Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:49:31.024373 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / लोकसहभागातून जलसंधारण
शेअर करा

T3 2019/10/14 07:49:31.029019 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:49:31.054109 GMT+0530

लोकसहभागातून जलसंधारण

दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेवासे तालुक्‍यात (जि. नगर) सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन म्हणजेच लोकसहभागातून जलसंधारणाचे भरीव काम केले.

  • नेवासे तालुक्‍यात 340 बंधाऱ्यांची दुरुस्ती
  • लोकसहभागातून झाली जलसंधारणाची विविध कामे
  • साडेतेरा लाख ब्रास गाळाचा वापर
  • सुमारे बाराशे एकर शेती पीक घेण्यासाठी सज्ज
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेवासे तालुक्‍यात (जि. नगर) सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन म्हणजेच लोकसहभागातून जलसंधारणाचे भरीव काम केले. सुमारे तीन कोटी रुपये खर्चातून 340 पाणी साठवण बंधाऱ्यांची खोली व रुंदी वाढविण्याचे मोठे काम यातून झाले आहे. केलेल्या कामांतून निघालेला साडेतेरा लाख ब्रास गाळ, परिसरातील बाराशे एकर नापिक शेतात टाकण्यात आल्याने या शेतांत नव्या जोमाने पिके डोलणार आहेत. 

सुमारे 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात नेवासे तालुका (जि. नगर) आहे. सन 1972 नंतर पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर या भागाचा आर्थिक स्तर उंचावला. अनेक गावांत शेती बागायती झाली. मात्र, ही परिस्थिती कायम तशीच राहिली नाही. पाणीटंचाई किंवा दुष्काळाचे चटके परिसराला जाणवू लागले. यंदाच्या वर्षी फेब्रुवारीनंतर विहिरी तळ गाठू लागल्या. कूपनलिकाही उतरणीला लागल्या. सर्वांचेच धाबे दणाणले. आता काय? हाच प्रश्‍न सर्वांपुढे तयार झाला. तालुक्‍यात दोन साखर कारखाने असल्याने सर्वाधिक उसाचेच पीक घेतले जाते. दुष्काळाची चाहूल फेब्रुवारी- मार्चमध्येच लागल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी, सेवाभावी संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी एकत्र आले. चर्चेतून उपाय शोधला. लोकसहभागातून जलसंधारणाची काही कामे सुरू केली. यात बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे, काटेरी झाडे तोडणे, दरवाजा दुरुस्ती आदी कामांसंदर्भात विचारविनिमय झाला. 

तालुक्‍यातील प्रमुख संस्था व शेतकऱ्यांनी आमदार शंकरराव गडाख यांची भेट घेऊन स्थितीची माहिती दिली. त्यानंतर दुष्काळ निवारण समितीची स्थापना करण्यात आली. प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील गरज व आवश्‍यक कामांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यानंतर लोकवर्गणीतून जेसीबी, ट्रॅक्‍टर, मजुरांच्या साह्याने जलसंधारण कामाची सुरवात झाली. 

तालुक्‍यातील विविध गावांत एकाच वेळी विविध कामे सुरू झाली. बंधाऱ्यातून काढलेला गाळ सांगवी, खडके, खरवंडी, अंतरवली, सुरेशनगर, सुकळी, फत्तेपूर, कौठा, चांदे, निपाणी, वडोली आदी गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात स्वखर्चाने नेला. सुमारे साडेतेरा लाख ब्रास गाळ पाचशे साठ शेतकऱ्यांनी बाराशे एकर शेतात पसरवण्याचे काम केले. यातील बहुतांश शेती पाच ते पंधरा वर्षांपासून नापिक वा पडीक होती. काही शेती खडकाळ व मुरमाड होती. गाळ टाकून घेतल्याने शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे; तसेच हे क्षेत्र पीक घेण्यायोग्य होत आहे.


चारा आणि पाण्याचा प्रश्‍न मिटला


लोकसहभागातून तालुक्‍यातील तीनशे चाळीस बंधारे, गावतळे, पाझर तलाव, साखळी बंधारे दुरुस्त केले. हे बंधारे पाण्याने भरून घेण्यासाठी तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी घोडेगाव (ता. नेवासे) येथे रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने मुंबई येथे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन स्थितीची माहिती दिली. त्यानंतर बंधारे भरून घेण्यासाठी मुळा धरणातून आवर्तन सोडून सर्व बंधारे भरून घेण्यात आले. दुरुस्तीनंतर सहाशे दशलक्ष घनफूट पाणीक्षमता वाढली. पन्नासहून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला. अनेक गावांत सुरू केलेले टॅंकर बंद झाले. 

तालुक्‍यात झालेले जलसंधारणाचे काम पाहण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगवी, खरवंडी, वडाळा येथील बंधाऱ्याला भेट देऊन झालेल्या कामांची प्रसंशा केली.


लोकसहभागातून घडल्या अनेक गोष्टी -


* प्रत्येक गावात एकजुटीचे दर्शन. 
* लाभ होणार 18,600 एकर क्षेत्राला. 
* लाभधारक शेतकरी - सुमारे 10 हजार 413 
* बारा गावांतील पाण्याचे टॅंकर बंद. 
* बाराशे एकर शेतीत गाळ टाकल्याने जमीन शेतीयोग्य होणार 
* पाचशे साठ शेतकऱ्यांनी शेतात गाळ पसरवला. 
* विहिरी व कूपनलिकेला पाणी वाढले. 
* 30 ते 35 वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर वाचले. 
- प्रकल्पांतर्गत झालेली कामे - 
साठवण बंधारे - 155, पाझर तलाव - 17, गावतळे - 23, साखळी बंधारे - 145. 
----------------------------------------------------------
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान व लोकसहभागातून हाती घेतलेल्या बंधारे दुरुस्ती व गाळ काढणीचा मोठा फायदा झाला. गाळ काढल्याने पाणीधारण क्षमता वाढली. सुपीक गाळ शेतात टाकल्याने उत्पादन वाढणार आहे. जमिनीत झिरप वाढून विहिरी व बोअरवेलला पाणी वाढले. बंधाऱ्यातील पाण्याने परिसरातील ऊस बेणे प्लॉट टिकतील व पुढील वर्षाच्या ऊस लागवडीला त्याचा फायदा होईल. कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाद्वारे चाऱ्याचे बियाणे वाटप केले होते. आता पाणी मिळाल्याने चारा उपलब्ध झाला. जनावरांना पाणी मिळाले. दूध व्यवसाय टिकून राहिला. 
- प्रमोद शिंदे - 9604356334
तालुका कृषी अधिकारी, नेवासे 
----------------------------------------------------------
कौतुकी नदीपात्रातील सर्व साखळी बंधारे दुरुस्त झाले. यामुळे पाणीक्षमता वाढली. आवर्तनाद्वारे बंधारे भरून घेतल्याने साखळी बंधाऱ्यावर लाभधारक असलेल्या साडेतीनशे शेतकऱ्यांचे मोठे संकट टळले. विहिरी व कूपनलिकेचे पाणी वाढल्याने माणसे व जनावरांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला. चाराही उपलब्ध होत आहे. दूध व्यवसाय स्थिर राहिल्याने स्थलांतर टळले. 
- डॉ. ज्ञानेश्‍वर दरंदले - 9860330791
शेतकरी, सोनई 
----------------------------------------------------------
दुष्काळात शेती उजाड होईल हे लक्षात घेऊन एक एकर क्षेत्रावर शेततळे केले. भाजीपाला, चारा, फळबाग व उसाच्या शेतीला ठिबक सिंचन केले. शेताजवळचे बंधारे भरले. शेततळे भरून घेतले. यामुळे ग्रामस्थ व जनावरांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला. माझे फळबागांचे होणारे लाखो रुपयांचे नुकसान टळले. पावसाळ्यात या बंधाऱ्याचा मोठा फायदा होईल. लोकसहभागातून साकारलेला हा प्रकल्प आमच्या गावासाठी देवदूतासारखाच ठरला. 
- सुभाष टेमक - 9860807297
शेतकरी, करजगाव 
----------------------------------------------------------
माझी दोन एकर शेती दहा वर्षांपासून नापिक होती. जमिनीत क्षारांचे प्रमाण खूप झाल्याने या शेतात पीक घेणेच बंद होते. दोन एकर क्षेत्रात शंभर ट्रॅक्‍टर ट्रॉली गाळ टाकून घेतला. पन्नास हजार रुपये वाहतूक खर्च आला. गाळ टाकून घेतल्याने जमीन सुपीक होणार आहे. आता पिके घेणे सोपे होणार असल्याने खूप समाधान झाले. जलसंधारण कामांचे महत्त्व पटले आहे. शेतात टाकलेला गाळ पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी शेताला भेट देऊ लागले आहेत. त्यांनाही या कामांची प्रेरणा मिळणार आहे. 
- अरुण जेम्स - 9423207300
शेतकरी, सांगवी

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

2.95495495495
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:49:31.414847 GMT+0530

T24 2019/10/14 07:49:31.421243 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:49:30.926709 GMT+0530

T612019/10/14 07:49:30.945159 GMT+0530

T622019/10/14 07:49:31.014213 GMT+0530

T632019/10/14 07:49:31.015019 GMT+0530