অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोगॅस संयंत्राची काळजी

बायोगॅस संयंत्राची काळजी

  1. ज्या संस्थेमार्फत बायोगॅस बांधकाम केले जाणार आहे ती संस्था आपणास पाच वर्षे आपले संयंत्र सुस्थितीत व कार्यरत ठेवण्याबाबतचे हमीपत्र लिहून देणारी आहे आणि सदरची संस्था कोणती आहे, याची शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी. त्यांचा पूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक शेतकऱ्यांकडे असणे आवश्‍यक आहे.
  2. बायोगॅस संयंत्रास आय.एस.आय. मार्क असलेली शेगडी जोडणे आवश्‍यक आहे. शेगडीची छिद्रे अधूनमधून स्वच्छ करावीत.
  3. गॅसचा वापर करताना घरामध्ये न जळालेल्या गॅसचा वास आल्यास गॅस गळती आहे, असे समजून सर्व दारे, खिडक्‍या उघड्या करून न जळालेला गॅस घराबाहेर घालवावा. तोपर्यंत काडी पेटवू नये अगर दिवे वगैरे लावू नयेत.
  4. शेगडी पेटवतेवेळी आगपेटीची काडी पेटवून बर्नरवर धरावी, त्यानंतर शेगडीचे बटण चालू करून शेगडी पेटवावी.
  5. खताचा खड्डा मधूनमधून साफ करावा. खताचे किमान दोन खड्डे करावेत. त्यांचा आळीपाळीने वापर करावा. खड्ड्यातील शेणाची पातळी नेहमी आऊटलेटमधून शेण बाहेर पडण्याच्या सांडीपेक्षा कमी असावी, म्हणजे शेणाची रबडी सहजरीत्या बाहेर पडेल.
  6. संयंत्राच्या आऊटलेटवर फरशीचे झाकण घालणे बंधनकारक आहे. कारण संयंत्राचे आऊटलेट उघडे राहिल्यास त्यामध्ये पशू-पक्षी, माणसे वगैरे पडून धोका होण्याची शक्‍यता असते.
  7. आपणाकडे उपलब्ध असलेली जनावरे, व्यक्ती यांचा विचार करूनच संयंत्राची क्षमता ठरविण्यात यावी.
  8. दररोज आपणाकडे उपलब्ध असलेले शेण व तेवढेच पाणी घालून त्याचा शेणकाला करून संयंत्रामध्ये सोडावा. थंडीच्या दिवसांत शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा.
  9. शेणाशिवाय स्वयंपाकघरातील खरकटे, भाजीपाल्याचे अवशेष यांचे लहान भाग करून घातले तरी चालू शकते.
  10. गॅसवाहक पाइपमध्ये हवेचा गारवा लागल्यास पाणी होते, त्यासाठी गॅसवाहक पाइप शक्‍यतो एका बाजूने उतरता जोडावा. ज्या ठिकाणी गॅसवाहक पाइप वाकलेला (बेंड झालेला) असेल त्या ठिकाणी पाणी काढण्याची नळी जोडावी. नळीतून मधूनमधून नियमित पाणी काढावे.
  11. गॅस वापरतेवेळी शेगडी भडकू लागली अगर निळ्या ज्योतीऐवजी ज्योत तांबडी पेटू लागली किंवा भांडी काळी पडू लागली, तर पाइपमध्ये पाणी साठलेले आहे असे समजावे व त्वरित पाणी बाहेर काढून घ्यावे.
  12. बायोगॅसला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करताना फिनेल, जंतुनाशके, साबण, सोडा, डिटर्जंट पावडर इत्यादी रासायनिक द्रव्यांचा वापर करू नये. राखेने शौचालय स्वच्छ करावे.
  13. शेगडी वापरात नसेल तेव्हा किंवा रात्री संयंत्रावरील मुख्य व्हॉल्व्ह बंद करावा.
  14. स्वयंपाक करून गॅस शिल्लक राहत असेल तर बायोगॅसवर चालणाऱ्या दिव्याचा वापर करावा. स्वयंपाकाशिवाय प्रकाश, वीजनिर्मितीकरिताही बायोगॅसचा वापर करता येतो.

 

संपर्क - श्री. आजगेकर - 9421472229

कृषी अधिकारी (बायोगॅस), जिल्हा परिषद, कोल्हापूर.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate