অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भूस्तररचनेनुसार जलसंधारण

भूस्तररचनेनुसार जलसंधारण

प्रस्तावना

जलसंधारणाची कामे हाती घेण्यापूर्वी त्या भागाचा भूस्तराचा अभ्यास, भूजलशास्त्रीय विस्तृत नकाशा तयार करण्याचे काम तातडीने हाती घेणे आवश्‍यक आहे. ज्या ठिकाणी बेसॉल्टचा थर पाणी मुरण्यास योग्य नाही त्या ठिकाणी भूपृष्ठावर जलसाठे तयार करावेत. जमिनीखालील खडक पाणी मुरण्यास योग्य असल्यास विहिरी पुनर्भरणाचे काम सार्वजनिक व वैयक्‍तिक पातळीवर हाती घ्यावे. प्रत्येक शेतकऱ्यास बांधबंदिस्ती अनिवार्य करावी. पाण्याच्या ताळेबंदाबाबत तज्ज्ञांद्वारे शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे सांगताहेत औरंगाबादच्या मौलाना आझाद कॉलेजचे भूशास्त्र विभाग प्रमुख व ज्येष्ठ भूजल अभ्यासक डॉ. पी. एस. कुलकर्णी.

राज्याच्या भूजल पातळीसंदर्भात काय सांगाल?

राज्यात कुठेही निश्‍चित अशी भूजलपातळी नाही. एका खेड्यातही भूजलपातळी निश्‍चित सांगता येत नाही. काही ठिकाणी उथळ (पाच ते दहा मीटर) काही ठिकाणी खोल (पंचवीस ते तीस मीटर) तापीच्या गाळातील रावेर, यावल येथे शंभर मीटरपर्यंत भूजलपातळी खोल गेली आहे. विंधन विहिरींच्या वापराचे प्रमाण वाढल्यामुळे अस्तित्वात असलेल्या विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. मराठवाड्याच्या भूजलपातळीसंबंधी गेल्या पाच वर्षांत टॅंकरग्रस्त तालुक्‍यांची संख्या इतर विभागांच्या तुलनेत वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पावसाद्वारे मिळणारा भूजलाचा साठा मार्चअखेर संपुष्टात येतो. त्यामुळे अनेक खेड्यांत मॉन्सूनपूर्व भूजलपातळीची नोंदच होऊ शकत नाही.

राज्याची भूस्तररचना कशी आहे, भूस्तररचनेचे प्रकार सांगाल?

महाराष्ट्र राज्याचा 82 टक्‍के भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने विविध लाव्हारसांचे थर एकमेकांवर साठून बेसॉल्ट खडक तयार झाले आहेत. हे बेसॉल्ट खडक विविध प्रकारांत मोडतात. जसे काळा पाषाण, मांजऱ्या, गेरूचे पट्‌टे याशिवाय या थरांना आडवे छेदणाऱ्या भिंतीसारखे कारीचे पट्‌टे आढळतात. काळ्या पाषाणाच्या थराची जाडी तीन ते शंभर मीटरपर्यंत असू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारचा थर स्थलनिहाय व परिस्थितीनुसार भिन्न गुणधर्म दाखवितो. यामध्ये लाव्हारस थंड होताना आकुंचन पावल्यामुळे भेगा निर्माण होतात. मांजऱ्या खडकामध्ये लहान-लहान आकाराच्या, परंतु एकमेकांशी संबंध नसलेल्या वायूमुळे तयार झालेल्या पोकळ्या आढळतात. या पोकळ्या द्वितीय खनिजांनी भरल्या जातात. राज्यात गारगोटी, शिरगोळा, झिओलाईट्‌स ही द्वितीय खनिजे अशा आकर्षक स्फटिकांच्या उत्पत्तीसाठी प्रसिद्ध आहेत. सदर स्फटिके मांजऱ्या खडकामध्ये होतात. गेरूचे पट्‌टे अत्यंत कमी जाडीचे म्हणजे एक ते तीन मीटर असून त्यांचा विस्तार शंभर मीटरपेक्षा जास्त नसतो. साधारणपणे दोन थरांमध्ये काही वेळा गेरूचे पट्‌टे आढळतात.

भूस्तररचनेनुसार प्रभावी मृद्‌- जलसंधारणासाठी काय उपाययोजना आवश्‍यक आहेत?

पाणी अडवा, माती वाचवा, पाणी जिरवा ही योजना आपल्या राज्यात सर्व ठिकाणी प्रभावीपणे चालू आहे. यामध्ये खडकांचा प्रकार कोणताही असो, मृद्‌संधारण शंभर टक्‍के यशस्वी होते; परंतु जलसंधारण मात्र सर्वच ठिकाणी यशस्वी होईलच असे सांगता येत नाही. कारण जलसंधारणासाठी जमिनीचा उतार, पृष्ठभागावरून ओढे व नाल्याद्वारे वाहणारे पाणी यांना अडविण्याचा विचार करून उपाययोजना राबविली जाते. परंतु बांध बांधून हे पाणी अडविले तरी ते जमिनीत मुरलेच असे नाही. मुरल्यास किती प्रमाणात मुरेल हे सर्वस्वी त्याखाली असलेल्या खडकांच्या जलधारण क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे जलसंधारण उपाययोजना करूनदेखील काही ठिकाणी भूजलाच्या उपलब्धतेमध्ये सर्वच ठिकाणी होणारी वाढ दिसून येत नाही. परंतु खडकांची जलधारणक्षमता चांगली असल्यास मात्र या उपाययोजनेचा चांगला फायदा होतो. जसे राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, आडगाव, कडवंची, लाडगाव अशा गावांचा उल्लेख करता येईल. आष्टी तालुक्‍यातील केरूळ, खुलताबाद तालुक्‍यातील कनकशिळ या गावांमध्ये जलसंधारणाची कामे होऊनदेखील भूजल उपलब्धतेत वाढ होऊ शकली नाही. अशी अनेक उदाहरणे राज्यात आहेत.

जलसंधारणासाठी भूस्तर कसा महत्त्वाचा आहे?

महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारामध्ये असलेला बेसॉल्ट खडक भूस्तर भूजल उपलब्धतेबाबत तसा चमत्कारिकच म्हणावा लागेल. यामध्ये काळ्या पाषाणाच्या थरामध्ये भेंगाद्वारे भूजल उपलब्ध होत असते. परंतु या थरांच्या वरचा भाग थंड झाल्यावर उष्णतेमुळे तापून लाल होऊन अत्यंत कठीण होतो. यामध्ये अत्यंत कठीण कुठल्याही प्रकारच्या भेगा आढळत नाहीत व स्तर अपार्य बनतो. याची जाडी एक ते चार मीटरपर्यंत स्थलनिहाय बदलते. त्यामुळे असा स्तर लागल्यास किंवा अशा स्तरात जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यास त्या भूजल उपलब्धतेबाबतचे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु या स्तरातील खालच्या भागात भेगा आढळतात. त्याद्वारे भूजल उपलब्ध होऊ शकते. यातही भूजल उपलब्धता भेगांच्या रचनेवर अवलंबून असते. भेगा एकमेकांस जोडलेल्या व लांब अंतरावर असल्यास साधारण भूजल उपलब्ध होते. भेगा उभ्या व आखीव असल्यास खोलवर भूजल उपलब्ध असते, तसेच भेगा एकमेकांना जोडलेल्या व जवळ जवळ असल्यास जमिनीलगत या थराचे विदारणदेखील होते म्हणून अशा थरांमध्ये वायूंच्या मोकळ्या द्वितीय खनिजांनी भरलेल्या असतात व सदर खडक एकसंध असतो. यामध्ये भेगांचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे भूजल उपलब्धता अत्यंत कमी असते. अशा भागात खोदलेल्या विहिरी पावसाळ्यातदेखील कोरड्या असण्याची शक्‍यता असते. परंतु हा खडक अनेक वर्षे वातावरणात उघडा पडल्यास याचे जमिनीलगत विदारण होते. यामध्ये जमिनीला समानता एकमेकांलगत अनेक आडव्या संधी निर्माण होतात. ज्याद्वारे पाणी मुरणे शक्‍य होते. अशा प्रकारच्या थरामध्ये जलसंधारण उपाययोजना केल्यास त्याचा चांगला प्रभाव दिसून येतो. दरवर्षी पुरेसा पाऊस झाल्यास विहिरीमध्ये पाणी तुडुंब भरले जाते. बेसॉल्टच्या थरांना छेदणाऱ्या अनेक कारींचे पट्‌टे असतात. बहुतेक कारींचे पट्‌टे यामध्ये एकमेकांलगत व जोडलेल्या भेगा असतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुरणे शक्‍य असते. परंतु याची रुंदी तीन ते दहा मीटर एवढीच असते. याची व्याप्ती स्थलदर्शक असते याच्या बाजूच्या खडकात कधी कधी अजिबात भूजल उपलब्ध नसते. या सर्व बाबी लक्षात घेता जलसंधारणामध्ये भूस्तराचा अभ्यास व भूस्तराचा विस्तृत नकाशा तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या नकाशामध्ये भूस्तर पाणी मुरविण्यास योग्य आहे, अशा ठिकाणीच फक्‍त जलसंधारणाचे कामे हाती घेतल्यास आपण पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेत यश मिळवू शकू; परंतु दुर्दैवाने धोरण ठरविणारे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम भूजल दुर्मिळ होण्यावर होत आहे.

येत्या काळात कमी होणारा पाऊस आणि दुष्काळी स्थिती याबाबत आतापासून कसे नियोजन हवे?

जलसंधारणाची कामे हाती घेण्यापूर्वी त्या भागाचा भूजलशास्त्रीय विस्तृत नकाशा तयार करण्याचे काम तातडीने हाती घेणे आवश्‍यक आहे. ज्या ठिकाणी बेसॉल्ट थर पाणी मुरण्यास पात्र नाही त्या ठिकाणी भूपृष्ठावर जलसाठे तयार करावेत. शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी मदत करावी. जमिनीखालील खडक पाणी मुरण्यास योग्य असल्यास विहिरी पुनर्भरणाचे काम सार्वजनिक व वैयक्‍तिक पातळीवर हाती घ्यावे. प्रत्येक शेतकऱ्यास बांधबंदिस्ती अनिवार्य करावी. पाण्याच्या ताळेबंदाबाबत अभ्यास घेऊन त्याचा अहवाल शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा. याबाबतचे जलतज्ज्ञांद्वारे शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. शहरी भागात अनेक जुन्या विहिरी, आड, बारव यांचे पुनरुज्जीवन करून त्या विहिरींच्या पुनर्भरणाचे काम हाती घ्यावे. हे पाणी पिण्यासाठी योग्य बनवून त्याचा पुरवठा शहरांना व्हावा. अशा उपाययोजना तातडीने हाती घेतल्यास दुष्काळ व त्यामुळे होणारे पाण्याचे दुर्भिक्ष नक्‍कीच दूर करता येईल.

---------------------------------------------------------------
बांध बांधून वाहणारे पाणी अडविले तरी ते जमिनीत मुरलेच असे नाही. मुरल्यास किती प्रमाणात मुरेल हे सर्वस्वी त्याखाली असलेल्या खडकांच्या जलधारण क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे जलसंधारण उपाययोजना करूनदेखील काही ठिकाणी भूजलाच्या उपलब्धतेमध्ये सर्वच ठिकाणी होणारी वाढ दिसून येत नाही. परंतु खडकांची जलधारणक्षमता चांगली असल्यास मात्र या उपाययोजनेचा चांगला फायदा होतो. 
- ज्येष्ठ भूजल अभ्यासक डॉ. पी. एस. कुलकर्णी

---------------------------------------------------------------

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

<a class=

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate