অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तरुण शेतकर्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन

तरुण शेतकर्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन

बुंदेलखंडमधील (उत्तर प्रदेशातील) तरुण शेतकर्यांसंदर्भात केलेल्या अभ्यासाचा सारांश

“शेतीतले अत्यल्प उत्पन्न, तोकडा नफा, जमीन धारणेतली घट या कारणांस्तव ग्रामीण भागातले तरुण उदरनिर्वाहासाठी बिगरशेती व्यवसायांकडे वळत आहेत किंवा रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधल्या बुंदेलखंडातल्या ग्रामीण तरुण शेतकर्यांच्या शेतीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांचा अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास कमीअधिक प्रमाणात इतर राज्यांनाही लागू होत असल्याने या अभ्यासातल्या महत्त्वपूर्ण निरीक्षणांचा संक्षिप्त आढावा या ठिकाणी घेत आहोत.”

कृषी क्षेत्रात कार्यरत असणारे युवक शेतीबाबत कसा विचार करतात या अभ्यासासाठी उत्तरप्रदेशातल्या कृषी हवामानावर आधारित नऊ प्रादेशिक विभागांपैकी बुंदेलखंडची निवड करण्यात आली. बुंदेलखंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातला सर्वांत मोठा आणि मागास विभाग आहे. उपासमारीमुळे होणारे मृत्यू, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर, शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक संसाधनांचा वारेमाप वापर, सक्तीचे भूसंपादन अशा अनेक कारणांमुळे बुंदेलखंडचे नाव सतत वर्तमानपत्रात झळकत असते. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणार्या शेतीवरच येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. जमिनीचा खालावलेला दर्जा आणि सिंचनासाठीच्या सोयींचा अभाव यांमुळे येथे एकपीक पद्धत असल्याचे दिसून येते. बुंदेलखंडमधल्या सात जिल्ह्यांमधले प्रत्येकी दोन तालुके आणि त्यांपैकी प्रत्येक तालुक्यातून एक गाव अभ्यासासाठी यादृच्छिक पद्धतीने निवडण्यात आले. या अभ्यासादरम्यान, निवडलेल्या प्रत्येक गावातील 35 वर्षांखालील किमान 25 तरुणांच्या म्हणजे जवळपास 350 तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण यांमुळे झालेल्या बदलांचे साक्षीदार तसेच शेतीचा चेहरामोहरा बदलू शकणारा संभाव्य वयोगट हा हेतू समोर ठेवून या वयोगटातील तरुणांची निवड करण्यात आली. मुक्त अर्थव्यवस्था, शेतीची आर्थिक आणि सामाजिक सद्यःस्थिती आणि आजची शिक्षित, प्रगत, ग्रामीण तरुणाई शेतीकडे कसे पाहते या सार्याबद्दलचे एक चित्र या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे

• अल्पभूधारक आणि सीमान्त (सरासरी 1 हेक्टर इतकी जमीन धारणा असलेल्या) तरुण शेतकर्यांचे प्रमाण 75.14 टक्के आहे, तर मध्यम आणि मोठी (साधारण 6.40 हेक्टर इतकी जमीन धारणा असलेल्या) तरुण शेतकर्यांचे प्रमाण 25 टक्के आहे.

• लहान, मध्यम आणि मोठे भूधारक असलेल्या तरुण शेतकर्यांच्या तुलनेत सीमान्त तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणात बिगरशेती क्षेत्राकडे वळताना दिसतात.

• 31 ते 35 वयोगटातील लोकांचा शेतीतील सहभाग 25 वर्षार्ंपर्यंतच्या वयोगटातल्या भूधारकांच्या तुलनेत अधिक आहे. 25 वर्षे वयोगटातील भूधारक मात्र शेतीच्या दैनंदिन कामातला आपला सहभाग कमी करून बिगरशेती क्षेत्राकडे अधिक लक्ष देताना दिसतो.

• 9 वीपासून 12वीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 38.87 टक्के आहे, तर 21.71 टक्के अशिक्षित आहेत. 20.28 टक्के तरुण आठवीपर्यंतच शिकलेले आहेत.

• पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांचे प्रमाण 19 टक्के असून शेतीमध्ये नवीन तंत्रे आणि तंत्रज्ञान आणण्याकडे त्यांचा कल आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक तरुण शेतकर्यांच्या तुलनेत मोठ्या किंवा मध्यम भूधारक तरुण शेतकर्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. वार्षिक उत्पन्न पाहता, अल्प आणि अत्यल्प भूधारकांपेक्षा अकुशल कामगार अधिक उत्पन्न मिळवत असल्याचे लक्षात आले.

• शेतीतून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसल्याचे मत सर्व सीमान्त शेतकर्यांनी व्यक्त केले. शेती करण्याऐवजी किमान चार हजार रुपये मासिक वेतन देणारी नोकरी मिळाल्यास ती करण्याची इच्छा या सर्व शेतकर्यांनी दर्शवली. शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची पक्की मनोधारणा 95 टक्क्यांहून अधिक सीमान्त शेतकर्यांमध्ये आढळून आली. पुढच्या पिढीने शेती करावी असे वाटते का, यावर मात्र मिश्र प्रतिक्रिया असल्याचे या अभ्यासातून दिसून आले. सर्व (103) सीमान्त शेतकर्यांचे म्हणणे ‘नाही’ असेच आहे; परंतु 87 मोठ्या शेतकर्यांपैकी जवळपास 59 शेतकरीही याबाबतीत सीमान्त शेतकर्यांशी सहमत आहेत. आपल्या मुलांना शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसाय करण्यासाठी तयार करत असल्याचीही कबुली प्रश्नोत्तरादरम्यान 103 पैकी 93 शेतकर्यांनी दिली.

ग्रामीण भागातील तरुणवर्ग शेतीपासून आणि गावापासून दूर जात असल्यामुळे त्याला बालपणापासून मिळालेले शेतीक्षेत्राचे ज्ञानदेखील निरुपयोगी ठरत आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार्या अडचणी, अत्यल्प जमीनधारणा आणि तोकडे उत्पन्न, त्यामुळे येणारी निकृष्ट जीवनशैली या कारणांमुळे शेतीमध्ये प्रयोग करण्याबाबतही ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.

(सदर लेख ‘इंडिअन रीसर्च जर्नल ऑफ एक्सटेंशन एज्युकेशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ‘Perception of Farming Youth towards Farming’ या शोधनिबंधावर आधारित आहे.)

लेखक:

१. सरजू नरैन (साहाय्यक प्राध्यापक), ब्रह्मानंद महाविद्यालय, रथ (हमीरपूर), उत्तर प्रदेश

२. ए. के. सिंग उपमहासंचालक (कृषी विस्तार), भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली

३. एस. आर. के. सिंग  वरिष्ठ शास्त्रज्ञ, ZPD, झोन VII,  भारतीय कृषी संशोधन परिषद,  जबलपूर,  मध्य प्रदेश

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate