অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निगा गच्चीवरील बागेची

उन्हाळ्यात कॉंक्रिटच्या इमारती खूप तापतात, तर हिवाळ्यात त्या थंड पडतात. तापमानातील ही विषमता कमी करण्याचा टेरेस गार्डनिंग हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे उन्हाळ्यात झाडांमुळे गारवा निर्माण होतो, तर थंडीच्या वेळेला वातावरण उबदार राहण्यास मदत होते.

जागेची निवड


गच्चीवरील पृष्ठभाग हा टणक असतो. त्याचप्रमाणे ही जागा ऊन व वाऱ्याकरिता मोकळी असते, तर बाल्कनीतील जागेत दिवसातील अधिक काळ सावली असते. त्यामुळे गच्चीवर किंवा बाल्कनीत विविध प्रकारच्या कुंड्यांमधून झाडांची लागवड करता येते. बाग फुलविण्याआधी तेथील उपलब्ध जागेचा विचार करावा. जागेच्या भार सहन करण्याच्या क्षमतेचाही विचार करणे आवश्‍यक आहे. त्यानुरूप लागवडीसाठी कुंड्यांची निवड करावी. बाल्कनीला पुढच्या बाजूने लोखंडी ब्रॅकेट बसवून त्यावर फळ्या ठोकून जागा वाढवून त्यावर कुंड्या ठेवाव्यात. त्यामुळे कुंड्यांनाही भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होईल किंवा वेगवेगळ्या पातळीच्या कुंड्यांच्या स्टॅंडचाही वापर करावा.

कुंड्यांची निवड

  1. लागवडीकरिता सहसा मातीच्या कुंड्या, पेले, परळी, खोबडा इत्यादी आकारानुसार निवडून त्यांचा लागवडीकरिता वापर करावा.
  2. कॉंक्रिटच्या कुंड्या वजनाने भारी, उन्हात तापणाऱ्या असतात, म्हणून शक्‍यतो त्यांचा वापर टाळावा.
  3. त्याचप्रमाणे हलक्‍या कुंड्यांमध्ये प्लॅस्टिक किंवा फायबर ग्लासच्या कुंड्यांचाही वापर करावा.
  4. याशिवाय गच्चीवरील बागेत, चिनी मातीच्या नक्षीदार कुंड्या, लाकडी ठोकळे, काचेच्या बरण्या यांचाही लागवडीची भांडी म्हणून वापर करू शकता.
  5. कुंड्यांत लागवड केल्यास आवश्‍यकतेप्रमाणे त्यांना जागेवरून हलविणे सोयीचे जाते.

कुंडीत लागवड

कुंड्यांच्या बुडाशी पालापाचोळा टाकून एक भाग माती, एक भाग चांगले कुजलेले शेणखत आणि एक भाग वाळू यांचे मिश्रण तयार करून कुंडीत भरावे. त्यात आवडीनुसार झाडांची लागवड करावी. लागवडीनंतर कुंड्यांना हलके पाणी द्यावे.

झाडांची निवड

  1. खात्रीच्या विविध रोपवाटिकेतून ऋतुमानाप्रमाणे आकर्षक फुलांची, शोभिवंत झाडे विकत घ्यावीत.
  2. आपल्या गच्चीवरील परिस्थितीत वाढण्यास योग्य असलेल्या झाडांची निवड करावी.
  3. कळ्या घट्ट असलेली, निरोगी व सुदृढ झाडे विकत घ्यावीत.
  4. काही झाडांची अभिवृद्धी बियांनी होत असल्याने, त्यांचे निरोगी बियाणे विकत घेऊन लावावे.
  5. फुलझाडांकरिता - गुलाब, बेगोनिया, सेलोसिया (कोंबडा), फलॉक्‍स, डायन्थस, सालविया, शेवंती, डेहलिया, झेंडू, हेलीक्रायसम, हॉलीहॉक, कॅलेन्ड्यूला इ. झाडांची निवड करावी.
  6. शोभिवंत झाडांकरिता - अरेलिया, क्रोटॉन, कोलियस, डायफनबेकिया, ड्रेसिना, मनी प्लॅंट, मॉन्स्टेरा, ऍस्परेगस, पिलिया, कॅलथिया इ. झाडांची निवड करावी.

बागेची रचना

  • गच्चीवरील बाग तयार करताना कुंड्यांची मांडणी ही झाडांच्या उंचीप्रमाणे करावी. सुरवातीला उंच वाढणारे झाड पाठोपाठ कमी उंचीची झाडे ठेवावीत. जसजशी झाडांची वाढ होईल तसतसा रचनेत बदल करावा लागतो.
  • पाने, फुलांचा रंग पाहून आकर्षक रंगसंगती साधली जाईल, याप्रमाणे झाडांच्या कुंड्यांची रचना करावी.

झाडांची निगा

  1. झाडांना नियमित पाणी द्यावे. उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्ण झळा यामुळे झाडांची पाण्याची गरज वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात कुंड्यांना दोनदा पाणी द्यावे.
  2. उन्हाळ्यातील कडक उन्हापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गच्चीवर हिरव्या किंवा काळ्या शेडनेटची सावली तयार करावी, जेणेकरून झाडे टवटवीत राहतील. ही शेडनेट जाळी 25 टक्के, 50 टक्के आणि 75 टक्के सावलीच्या उपलब्धतेप्रमाणे मिळते. तेव्हा आवश्‍यकतेनुसार जाळी विकत घ्यावी.
  3. कुंड्यांना आवश्‍यकतेनुसार उकरी देऊन माती भुसभुशीत करावी व झाडांच्या मुळांजवळची हवा खेळती ठेवावी.
  4. झाडांतील रोगट व वाळलेल्या फांद्या वेळोवेळी काढून झाडे सुदृढ ठेवावी.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate