অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नेपिअर गवताच्या लागवड

संकरित नेपिअर चारापिकाचे संकरित वाण

संकरित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाण आहेत. यशवंत हा बहुवार्षिक, जास्त उत्पन्न देणारा आणि जायंट बाजरीचे गुणधर्म असलेला संकरित वाण आहे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणारी, दलदलीची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी टाळावी. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.

खत व पाणी व्यवस्थापन

  • संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पन्न देणारे असल्याने, शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
  • खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. तीन महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात. ठोंबे किंवा कांड्या 90 सें. मी. अंतरावरील सऱ्यांच्या बगलेत लावावेत. सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर 90 x 60 सें. मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.
  • लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी दर चार कापण्यांनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारापीक असल्याने, तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
  • गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें. मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सहा ते आठ आठवड्यांनी कराव्यात, म्हणजेच सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो.
  • प्रतिवर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारा 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate