অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाचणी, ज्वारी झाली नगदी पिके

  • जिरायती महिलांनी केली आधुनिक शेती
  • शेतीसह केला प्रक्रिया उद्योग

केनिया, युगांडा यासारख्या पूर्व आफ्रिकी देशांतील महिला शेतकऱ्यांनी नाचणी, ज्वारी ही पिके नगदी म्हणून बनवली आहेत. सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा वापर करीत त्यांनी पीक उत्पादन वाढवलेच. शिवाय प्रक्रिया उद्योगाचा आधार घेत या पिकांपासून विविध पदार्थ तयार केले. आज आर्थिक गरिबी हटवून त्यांनी आपले कुटुंब सुखा-समाधानाचे बनवले आहे.
आपण नगदी पिके म्हणून कपाशी, ऊस, फळपिके यांचाच अधिक विचार करतो. त्या नादात काही महत्त्वाच्या पिकांकडे मात्र दुर्लक्ष होत असते. नाचणी पिकाचेच उदाहरण घ्या. या पिकाचे आरोग्यदायी महत्त्व आपण सर्व जण जाणून आहोतच; परंतु या पिकाकडे उपेक्षित नजरेनेच अनेक वेळा पाहिले जाते. पूर्व आफ्रिकेत मात्र नाचणी आणि त्या जोडीला ज्वारी ही पिके नगदी होत आहेत. एकवेळ अशी होती मका हे नगदी पीक घेण्याच्या नादात या दोन पिकांकडे आफ्रिकी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते.
कोणतेही पीक शेतकऱ्यांचे लाडके होण्यासाठी एकतर त्याचे दर चांगले असावे लागतात. त्याचे लागवड तंत्रज्ञान, सशक्त बियाणे अशा गोष्टी मिळणे गरजेचे असते. इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेने या गोष्टींची शेतकऱ्यांना मदत केली. संस्थेचे स्थानिक तांत्रिक अधिकारी डॅनिएल ओटवनी सांगतात, की नाचणी, ज्वारी पिकांच्या लागवडीकडे इथल्या शेतकरी महिला आकर्षित झाल्या आहेत. सामुदायिक रस असलेल्या अशा 38 महिलांचा आम्ही गट तयार केला आहे. त्यांना या पिकांतील संपूर्ण लागवड तंत्रज्ञान समजावून दिले जात आहे.
यात सुधारित जातींची निवड, नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण, लागवडीच्या आदर्श पद्धती, एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन आदी गोष्टींचा समावेश आहे. यापुढे जाऊन पिकातील काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत म्हणजे काढणीनंतर धान्याची हाताळणी, त्याचा दर्जा सुधार आदी बाबींबाबत मार्गदर्शन केले जात आहे, त्यामुळेच दर्जेदार धान्याला मार्केटमध्ये चांगला दर मिळवणे या शेतकऱ्यांना शक्‍य झाले आहे.

नाचणी, ज्वारी- शेती ते प्रक्रिया पदार्थ उत्पादन

हे तर झाले पीक लागवडीबाबत; पण नाचणी व ज्वारी ही अशी पिके आहेत की त्यांचे मूल्यवर्धन केले जाऊ शकते आणि इक्रिसॅटच्या प्रकल्पात तसे प्रयत्न झालेदेखील. या पिकांपासून पेस्ट्रिज, बिस्किटे, केक, क्रॅकर असे विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकरी महिलांना देण्यात आले. आता या महिला छोट्या उद्योजिका झाल्या असून, जवळच्या बाजारपेठा व शाळा या ठिकाणी त्यांच्या उत्पादनांसाठी मार्केट तयार झाले आहे.

कौटुंबिक जीवनमान उंचावले

प्रकल्पाचा परिणाम म्हणजे शेती उत्पादनात वाढ होतेच. शिवाय शेतकऱ्याचे कौटुंबिक जीवनमान उंचावले जाते. 
नाचणी व ज्वारी उत्पादकांच्या बाबतीत नेमके हेच घडते आहे. आपल्या कुटुंबाची अन्नसुरक्षा त्यांनी मिळवली आहेच शिवाय आर्थिकदृष्ट्याही ते स्वयंपूर्ण झाले आहेत. काहींना टुमदार घरे बांधणे शक्‍य झाले, तर काहींना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे समाधानही मिळू लागले आहे.

शेतकरी महिलांची धडाडी

1) तीन वर्षांपूर्वीची माझी ओळख एक मका उत्पादक अशी होती; परंतु अन्न आणि कृषी संघटना, केनया सरकार यांच्या प्रोत्साहनातून नाचणी पिकाकडे मी वळले. आता याच पिकाने माझी चांगली प्रगती केली आहे, अशी प्रतिक्रिया केनयातील पॅस्कीसिया वॅनयोन्यी या महिलेने व्यक्त केली आहे. 
पॅस्कीसिया आता परिसरातील अन्य शेतकऱ्यांची प्रशिक्षक झाली आहे आणि तिचा तिला अभिमान आहे. 
"मदर ऑफ फिंगर मिलेट' अर्थात नाचणीची आई म्हणून तिला शेतकरी ओळखतात.
2) युगांडा देशातील जॅकलीन ओमोंडी या महिलेने तर सुधारित तंत्रज्ञानाच्या आधारे उल्लेखनीय प्रगती केली आहे. अर्धा एकर क्षेत्राची मालकीण असलेल्या जॅकलीनने दीड एकरापर्यंत आपले क्षेत्र वाढवले आहे. पूर्वी एकरी केवळ दोन पोती नाचणीचे उत्पादन ती घ्यायची. आता हेच उत्पादन चक्क सात ते आठ पोत्यांपर्यंत पोचले आहे म्हणजे घरची अन्नसुरक्षा साधून बाजारात विक्री करणे तिला शक्‍य झाले आहे.
3) पामेला ही तर 27 वर्षांची युवा शेतकरी महिला. आर्थिक स्थैय मिळवत तिने दुसऱ्यांची शेती कसायला घेण्याचे नियोजन केले आहे. नाचणीची शेती करण्यापूर्वी मार्गारेटची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी फी देणेही शक्‍य नव्हते. मात्र सुधारित शेती प्रकल्पातून तिच्या जीवनात स्थित्यंतर आले आहे. तिच्या दोन्ही मुलांनी माध्यमिक शाळेचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे पती नोकरी करतात. पूर्वी कुटुंबाचा सारा आर्थिक बोजा त्यांच्यावर पडायचा. आता मार्गारेटचा हात संसाराचा गाडा हाकण्यासाठी लागतो आहे. आफ्रिकेतील शेतीत नक्कीच आश्‍वासक बदल घडताना दिसत आहेत. अजूनही काही समस्या आहेत. अडचणी आहेत. मात्र एकेकाळी आर्थिकदृष्ट्या गरिबीत जगणारी शेतकरी कुटुंबे आता शेतीतून समृद्धी फुलवू लागली आहेत. त्यांना तंत्रज्ञानाचा आधार मिळालाच; पण शेतीतील उर्मी जिवंत ठेवत हिमतीने त्यांनी आपत्तींचा सामना केला. त्याचे फळ या शेतकरी महिलांना मिळते आहे.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate