অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉलीहाउस कार्नेशन लागवड

पॉलीहाउस कार्नेशन लागवड

जागतिक फुल मार्केटमध्ये कार्नेशनचा दुसरा नंबर लागतो.  सर्व जगभर मागणी आहे.  वजनान हलकी, काटक, हळुवार उमलणारी, काढणीनंतर जास्त दिवस टिकणारी आहेत.  पॉलीहाउसमध्ये कार्नेशनच दोन वर्षापर्यंत चांगल उत्पादन घेता येत.  स्टँडर्ड कार्नेशन आणि स्प्रे कार्नेशन स्टँडर्ड असे दोन प्रकार आहेत.  आपल्याकडे स्टँडर्ड कार्नेशनची लागवड केली जाते.  पांढऱ्या, लाल-पिवळ्या, गुलाबी, भगव्या रंगांच्या फुलांना मागणी जास्त आहे.

भरपूर सूर्यप्रकाश थंड-कोरडे हवामान मानवत.  उत्तम निचऱ्याची जमीन पॉलीहाउससाठी निवडावी लागते.  शेणखत + बारीक वाळू-लाल पोयाट्याच्या मातीने जमीन सपाट करून घ्यावी.  त्यानंतर, याच मिश्रणाने १०० से. मी.  रुंद आणि ४० से. मी.  उंचीचे गादीवाफे तयार करावेत.  दोन गादीवाफ्यात ५० से. मी.  अंतर ठेवावे.  यानंतर पॉलीहाउसमध्ये तापमान-नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण आणि पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा तयार करावी.  याचबरोबर पॉलीहाउसमध्ये टाकलेल्या मातीचा आणि गाडीवाफ्याच १०० प्रति. चौ. मीटर क्षेत्राला १० लिटर फॉरमॅलीन वापरून निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

अशा प्रकारे तयारी केल्यानंतर गाडीवाफ्यावर दोन रोपातल अंतर १५ से. मी.  ठेवून रोपाची लागवड खोलवर करू नये.  रोपाच्या पिटचा १/४ भागच खड्ड्यांत लावावा.  बाकीच्या ३/४ भागाला माती लावावी.  लावताना आणि नंतर आठवडाभर पॉलीहाउस बंद ठेवावे.  लागवड करताना काही मुद्दे लक्षात ठेवावेत.  ते म्हणजे

  • गादिवाफ्यासाठी चांगल्या प्रतीची लाल माती + शेणखत वापराव.  यात भाताचं तूस वापरण्यास विसरू नये.
  • गादीवाफे फॉरमॅलीनन निर्जंतुक करून घ्यावेत आणि पाण्याने धुऊन घ्यावेत.
  • निर्जंतुकीकरण केल्यावर १५ दिवसांनी वापसा आल्यावर रोपाची लागवड करावी.
  • गादीवाफ्यावर ठीबकच्या लॅटरल – उपनळ्यांची मांडणी करून घ्यावी.
  • लागण झाल्यानंतर बुरशीनाशक द्रावण रोपांना द्यावे.
  • लागणीपूर्वीच आधारासाठी पहिल्या दोन जाळ्या बसवून घ्याव्यात.
  • तीन आठवडे हलकेसे पाणी द्यावे.

रोपांना आधार देण्यासाठी जी-आय तारेच्या ४ जाळ्या एकावर एक बसवून घ्याव्यात म्हणजे रोपांना चांगला आधार देता येतो.  जाळीच्या प्रति चौ. मीटर क्षेत्रात कार्नेशनची ४० रोपे बसतात.  पाणी ठिबकन रोज १० ते १५ मिनीट द्यावे.  ४० ते ८५% आर्द्रता असावी लागते.  कार्नेशनची लागवड केल्यानंतर १५ ते २५ से. मी. उंचावर ३-४ आठवड्यांनी रोपांचा शेंडा खुडावा.  त्यामुळे बाजूच्या फुटव्यांची वाढ होते आणि इकाच रोपावर अनेक फुले घेता येतात.  शेंडा खुडल्यानंतर बाविस्टीकची फवारणी करावी.  शेंडा  खुडनिबरोबरच शेंद्याकडची मुख्य कळी ठेवून बाकीच्या उपकळ्या खुडून टाकाव्यात म्हणजे फुल चांगल पोसत.  कळी खुडण्याचे काम सतत कराव लागत.  प्रति १०० चौ. मीटर क्षेत्राला लागवडीच्या वेळी १२:६:१८ ५ किलो, कॅल्शियम नायट्रेट २.५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट २.५ किलो, बोरॅक्श पावशेर आणि १९:१९:१९ २०० ग्रॅम वापरावे.  महिन्या-दोन महिन्यांनी याच खताच प्रमाण कमी करून हप्ते द्यावेत.  विद्राव्य स्वरुपात ठीबकद्वारे हि खाते द्यावीत.

मर आणि खोडकुजीसाठी २ ग्रॅम रिडोमिल तसेच बाविस्टीन २ ग्रॅम + १ लिटर पाणी याचा ड्रेचिंग कराव.  कोम्बकुज आणि पानावरच्या ठीपक्यासाठी २ ग्रॅम कॅप्टन, तसेच डायथेन एम ४५ १ ग्रॅम + १ लिटर पाणी यांच्या द्रावणाच्या फवारण्या कराव्यात.  मावा फुलकिडे, लाल कोळी, कळी  पोखरणारी अळी, सुत्रकृमी यांच्या नियंत्रणासाठी १५ मि. लि. न्युआन, १.५ मि. लि. अंबुस, १ मि. लि. डायकोफॉल आणि ४० ग्रॅम निमकेक अगर ३ मि. लि. सुझान + १ लिटर पाणी याची फवारणी करावी.

कळीच्या रंगछटा दिसू लागताच जमिनीपासून २० से. मी. अंतरावर दांड्यासह फुलांची काढणी करावी.  सिल्वर थायोसल्फेट याचा पाण्यामध्ये वापर करून त्या बादलीत खुलांचे दांडे ठेवावेत.  दोन दोन दिवसांनी काढणी करावी.  प्रति चौ. मीटरला २५० फुलांचे उत्पादन मिळत.

काढणीनंतर रंग, दांड्याची लांबी, आकारमान, अवस्था अशा बाबीचा विचार करून प्रतवारी करावी.  २० फुलांचा बंच करून त्याला शीत गुंडाळावे.  बंच कोरुगेटेड बॉक्समधून बाजारात पाठवावेत.  ५०० चौ. मी. (५ गुंठे) क्षेत्रफळाच्या पॉलीहाउस उभारणीसाठी + कार्नेशन लागवडीसाठी ४ ते ४.५ लाख रुपये खर्च येतो.  खर्चवजा जाता पहिल्या वर्षी कार्नेशनपासून १ लाख, तर दुसऱ्या वर्षी ५ लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो.

 

स्त्रोत - कृषी प्रवचने प्रल्हाद यादव


अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate