অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवार झाले पाणीदार.. सिंचन होईल जोमदार..

शिवार झाले पाणीदार.. सिंचन होईल जोमदार..

पाणी हे केवळ मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारे संसाधन नसून ते विकासाचे साधन आहे. त्याचा योग्य वापर केल्यास मानवजातीचा विकास चांगल्या प्रकारे व वेगाने होऊ शकतो. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी, विजेची निर्मिती, कारखानदारी यात पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. दुष्काळ.. केवळ नावच पुरेसे आहे. या एका शब्दातच सारे सामावले आहे. या शब्दामध्ये असलेल्या गर्भीत अर्थाचे चटके राज्यातील जनतेने अनुभवले आहे. हे चटके दूर करण्यासाठी.. राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या कामांमुळे पाणी अडविले गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.. आणि सिंचन होईल जोमदार.. अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातही या अभियानाने चांगलेच बाळसे धरले आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील 330 गावे पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये जलसंधारणाची विविध प्रकारची ९ हजार १३२ कामे पूर्ण करण्यात आली आहे. या वर्षामध्ये विविध कामांच्या माध्यमातून जिल्ह्यात ४५ हजार २७० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर २० हजार ६ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षित सिंचन सुविधा निर्माण झाली. त्याचप्रमाणे सन २०१६-१७ मध्ये दुसऱ्या टप्प्यात २४५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी काढण्यात येऊन गावांच्या शिवारात कुठे-कुठे जलसंधारणाची कामे होऊ शकतात, याबाबत निश्चितता करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील २४५ गावांमध्ये ३ हजार २९६ कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर ८८ कामे प्रगतीपथावर आहे. या टप्प्यात विविध जलसंधारण कामांच्या माध्यमातून १७ हजार १७२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच ७ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि १२ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचन होणार आहे. त्याचप्रमाणे सन २०१७-१८ मध्ये तिसऱ्या टप्प्यात १९५ गावांची निवड अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरीता करण्यात आली आहे. या गावांचे गाव आराखडे तयार करण्यात आलेले आहेत.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सतत टँकरग्रस्त असणारी ८० गावे यामध्ये प्राधान्याने निवडण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजलच्या कमतरेतुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. भूजल स्तर कमी झाल्यामुळे जिल्ह्यात या ८० गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या ‘आ’ वासून उभी आहे. सतत बाहेरून पाणी आणून या गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे. या गावांमधील जनतेला जलयुक्त शिवार अभियानामुळे साक्षात भगिरथ आल्याचा अनुभव येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी निश्चितच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला खोलीकरण व रूंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पावसाने ओढ दिल्यानंतरही अनेक भागांत जलसंधारणांच्या विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे. या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान अत्यंत महत्वाची भूमिका बजावित आहे. जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामध्ये टँकरग्रस्त खामखेड गाव शिवारात पाणीसाठा जलसंधारणच्या विविध उपचारांमुळे वाढला आहे. परिणामी, शेतकरी सिंचन करून पिके आहेत. खामगांव तालुक्यातील तोरणा नदीवर निर्माण करण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बांधमुळे अटाळी, आंबेटाकळी, शिर्ला नेमाने व लाखनवाडा परीसरातील शेतकरी दुबार पीक घेत आहे. तसेच उपसा सिंचनाद्वारेही पिक फुलवित आहे. मोताळा तालुक्यातील अवर्षण असलेल्या पट्टयामध्ये मोठ्या प्रमाणावर भूजल पातळीत वाढ झाली आहे. खांडवा गाव पाणीदार बनले आहे. गावातील शिवारात सात साखळी सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे दुष्काळाने होरपळणारे येथील शिवार जलयुक्त बनले आहे.

त्याचप्रमाणे खारपाणपट्टयामधील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांमध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून रिचार्ज शाफ्टची कामे झाली आहे. खांडवी परीसरातील अशाच एका कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे. या पद्धतीमुळे भुजल पातळीत कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. खारपाणपट्टयातील या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यात येत आहे. परिणामी, जमिनीतील क्षारही कमी होण्यास मदत मिळत आहे. अशाप्रकारे जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात नक्कीच जलसमृद्धी येत असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

सध्याही जिल्ह्याला पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासनाने प्रथमत: टॅंकरमुक्तीचे ध्येय समोर ठेऊन विविध योजनांतर्गत मृद व जलसंधारणाचे उपचार हाती घ्यावयाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वच विभागांचा बहुमोल सहभाग प्राप्त करुन घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून साखळी सिमेंट नालाबांधची कामे केली. तसेच कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती व गेट बसविण्याची कामेही घेण्यात आली.

जलयुक्त शिवार अभियानामध्ये दोन टप्प्यात १२०५ साखळी सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच ९३८ सिमेंट नाला बांध पूर्ण करण्यात आलेले आहे. साखळी सिमेंट बांध व पूर्ण झालेल्या सिमेट नालाबांधामुळे भूजल पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होऊन शेतकऱ्यांना दुबार पीक काढता येणे शक्य झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी येऊन शेतकरी संपन्न होत आहे.

या अभियानाच्या प्रथम, द्वितीय टप्प्यात जिल्ह्यातील ५७५ गावांमध्ये विविध विभागांच्या समन्वयाने १२ हजारावर कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या संपूर्ण कामांमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन उपलब्ध झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली आहे. शासनाच्या महत्वांकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकरी समाधानी आहे. एकंदरीतच जिल्हा या अभियानांमधील कामांमुळे जलसमृद्ध होणार एवढे मात्र निश्चित.

लेखक - निलेश तायडे,

जिमाका, बुलडाणा

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate