অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुस्तक परिचय

पुस्तक परिचय

कोकणामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा धो-धो पाऊस, जागोजागी कोसळणारे धबधबे, हिरवेगार डोंगर सर्वांनाच भुरळ घालतात. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून याच परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवते. ही समस्या विचारात घेऊन त्यावर कोणकोणते उपाय योजता येऊ शकतात, याचा वेध डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी ‘कोकणचं पाणी ः समस्या आणि उपाय’ या पुस्तकामध्ये घेतला आहे. या पुस्तकाविषयी आणि कोकणातील पाणी प्रश्‍नाविषयी कल्पना यावी, याकरिता ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची सदर पुस्तकातील अभ्यासपूर्ण प्रस्तावना प्रसिद्ध करीत आहोत...

पुस्तकाचे  नाव- कोकणचं पाणी : समस्या आणि उपाय

लेखक - डॉ. श्रीरंग कद्रेकर भ्र. 9881 2855 42

प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन पाने - 72 किंमत - 100 रुपये

कोकणातील पाण्याची नैसर्गिक विपुलता ही बरीचशी वर्षाऋतूपुरती मर्यादित आहे. पावसाळ्यानंतर ती एकदम घटते व उन्हाळ्यात तर स्थानिक पाणी टंचाईलाही तोंड देण्याची वेळ आणते. म्हणून केवळ वार्षिक पाऊस, त्यातून मिळणार्‍या एकूण पाण्याची दरडोई किंवा दर हेक्टरी उपलब्धता या हिशोबावर विकासाची मांडणी अवलंबून ठेवता येत नाही. नेमकी काय उपाययोजना केली म्हणजे निसर्गातील या विषमतेवर मात करता येईल व कोकणातील शेतीमधील,  नागरी जीवनातील आणि औद्योगिक क्षेत्रातील वर्षभराचे व्यवहार निर्विघ्नपणे पार पडतील; ज्यातून निसर्गातील अधिकाधिक पाण्याचे ऐहिक समृद्धीत रूपांतर होईल, याचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉ. कद्रेकरांनी गेली चाळीसहून अधिक वर्षे सातत्याने केला आहे.

‘शेती’ हा डॉ. कद्रेकरांच्या विशेष जिव्हाळ्याचा, अभ्यासाचा व क्षेत्रीय संशोधनाचाही विषय आहे. शेतीच्या विकासाशी जलव्यवस्थापन घट्ट निगडित आहे, याबाबतच्या त्यांच्या प्रदीर्घ चिंतनाचे सार त्यांनी संक्षेपात मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

कोकणची जी वैशिष्ट्यपूर्ण डोंगराळ भूपृष्ठीय रचना आहे,  त्यात नदी नाल्यांच्या मुखाची खाजणं आहेत, भूस्तर आहेत, जांभ्या दगडाचे वेगळेपण आहे, भूजलाची मर्यादा आहे. या पार्श्‍वभूमीवर कोकणातील शेतीची सुयोग्य रचना कशी व्हायला हवी, यावर
डॉ. कद्रेकरांनी प्रकाश टाकला आहे.

वर्षाऋतूत वाहून जाणार्‍या पाण्याची विपुल साठवण करून ठेवणे, हा तर विकास व्यवस्थेचा प्राथमिक आधार राहणारच आहे; पण त्यानंतर त्या पाण्याचे उचित पद्धतीने वहन व वितरण नीट घडवून आणणे व अतंत: अशा पाण्याचा सुयोग्य असा मूल्यदायी वापर होणे, यावर कोकणातील समृद्धीची निर्मिती अवलंबून राहील. त्यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक लागणार आहे. त्याबरोबरच पाणी वापराचे स्थान-विशिष्ट व्यवस्थापन कौशल्यही पणास लागणार आहे. भांडवली गुंतवणुकीच्या पार्थिव स्थापत्य रचना म्हणजे धरणे-कालवे-नळ, या वर आजपर्यंत पुष्कळ खर्च कोकणात झाला आहे. अशा पार्थिव विस्तारांसाठी आणखीही फार मोठा खर्च कोकणात येत्या दशकांमध्ये करीत राहावा लागेल; पण हे सारे पाणी फार खर्चिक आहे, याची जाणीव ठेवून त्याचा उपयोग करावा लागेल. पाण्याच्या प्रतिघनमीटर वापरात अधिकाधिक लाभ देणारी पीक पद्धती चोखंदळपणे व्यवहारात उतरवावी लागेल.

कोकणामध्ये ठिकठिकाणी करावयाच्या पाणी साठवणीमधून उपलब्ध व्हावयाचे पाणी भरपूर असेल; पण साठवणीच्या अतिरिक्त खर्चामुळे ते फार महाग असेल. त्यामुळे त्यातून उत्पादन करावयाच्या पिकांचे उत्पादन व अखेरीस बाजारातून मिळणारा परतावा त्याप्रमाणात चांगला भरीव हवा. कोकणातील फलोद्यान विकासात या दृष्टीने अनेक नवे प्रयोग यशस्वी होत आहेत. मात्र, या दिशेने आणखी प्रगती व्हायला हवी. त्यासाठी डॉ. कद्रेकरांच्या याबाबतीतल्या सूचनांचा पाठपुरावा निश्‍चितच उपयुक्त ठरेल.

गवत हे सुद्धा जमिनीतून मिळणारे एक महत्त्वाचे उत्पादन असून, ते कोकणात मुबलकपणे उपलब्ध आहे. कोकणात त्याची निसर्गत: दाट वाढ होते. त्याला पावसाळ्यानंतरही पाण्याचा वाढता आधार देऊन त्याची गुणवत्ता व उपयुक्तता पुष्कळ वाढवता येईल. त्यातून आर्थिक मिळकतीचा एक वेगळा स्रोत उभा राहू शकेल. 30 टक्क्यांहून जास्त उताराचे क्षेत्र कोकणात फार मोठे आहे. त्याचा लाभदायी उपयोग करण्यासाठी कुरण विकास व वनीकरण यांच्या स्वतंत्र व्यवस्थापन धारा ‘पाणलोटश: पंचक्रोशीश:’ आकाराला यायला पाहिजेत. सामाजिक आणि प्रशासकीय संघटन कौशल्याची मोठी कसोटी या कामातून लागणार आहे. कुरण विकासासाठी, वृक्ष संवर्धनासाठी व वनीकरणासाठी कोकणचे डोंगरी क्षेत्र अनुकूल आहे. मात्र, केवळ शासकीय चौकटीत व शासकीय छत्राखाली ते घडून येईल, असे दिसत नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सामाजिक व्यवस्थांची कृतिशील जोड मिळणे अत्यंत आवश्यक राहील.

डॉ. कद्रेकर ‘महाराष्ट्र जलसिंचन आयोगा’चे सदस्य होते. त्या आयोगाच्या अहवालातील दुसर्‍या खंडामध्ये कोकणातील खोर्‍यांसंदर्भात विस्तृत मांडणी करण्यात आली आहे. त्या मांडणीत डॉ. कद्रेकरांचा मोठा सहभाग होता. तेथील सगळ्या विवेचनाचे सार अधिक नेटकेपणाने डॉ. कद्रेकरांनी ‘कोकणचं पाणी ः समस्या आणि उपाय’ या आपल्या पुस्तकात मांडला आहे. कोकण विकासासाठी प्रयत्नशील असणार्‍या सर्वांना त्या मांडणीचा चांगला उपयोग होईल.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कोकणातील जलविकासाच्या रचनांमध्ये नव्याने मोठी भर पडली आहे. त्यासाठी वैचारिक, तांत्रिक परिवर्तनेही झाली आहेत. कोकणात मोठी धरणे बांधता येतील का विशेषत: मातीची मोठी धरणे बांधली, तर ती टिकतील का अशा संदेहात्मक प्राथमिक अवस्थेतून बाहेर पडून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेकडो मोठी धरणे कोकणात यशस्वीपणे उभी आहेत. पाण्याच्या क्षेत्रीय वितरणाच्या नव्या नलिका प्रणाली शेतीसाठी यशस्वी ठरत आहेत. त्यांचे मोठे जाळे हा कोकणच्या विकासाचा भविष्यात मोठा आधार ठरणार आहे, याबाबतचे डॉ. कद्रेकरांचे मार्गदर्शक विचार या पुस्तकात दिले आहेत. त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचे अनुभवसिद्ध फलित त्यात व्यक्त झालेले आहे.

यापुढे एकंदरीनेच कोकणातील विकासाच्या जडणघडणीत सर्वत्र एकाच प्रकारच्या साचेबंद रचनांवर किंवा अन्य भौगोलिक क्षेत्रांच्या अनुकरणावर अवलंबून राहता येणार नाही. प्राकृतिक रचनेतील विविधतेमुळे प्रयोगशीलतेची वाढती गरज राहणार आहे. अशा प्रवृत्तीला कोकणात खूप वाव राहील. अशा प्रयत्नांना सर्वांकडून प्रोत्साहन असावे लागेल. गेल्या दोन दशकांत कोकणातच विकसित झालेली भूपृष्ठाखालील सिंचनाची ‘झिरपा पद्धत’ या दिशेने चांगली प्रगती करत आहे. तसे अनेक पर्याय स्थानपरत्वे पुढे यावे लागतील. पाण्यावर निर्माण होणार्‍या विजेला युरोपात ‘सफेद सोने’ असे म्हटले जाते. स्वित्झर्लंड व स्वीडन हे देश अशी वीज युरोपातील इतर देशांना विकूनच श्रीमंत झाले.

दक्षिण आशियात आज भूतानही त्यांचे अनुकरण करीत आहे. तशी क्षमता कोकणातील विपुल जलसंपत्तीत दडलेली आहे. तिचा शक्य तेवढ्या प्रमाणात बारमाही, हंगामी अथवा केवळ स्थानिक वीज पुरवठ्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेणे अगत्याचे ठरेल. जागतिक पर्यावरणीय जागृतीच्या युगात अशा जलविद्युत प्रकल्पांचे महत्त्व अधिकच आहे. त्या दिशेने जाण्यासाठी रूढ पद्धतीच्या वीजनिर्मिती व वितरण व्यवस्थांऐवजी विकेंद्रित व तात्कालिक पुरवठ्याच्या वीज व्यवस्थांना प्रोत्साहन द्यावे लागेल. विजेच्या हंगामी देवाणघेवाणीच्या तत्त्वांवर इतर प्रदेशातील वीज व्यवस्थांना कोकणातील व्यवस्था पूरक ठरू शकतील.

खाजण जमिनीतील कृषी विकास, त्याच्या जोडीला खाड्यांची मुखे बांधून होणारी गोड्या पाण्याची साठवण, औद्योगिक विस्तार व किनारी वाहतूक यांची एकत्रित तांत्रिक व आर्थिक गुंफण दक्षिण कोरियाने त्यांच्या कोकणसारख्या प्रदेशात करून दाखवली आहे. त्यातून कोकणाला खूप शिकण्यासारखे आहे. प्रगत श्रीमंत देशांच्या यादीत आता स्वत:लाही मानाचे स्थान मिळवल्यानंतर कोरिया आपल्या देशातील स्थानिक अनुभवाचा उपयोग इतरांना देऊ इच्छित आहे. पर्वतीय किनारपट्टीच्या चिंचोळ्या खोर्‍यांच्या विकासाचे समन्वित नियेाजन हे कोरियाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा अधिक अभ्यास कोकणातील विद्यापीठातून व महाविद्यालयांतून झाला, तर त्या धर्तीच्या विकास व्यवस्थांना कोकणात चालना मिळू शकेल. कोकणच्या चिंचोळ्या भूपट्टीत व चिंचोळ्या खोर्‍यांमध्ये विकास व्यवस्थांची पंजाबप्रमाणे विस्तारित क्षेत्रीय सलगता शक्य नसल्याने छोट्या छोट्या आकाराच्या विविध उपायांची समन्वित एकत्रित मांडणी महत्त्वाची ठरणार आहे. त्या दिशेने यापुढील नियोजन व्हावे लागेल.

अशा प्रकारच्या भविष्यातील उपक्रमांना मोठा तात्विक व वैचारिक आधार देण्याचे काम डॉ. कद्रेकरांच्या प्रस्तुत पुस्तकामुळे घडून येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक मंचावर व पंचायत व्यवस्थेमध्ये या पुस्तकाचे वारंवार परिशीलन होत राहील, अशी आशा करू या.

 

स्त्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate