Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 09:45:38.653184 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / भागडी गाव झाले पाणीदार
शेअर करा

T3 2019/05/20 09:45:38.657742 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 09:45:38.683070 GMT+0530

भागडी गाव झाले पाणीदार

आंबेगाव तालुक्‍यातील भागडी गावाने (जि. पुणे) केवळ लोकसहभागाच्या बळावर दुष्काळ हटवून जलसंपन्नता साध्य केली आहे.

आमदार, खासदार किंवा कोणत्याही प्रस्थापित नेतृत्वाचा विशेष पुढाकार व पाठबळ नसताना आंबेगाव तालुक्‍यातील भागडी गावाने (जि. पुणे) केवळ लोकसहभागाच्या बळावर दुष्काळ हटवून जलसंपन्नता साध्य केली आहे. पाणी जिरविण्याचे काम प्रभावीपणे झाले तर दुष्काळी गावे शेतीत कशी नेत्रदीपक प्रगती साधू शकतात, याचा आदर्श वस्तुपाठही या गावाने उभा केला आहे.

भागडी हे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व सीमेवरील गाव. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आसपासच्या बागायती गावात ऊस व त्या आधारित अर्थकारण वाढले. भागडी गाव मात्र दुष्काळी परिस्थितीतच राहिले. गावात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असायची. जनावरांची भूक भागविण्यासाठी बांधावरच्या बाभळी, उंबरांचाही वापर व्हायचा. गावातील 75 टक्के शेती पावसाच्या भरवशावर अवलंबून होती. ऐन भरात पीक वाळून जाणे हा नेहमीचा अनुभव होता. गावातील घरटी एखाददुसरा माणूस नोकरीसाठी मुंबईला. याच मुंबईकरांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी जलसंधारणाची कास धरली. त्यातून परिस्थिती बदलली आहे.

सलग समतल चर बांधले

भागडीच्या एकूण क्षेत्रापैकी 22 टक्के क्षेत्र संरक्षित वनाखाली आहे. हे जंगल हाच भागडीचा मुख्य जलस्रोत. दोन डोंगरांभोवती असलेल्या या जंगलात वन विभागामार्फत सलग समतल चर व दगडी बांधांची कामे करण्यात आली. गावकीची जमीन व खासगी शेतजमिनींवरही शासकीय योजना व लोकसहभागातून पाणलोट विकासाची कामे झाली. गावात पाणी जिरविण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली.

आदर्शगाव योजनेतून पाया

भागडीच्या जलसमृद्धीचा खरा पाया घातला तो आदर्शगाव योजनेने. निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा अभियान, जिल्हास्तरीय कर्जमुक्त गाव आदी उपक्रमांत गावाने प्रभावी कामगिरी करून पुरस्कार पटकाविले. या बळावर आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत ग्रामसभेत भागडीचा आदर्श गाव योजनेत समावेश झाला. प्रकल्प अंमलबजावणीसाठी मंचर येथील ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेची निवड करण्यात आली. गेल्या दीड वर्षात झालेल्या पाणलोट उपचारांच्या विविध कामांनी गावाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे.

साखर कारखान्याचा हातभार

भागडीपासून सुमारे 10 किलोमीटरवरील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गावच्या पाणलोट विकासाला मोलाचा हातभार लावला आहे. कारखान्याने गावाची एकी आणि शेतकऱ्यांची इच्छाशक्ती पाहून गावातील मुख्य ओढ्याचे रुंदी-खोलीकरण, त्यासाठी आवश्‍यक यंत्रसामग्री इंधनासह मोफत उपलब्ध करून दिली. यातून मुख्य ओढ्याचे अडीच किलोमीटर लांब खोलीकरण झाले. ते करताना ठिकठिकाणी मातीचे बांध कायम ठेवल्याने ओढ्यात पाझर बंधाऱ्यांची साखळी निर्माण झाली. त्यामुळे पाणी जिरविण्याची व साठविण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कामांचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.

कृषी विभागही दिमतीला

पाणलोटाची कामे, शेततळी योजना, खते, बियाणे वाटप आदी माध्यमांतून कृषी विभागाने गावाला सातत्याने मदत पुरवली आहे. विभागामार्फत गावात सात शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात आले आहे. पाणलोट विकासाची कामे आणि आदर्श गाव योजनेतील प्रकल्पांच्या अंमलबजावणीतही विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे.

सिंचन क्षमतेत भरीव वाढ

  • भागडी गावात एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 73 टक्के क्षेत्र पिकांखाली
  • यापैकी 75 टक्‍क्‍यांहून अधिक क्षेत्र जिरायती
  • पाणलोट उपचारांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये पाणीवापराबाबत जागरूकता वाढली.
  • शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा विशेषतः ठिबक सिंचनाचा अवलंब

भागडी झाले भाजीपाल्याचे गाव

एरवी ज्वारी, बाजरी, कडधान्य आणि चारापिके घेणाऱ्या भागडीची पीकपद्धती बदलली आहे. टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, मेथी, कोथिंबीर, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कलिंगड, उन्हाळी भुईमूग आदी पिके घेण्यात येतात. गावातून दररोज सरासरी दोन हजार लिटर दूध विक्रीसाठी बाहेर जाते.

आजूबाजूच्या गावांना फायदा

भागडीतील जलसंधारणाच्या कामांचा फायदा आसपासच्या पारगाव (ता. जुन्नर), पिंपरखेड (ता. शिरूर) या गावांना व लगतच्या वाड्यावस्त्यांनाही झाला. गावकुसात जिरलेल्या पाण्यामुळे सैद वस्ती, बऱ्हाटे मळा, उंडे मळा या भागातील विहिरींच्या भूजल पातळीत भरीव वाढ झाली. अन्य गावांत शेतकऱ्यांची पाण्यासाठी स्पर्धा सुरू असताना भागडीत मात्र मुबलक पाणी आहे. राज्यभरातून विविध शेतकरी गटांनी गावाला भेट दिली आहे. पुणे विद्यापीठासह परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहली व राष्ट्रीय सेवा योजनेतून वनराई बंधारे बांधणीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. भागडीतील यशामागे सर्व ग्रामस्थ, सरपंच बाळासाहेब दत्तू बारेकर, उपसरपंच ज्ञानेश्‍वर वसंत उंडे, बबनराव सैद, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे अध्यक्ष डी. के. वळसे पाटील, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक मारुती बोऱ्हाडे आदींचे योगदान राहिले आहे.

गावात राबवले जाणारे नावीन्यपूर्ण उपक्रम

  • विवाह नोंदणीपूर्वी पती-पत्नीं यांच्या हस्ते दोन वृक्षांची लागवड
  • दुचाकी खरेदीनंतर दोन, तर चारचाकी खरेदीनंतर चार वृक्षांची लागवड
  • स्त्रीभ्रूणहत्या बंदीची स्वेच्छेने अंमलबजावणी
  • महिला व मुलांच्या विकासासाठी शिबिरे
  • शाळा समिती, दूध डेअरी, विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत आदी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध
गेल्या पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपून ओढ्यात उतरले. यंदा अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसताना ओढ्यात व 140 पैकी 100 विहिरींमध्ये पुरेसे पाणी आहे. योजनेअंतर्गत उर्वरित 50 टक्के कामे झाल्यानंतर गावची जलसंपन्नता अधिक शाश्‍वत होईल.
- रामदास आगळे, अध्यक्ष, आदर्श गाव समिती, भागडी
आदर्श गाव योजनेतील पाणलोट विकासाची कामे अधिक काटेकोरपणे करण्यावर, सीसीटी आणि बांधांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे भागडीत पाण्याचा थेंबन्‌ थेंब जिरून पाणलोट विकास यशस्वी झाला आहे.
- दत्ता गभाले, तांत्रिक कार्यकर्ता, ज्ञानशक्ती विकास वाहिनी

दृष्टिक्षेपात भागडी

कुटुंबसंख्या - 173
लोकसंख्या - 879
साक्षरतेचे प्रमाण - 82.78 टक्के
सरासरी वार्षिक पर्जन्यमान - 780 मिलिमीटर
भौगोलिक क्षेत्र - 544.85 हेक्‍टर, जंगल जमीन - 118.14 हेक्‍टर
जिरायती क्षेत्र - 312 हेक्‍टर, बागायती क्षेत्र - 85.38 हेक्‍टर

आदर्श गाव योजनेतून झालेली कामे

सलग समपातळी चर (सीसीटी) - 23.34 हेक्‍टर (1.70 लाख रुपये)
कंपार्टमेंट बंडिंग - 121.90 हेक्‍टर (6.64 लाख रु.)
अनगड दगडी बांध - 18 (64 हजार रु.)
नाला बांध - 1 (1.67 लाख रु.)

लोकसहभाग व इतर योजनांतून पूर्ण कामे

नाला बांध - 1
सिमेंट नाला बांध दुरुस्ती - 3
नाला खोलीकरण - 2.5 किलोमीटर
श्रमदानातून वृक्षलागवड - 5000
श्रमदानातून रस्ता दुतर्फा वृक्षलागवड - 2 किलोमीटर
शेततळी - 7

संपर्क - 1) रामदास आगळे- 9822026732
2) दत्ता गभाले- 7350373240

--------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

3.01162790698
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 09:45:39.052791 GMT+0530

T24 2019/05/20 09:45:39.059675 GMT+0530
Back to top

T12019/05/20 09:45:38.550661 GMT+0530

T612019/05/20 09:45:38.570272 GMT+0530

T622019/05/20 09:45:38.643122 GMT+0530

T632019/05/20 09:45:38.643943 GMT+0530