অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी ग्राहक जागृती

कृषी ग्राहक जागृती

कुठलीही व्यक्ती असो, ती व्यक्ती वस्तूंची मागणी करते आणि उत्पादक त्या वस्तूची मागणी पूर्ण करतो. एवढा सरळ आणि साधा व्यवहार असताना मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे हा साधा आणि सोपा व्यवहार गुंतागुंतीचा झालाय.  उत्पादक ग्राहकाला फसवू लागला आहे.  या अतिरेकतून ग्राहक चळवळ उदयाला आली.  १९८६ साली भारत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा पारित केला.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अतिशय दक्ष राहायला हवे. फसवणूक झाली तर मोठे नुकसान होऊ शकतं.  म्हणून शेती व्यवसायाला लागणाऱ्या कृषी निविष्टा घ्यायला जाताना यादी तयार करावी.

  • बियाण्याबद्दलची सर्व प्रकारची माहिती मिळवून मगच खरेदीला जावं.
  • कर चुकविण्यासाठी बिल न घेण्याचा मोह टाळावा.
  • कृषी निविष्टांची खरेदी करताना दर्जा आणि गुणवत्ता तपासून पाहावी.
  • अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्टा घ्याव्यात.
  • रस्त्यावर विक्रीसाठी असणाऱ्या नारळाच्या रोपांसारख्या निविष्टा विकत घेऊ नये.
  • सगळी दक्षता घेऊनही फसवणूक झालीच तर तक्रार करावी.

ग्राहक संरक्षणात पावतीला फारच महत्व आहे.  किंबहुना फसवणुकीच्या तक्रारीबाबत पावती घेतलीच पाहिजे.  त्या पावतीवर दुकानदाराचे नाव, क्रमांक, वस्तूचे नाव, नाग, वजन, कंपनी उत्पादनाची तारीख या गोष्टींची त्यात नोंद असावी.  पावती म्हणजे पुरावा.  पावती आधारे ग्राहक न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो.

ग्राहकाला योग्य दर्जाची, गुणवत्ताची, तसंच वाजवी किमतीला वस्तू मिळणे हा ग्र्हकाचा अधिकार आहे आणि चांगल्या गुणवत्तेची निविष्टा आणि सेवा पुरवण्याचं कर्तव्य विक्रेत्याचं असावं लागतं.  तरच ग्राहकांचा आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान टळतं सरकारनं निविष्टाच्या बाबतीत गुणवत्ता आणि दर्जा दाखवण्यासाठी बोधचिन्हाचा विकास केलाय.  ही बोधचिन्ह म्हणजे आयएसआय मार्क (ISI) अॅगमार्क (Agmark) इकोमार्क (Eco Locco) हॉलमार्क (Hall-mark) फूड प्रॉडक्ट्स (FPO mark)

यातले आयएसआय हे चिन्ह भारत सरकारने वस्तूचा दर्जा आणि गुणवत्ता दर्शवण्यासाठी दिले आहे.  याचा दुरुपयोग कोणी केल्यास एक वर्ष कैद आणि ५० हजार रु.  दंड देण्याच्या शिक्षेची तरतूद आहे.  ISI चिन्ह असलेली निविष्टा हलक्या दर्जाची अगर दोषपूर्ण निघाल्यास विनामोबदला बदलून देण्याची हमी ब्युरो देते.

अॅगमार्क म्हणजे शेती उत्पादनाच्या शुद्धतेबद्दल आणि दर्जाबद्दल दिलेले प्रमाणपत्र होय.  तांदूळ, डाळी, द्राक्षे, गव्हाचं पीठ, बेसन, आंबे आदींबाबत अॅगमार्क चिन्ह देण्यात येतं.

इकोमार्क (Eco Locco) हे चिन्ह भारतीय मानब्युरोकडून पर्यावरणाचं संरक्षण आणि वस्तूची गुणवत्ता टिकवण्याच्या उद्योगाच्या उत्पादनाला दिलं जातं.

गुणवत्तेचं आणि शुद्ध सोनं मिळावं म्हणून सोन्याला हॉलमार्क हे चिन्ह सरकारनेच दिलं आहे.  त्यामुळे हॉलमार्क चिन्ह असलेलंच सोनं घ्यावं.

कृषिमालाचे काही प्रक्रियायुक्त पदार्थ उदा.  लोणची, सॉस, शीतपेयं, फळांचा रस, जॅम, जेली यासारख्या किती तरी प्रक्रिया केलेल्या पदार्थांना फूड प्रॉडक्ट्स (FPO mark) हा दर्जा आणि चिन्ह गुणवत्तेसाठी दिलं जातं.

शेतकऱ्यांनी, ग्राहकांनी ही चिन्हे तपासून वस्तू, निविष्टा खरेदी कराव्यात.  बी – बियाणे, खते, सेंद्रिय खते, संजीवक औषधे यांची विक्री करण्यासाठी आकर्षक जाहिरातबाजी केली जाते.  या जाहिरातबाजींना बळी न पडता पडताळूनच निविष्टा खरेदी कराव्यात.  पसंतीला वाव, पैशाच्या मोबदल्यात चांगल्या निविष्टा आणि सेवाप्राप्ती ग्राहकांचे महत्तम कल्याणहित साधलं जाऊ लागलं आहे.

कृषी निविष्ट अगर इतर वस्तूंत खरेदी करताना फसवणूक झाली आणि जर आपल्याकडं पावती असेल तर कृषी खात्याची गुण – नियंत्रण व्यवस्था फसविणाऱ्यांना दंड करते.  याशिवाय जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक आयोग, राष्ट्रीय ग्राहक आयोग अशी न्यायालयीन व्यवस्था असल्याने ग्राहक दाद मागू शकतो.  मात्र यासाठी प्रत्येक ग्राहकाने जागरूकतेने या चळवळीत सक्रीय व्हायला पाहिजे.

आजकालच्या स्पर्धेच्या युगात फसवणूक होण्याचे प्रसंग टाळता येत नाहीत.  यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहक चळवळीशी आपला असायला पाहिजे.

ग्राहक (शेतकऱ्या) तूच आहेस तुझा रक्षणकर्ता.

 

कृषी प्रवचने - प्रल्हाद यादव

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate