यासाठीचा पाणीपुरवठा हा भूजलाद्वारे भागविला जातो; तसेच 50 टक्के सिंचन क्षेत्रही भूजलसाठ्यावरच अवलंबून आहे. जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजलसाठा हे पाण्याचे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदा. धरणे, शेततळी, तलाव इत्यादी; तसेच पाणी जिरल्यामुळे भूजलसाठ्यातही काहीशी वाढ होते. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, मृद व जलसंधारण उपायांकडे दुर्लक्ष, पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिकरीत्याही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा कारणांमुळे भूजलपातळी खोल खोल गेलेली आहे. ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे, त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्‍य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्‍यक तर आहेच, सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणेसुद्धा गरजेचे आहे.

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम


भूजल पातळी वाढवण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम गतिमानपणे राबविण्यास प्राथमिकता दिल्यास भविष्यात पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य आहे. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत जमिनीचा चढ-उतार, मातीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, पाणलोटातून वाहणारे नाले या सर्व बाबी विचारात घेऊन कृषी अभियांत्रिकी उपाय राबवावेत. माळरानामध्ये उतारावर खोल, सलग समतल चरांचे काम केल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे करवाडी- नांदापूर पाणलोटामध्ये दिसून आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यातील करवाडी- नांदापूर पाणलोटामध्ये 2010 मध्ये एक मीटर रुंद व पाऊण मीटर खोल आकाराचे एकूण २४  हजार मीटर लांबीचे चर काढल्यामुळे पाच मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झाली, त्यामुळे २०१० मध्ये एकूण १०० हेक्‍टर वाढीव क्षेत्र रब्बी हंगामात सिंचनाखाली आलेले आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये सलग समतल चर, दगडी बंधारे, सिमेंट नाला बांध, मातीनाला बांध, शेततळे, ढाळीचे बांध, शेताची बांधबंदिस्ती हे सर्व उपाय राबवून भूजलपातळीत वाढ निश्‍चितच होते. सोबतच भूजलाचा शास्त्रीय पद्धतीने सिंचनासाठी वापर करणे गरजेचे आहे. पारंपरिक सिंचन पद्धती, वाफे पद्धत, सरी-वरंबा पद्धत, सारे पद्धत इत्यादींमध्ये पाण्याचा भरपूर अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पद्धतींचा पीक घेण्यासाठी वापर करून पाण्याची बचत करता येईल.

भूजल पुनर्भरण


भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहिरी व कूपनलिकांचा वापर करता येतो. पावसाच्या पाण्याचे विहिरीद्वारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी अथवा छताच्या पाण्याचे कूपनलिकेमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रथम शेतातील पाणी अथवा छतावरील पाणी एकत्रित करणे गरजेचे आहे. ज्या पाण्याचे पुनर्भरण आपण करणार आहोत त्या पाण्याची प्रत चांगली असणे आवश्‍यक आहे. हे पाणी योग्य गाळण यंत्रणेच्या मार्फतच पुनर्भरणाच्या ठिकाणी पोचले पाहिजे. तसेच, यामध्ये सर्वांत महत्त्वाची व आवश्‍यक गोष्ट म्हणजे याकरिता योग्य ठिकाणी गाळ स्थिरीकरण टाकीची मांडणी करणे गरजेचे आहे. 

विहीर व कूपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरण करताना गाळण यंत्रणा कार्यक्षमपणे काम करणारी असावी. गाळण यंत्रणेतून पाण्यासोबत गाळ जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पाणी पाइपचा उपयोग करून एकत्रितरीत्या जमा करून शोषखड्ड्यात अथवा कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण करणे शक्‍य आहे. पहिल्या एक- दोन पावसाच्या पाण्याचा उपयोग पुनर्भरणासाठी करण्यात येऊ नये. 

भविष्यकाळात पावसाच्या पाण्याचे व छतावरील पाण्याचे पुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे आहे. दुष्काळाची भीषण परिस्थिती टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्भरण करणे म्हणजेच भविष्यातील पाणीसाठे निर्माण करणे होय.

डॉ. अशोक कडाळे
संपर्क ः 7588082067
(लेखक, म.कृ.वि. अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य आहेत.)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

3.0
ABHIJIT(ABHIJIT.WCE@GMAIL.COM) Jul 25, 2014 12:37 PM

विहीर पुर्नभरण साठी महाराष्ट्र सरकार ची कोणती योजना आहे काय ? असल्यास माहिती द्यावी

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:27:21.827591 GMT+0530

T24 2019/10/14 06:27:21.835023 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:27:21.128062 GMT+0530

T612019/10/14 06:27:21.148277 GMT+0530

T622019/10/14 06:27:21.229254 GMT+0530

T632019/10/14 06:27:21.230407 GMT+0530