অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलसंधारणाचे काम फत्ते झाले

जालना जिल्ह्यातील कर्जत दुष्काळमुक्तीकडे


"दुष्काळानं आम्ही पार खचून गेलो होतो. कायम दुष्काळ अन्‌ टॅंकर आला तरच पाणी मिळायचं... गावात हापशे व्हते; पण पाणी नव्हतं. विहिरी बी कोरड्याठाक. दुष्काळात आम्ही मिळून जलसंधारणाचं काम केलं... अन्‌ यंदा पहिल्याच पावसातचं नाल्यांत पाणी साचलं. गावातले हापशे सुरू झाले. टॅंकरची यंदा गरज पडली न्हाई.. आमचं कर्जत आता पाणीवालं गाव व्हईल,' जालना जिल्ह्यातील कर्जत ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर या शब्दांत उमटणारा आत्मविश्‍वास स्पष्टपणे दिसत होता. दुष्काळाने होरपळलेल्या कर्जतचा जलस्वंयपूर्णतेकडे प्रवास सुरू झाला आहे. 

दुष्काळ अन्‌ कायम टॅंकरवरच अवलंबून असलेल्या जालना जिल्ह्यातील कर्जत (ता. अंबड) गावाने गेल्या दोन वर्षांत गाळ काढण्यापासून ते नदी-नाले खोली रुंदी-खोलीकरण कामे पूर्ण केली आहेत. दिलासा संस्था व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे रूपांतर घडले आहे. या कामांमुळे गावातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, बंद हातपंपही पुन्हा सुरू झाले आहेत. गावाची तहान भागविण्यासाठी वर्षानुवर्षे टंचाईस्थितीत सुरू असलेला टॅंकर यंदा प्रथमच बंद झाला आहे. खरिपातील चारा पिकांना पाणी देण्यासाठीही या कामांचा फायदा झाला असून, दुष्काळी झळा सोसणाऱ्या कर्जतची टंचाईमुक्‍तीकडे वाटचाल सुरू आहे.

अशी झाली सुरवात

दुष्काळी स्थितीत ऍग्रोवनने कर्जत गावची दुष्काळातली होरपळ मांडल्यानंतर राज्यभरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी कर्जतकडे धाव घेतली. घाटंजी (जि. यवतमाळ) येथील दिलासा स्वयंसेवी संस्थेने दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची व्यवस्था केली आहे. दुष्काळ गावात कामांवर मर्यादा आल्याने रोजगारासाठी मुंबई, पुण्याकडे स्थलांतर वाढले. ते थांबविण्यासाठी गावातच हाताला काम देण्याच्या हेतूने संस्थेमार्फत खासगी तत्त्वावर मनरेगा राबविण्यात आली. गावातील शेतकरी, शेतमजुरांना गावातच हाताला काम मिळाल्याने स्थलांतर थांबलेच. शिवाय रोजगारासाठी स्थलांतरित झालेले ग्रामस्थ पुन्हा गावाकडे परतले अन्‌ कामाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली.

पाणीसाठवणक्षमता वाढली

जलसंधारणाचे काम करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर गावातील पाच सिमेंट व दोन माती बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. ट्रॅक्‍टरमध्ये भरून तो शेतात टाकण्यात आला. गाळ काढल्यामुळे पाणीसाठवणक्षमता तर वाढलीच शिवाय गाळ टाकलेली शेतीही सुपीक झाली. गावातील विहिंरीच्या पाणीपातळीतही वाढ झाली. सन 2012-13 च्या दुष्काळी वर्षातील कामाची फलश्रृती पावसाळ्यानंतर समोर दिसू लागल्यावर जलसंधारणाच्या कामांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय झाला. दिलासा संस्थेसोबतच ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. ग्रामस्थ राजीव डोंगरे यांच्यासह गाव एकवटले अन्‌ परिवर्तनाची नांदी झाली. दिलासा संस्थेचे अध्यक्ष मधुकर धस, मुंबईच्या केअरिंग फ्रेंड्‌स संस्थेचे निमेश पटेल यांनी आर्थिक मदतीची जबाबदारी स्वीकारल्याने दुष्काळात राबणाऱ्या हातांनाही बळ मिळाले.

साडेतीन किलोमीटर नदी, नाला खोलीकरण

सन 2014 मध्ये कामांची व्याप्ती वाढविण्यात आली. यंदाच्या वर्षात साडेतीन किलोमीटर नदी नाल्यांचे रुंदी- खोलीकरण करण्यात आले. परिणामी 16 जूनला झालेल्या पहिल्याच पावसात गावालगतचे तीन डोह पूर्णपणे भरले आहेत.

चारा पिकांसाठी झाला फायदा

मोसंबीचं गाव अशी कर्जत गावची ओळख. दुष्काळानं कर्जतची ही ओळख बदलली. मोसंबीच्या आगारात कापूस बहरू लागला. यंदा मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळातून धडा घेतलेले शेतकरी चारा पीक घेऊ लागले. गावालगतच्या शिवारात मका व अन्य गवतवर्गीय चाऱ्याची लागवड झाली आहे. टंचाई स्थितीत चाऱ्याची गरज भागविण्यासाठी आतापासूनच कर्जतचे ग्रामस्थ नियोजन करू लागले आहेत.

शेजारच्या गावांनी घेतली प्रेरणा

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कर्जत गावातील कामानंतर गावचे यश पाहण्यासाठी गावालगत असलेल्या आवा व देशगव्हाण गावांतील ग्रामस्थ आले. त्यांनी कर्जतमधील काम पाहिले. त्यापासून प्रेरणा घेत आवा गावात तसे काम सुरू झाले आहे. राजीव डोंगरे यांनी या वेळीही मार्गदर्शकाची भूमिका बजावली. गावात जलसंधारणाचे काम झाले. त्याची फलश्रृतीही लवकरच समोर येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

पर्यावरण संवर्धनाचा उचलला भार

कर्जतची दुष्काळमुक्‍तीकडे वाटचाल सुरू झाल्यांनतर पर्यावरण संवर्धनाचीही जबाबदारी आपलीच आहे अशी जाणीव ग्रामस्थांना झाली. जुलै 2013 मध्ये बांधावर आंबा लागवडीचा निर्णय झाला. दिलासा संस्थेने आंब्याची रोपे अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून दिली. गावातील साठ शेतकऱ्यांनी रोपण केले. यंदा जलसंधारणाच्या कामांलगत वृक्षारोपण करण्यात येणार असून, बांबू, आंबा, जांभूळ आदी झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

कर्जतवासीय शेतकरी म्हणतात

गावात पाण्याची स्थिती गंभीर होती. गावातल्या बोअरच्या हापशाला फक्‍त चार ते पाच भांडी पाणी भरायचे. जलसंधारणाच्या कामांमुळे हापशाला चांगलं पाणी येत आहे.
उद्धव सानप, युवा शेतकरी
द्रोपदाबाई उगले, महिला ग्रामस्थ

आमच्या गावात प्यायला बी पाणी नव्हतं. पावसाळ्यात टॅंकर सुरू असायचं; पण पाण्याचं काम झालं अन्‌ टॅंकर बंद झालाय.
रामराव मुंडे,

कायम पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कर्जत गावाने दुष्काळमुक्‍तीसाठी जलसंधारणाचे काम हाती घेतले. गावातच पाण्याचे स्रोत आहेत, त्याची दुरुस्ती व देखभालीचेही काम केले. पहिल्याच पावसात गावातील हातपंप सुरू झाले. शिवाय टॅंकरची गरज पडली नाही हेच मोठे यश आहे. कर्जत गावचा आदर्श घेत अन्य गावांनीही जलसंधारणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
महेश सावंत
तहसीलदार, अंबड, जि. जालना.

संपर्क :
राजीव डोंगरे- 7588649533
समन्वयक, जलसंधारण पॅटर्न, कर्जत

-------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate