অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भौगोलिक चिन्हांकन - जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार

भौगोलिक चिन्हांकन - जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार

जी. आय. हा शेतमालाचा सर्वांत महत्त्वाचा क्वालिटी मार्क (गुणवत्ता प्रमाणनिकष) आहे. त्यात अनेक गोष्टी विचारात घेतलेल्या असतात. विशेषतः त्या भागाला निसर्गाकडून लाभलेले वातावरण, तेथील माती, पाणी, पावसाचे प्रमाण आदी बाबींचा समावेश असतोच; पण या उपलब्ध घटकांचा योग्य उपयोग करून घेऊन इतरांपेक्षा सरस ठरू शकणारे उत्पादन तयार करण्याचे काम तिथला स्थानिक शेतकरी समूह करतो. त्या भागातील शेतकरी समूहाला ‘सामूहिक बौद्धिक संपदा’ दिली जाते...

अलीकडील काळात ’बौद्धिक संपदा’ ही संकल्पना नव्याने रुजू पाहत आहे. ’बौद्धिक संपदा’ म्हणजे बुद्धीच्या वापरातून निर्माण झालेली संपत्ती. अशी संपत्ती पेटंट (एकस्व), कॉपीराइट (स्वामित्व हक्क) आणि ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) या प्रकारात मोडते. यातील पेटंट (एकस्व) हे संशोधनातून निर्माण झालेल्या संपत्तीसाठी घेतले जाते, लेखनाच्या संदर्भात कॉपीराइट (स्वामित्व हक्क) तर एखाद्या कंपनीच्या नावाचे संरक्षण करण्याच्या हेतूने ट्रेडमार्क घेतला जातो. याचप्रमाणे बौद्धिक संपदेचा आणखी एक प्रकार अस्तित्वात आला आहे तो म्हणजे ’भौगोलिक चिन्हांकन’ (Geographical Indication) म्हणजेच ’जी. आय.’ होय. शेतकर्‍यांच्या दृष्टीने ही बौद्धिक संपदा महत्त्वाची भूमिका बजावते.

जी. आय. -  शेतमाल उत्पादनाचा क्वालिटी मार्क (गुणवत्ता प्रमाणनिकष)

एखादा विशिष्ट पदार्थ किंवा एखादे विशिष्ट उत्पादन एखाद्या विशिष्ट भागातून आलेलेे असेल आणि तो पदार्थ किंवा ते उत्पादन त्या विशिष्ट भागाचे प्रतिनिधित्व करत असेल, तर त्याला भौगोलिक मानांकन कायद्याअंतर्गत बौद्धिक संपदेचा दर्जा दिला जातो. हा दर्जा केंद्र सरकारकडून त्या उत्पादनासाठी, त्या जागेसाठी आणि तिथल्या उत्पादक समूहासाठी देण्यात आलेला क्वालिटी मार्क (गुणवत्ता प्रमाणनिकष) असतो. या क्वालिटी मार्कमुळे (गुणवत्ता प्रमाणनिकषामुळे) उत्पादनाचे विपणन उत्तम प्रकारे करता येते. त्यातून आर्थिक फायदा मिळवता येतो. जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांकडे पाहण्याचा एकूणच दृष्टीकोन बदलतो.

जी. आय. हा शेतमालाला दिला जाणारा महत्त्वाचा क्वालिटी मार्क (गुणवत्ता प्रमाणनिकष) आहे. त्यात अनेक घटकांचा विचार करण्यात आलेला असतो. जसे की, त्या विशिष्ट भागाला निसर्गत: लाभलेले वातावरण, तिथली माती, तिथले पाणी, पावसाचे प्रमाण इत्यादी. या घटकांचा सुयोग्य वापर करून इतरांपेक्षा सरस ठरू शकणारे उत्पादन तयार करण्याचे काम तिथल्या स्थानिक शेतकरी समूहाकडून केले जाते. अशा शेतकरी समूहांना ‘सामूहिक बौद्धिक संपदा’ दिली जाते.

जगभरातील जी. आय. मानांकनप्राप्त वस्तू

भारतामध्ये जी. आय. नोंदणी कायदा सन 2001नंतर आला. युरोपात व अन्य प्रगत देशांमध्ये जी.आय.विषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता आहे. जी. आय.नोंदणीमुळे तेथील शेतकर्‍यांना आर्थिक संपन्नता प्राप्त झालेली आहे. आशिया-आफ्रिका खंडांतील अप्रगत देशसुद्धा जी. आय.च्या बाबतीत जागरूक झालेले आहेत. जी. आय. मानांकन मिळाल्यानंतर अतिशय यशस्वीपणे जागतिक बाजारपेठ काबीज केलेल्या काही वस्तूंविषयी जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्रातील वस्तू जागतिक बाजारपेठेत आणण्यासाठी एक प्रकारची दिशा मिळू शकेल.

  1. - स्विस चॉकलेट - चॉकलेटसाठी आवश्यक असणार्‍या कोकोआ बिन्सचे उत्पादन स्वित्झर्लंडपासून दूर उष्ण प्रदेशात घेतले जाते. चॉकलेट तयार करण्याची 200 वर्षांची परंपरा, उत्कृष्ट चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्याची हातोटी साधून स्वित्झर्लंडमधील ‘स्विस चॉकलेट’ने जी. आय. मानाकनांमुळे जागतिक बाजारपेठेत भक्कमपणे पाय रोवले आहेत. चॉकलेटचे वार्षिक उत्पादन सुमारे 1 लाख 79 हजार 61 टन आहे. त्यापैकी 60-70 टक्के उत्पादन निर्यात केले जाते.
  • - मेलिंडाचे सफरचंद - उत्तर इटलीच्या त्रेन्तो प्रांतातील वाल दि नोन खोर्‍यामधल्या विशिष्ट प्रकारच्या हवामानामुळे इथल्या सफरचंदाला विशिष्ट चवीबरोबरच विशिष्ट रंगही प्राप्त झाला आहे. या भागात सुमारे दोन हजार वर्षांपासून सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. या सफरचंदांची मागणी वाढल्यानंतर, या फळाला वेगळी बाजारपेठ व वेगळी ओळख मिळावी यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन प्रयत्न करून मेलिंडा या नावाने जी. आय. मानांकन प्राप्त केले. या फळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण झाली. याची वार्षिक उलाढाल सुमारे दोनशे दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी वाढली.
  • - चेरीमोया कुंबे - दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅन्डियन स्टेट्समधील काही राष्ट्रांमध्ये घेतले जाणारे चेरीमोया कुंबे हे फळ मूळचे पेरू देशातील आहे. येथील हवामानामुळे फळाची चव आणि पौष्टिकता उच्च दर्जाची आहे. जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ब तसेच उच्च पोटॅशिअमची पातळी यांमुळे हे फळ अधिक आरोग्यदायी मानले जाते. या फळाला जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे तब्बल 80 टक्क्यांपर्यंत या फळाची निर्यात वाढली.
  • - ओकूचा पांढरा मध - आफ्रिकेतील कॅमेरून देशात ओकू या पांढर्‍या मधाचे उत्पादन घेतले जाते.  मधुमक्षिकापालन हा तिथला पारंपरिक व्यवसाय आहे. या पांढर्‍या मधाला जी. आय. मानांकन लाभल्यामुळे उत्पादनात 40 टक्क्यांनी,  तर किमतीमध्ये तीन पटींनी वाढ झाली.
  • - इथिओपिअन कॉफी - इथिओपिया या देशाला कॉफीच्या निर्यातीमधून सर्वांत जास्त म्हणजेच जवळपास 60 टक्के उत्पन्न मिळते. कॉफीच्या उद्योगात गुंतलेल्या मनुष्यबळाची संख्यासुद्धा पंधरा दशलक्ष इतकी जास्त आहे. इथिओपिअन कॉफी या उत्पादनाला भौगोलिक मानांकन लाभल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये दुपटीतिपटीने वाढ झाली आहे.
  • - नेपाळचा चहा - प्रतिकिलो दहा हजार रुपये इतक्या महागड्या दराने चहा विकण्याची किमया नेपाळने साधली, ती जी. आय. मानांकनाआधारेच. नेपाळमध्ये पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर चहाची लागवड करण्यात आली असून वार्षिक उत्पादन 11.7 दशलक्ष किलो इतके आहे. चहाचे मळे असणारी ही ठिकाणे आज पर्यटनकेंद्रे बनली आहेत.
  • - जमैका कॉफी - आफ्रिका खंडातील जमैका या देशातील कॅरेबिअन बेटांच्या पूर्वेकडील प्रदेशात नील पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांमधील पर्जन्यमान, धुके आणि नैसर्गिक परिस्थिती कॉफी लागवडीसाठी उपयुक्त आहे. इथल्या हवामानामुळे कॉफीबिन्सना (कॉफीच्या बियांना) चांगला आकार, मनमोहक सुंगध यांच्याबरोबरच खास चव प्राप्त होते. या उत्पादनास जी. आय. मानांकन लाभले. त्यानंतर या उत्पादनास जगभर चांगली किंमत मिळू शकली.
  • - लौकोमी मिठाई - युरोप आणि आशिया खंडांतील देश म्हणून गणल्या जाणार्‍या सायप्रस देशातील लौकोमी ही एक लोकप्रिय मिठाई आहे. जी. आय. मानांकनासाठी सन 2007मध्ये युरोपातील या मिठाईची नोंदणी झाली. लौकोमीचे उत्पादन कित्येक वर्षांपासून एकाच पद्धतीने घेतले जात असल्याने एक पारंपरिक पदार्थ म्हणून या पदार्थाला ‘संरक्षित भौगोलिक चिन्हांकन’ (Protected Geographical Indication) देण्यात आले. (पी.जी.आय. हे युरोपीय देशातील भौगोलिक मानांकन आहे.) या पदार्थाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.  छोट्या उत्पादकांना युरोपसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली.
  • - कोस्टारिका केळी - उष्ण हवामान, पाऊस, विशिष्ट भौगालिक वारसा आणि शेतीच्या परंपरा यांमुळे कोस्टारिका येथील केळी वैशिष्ट्यपूर्ण असून ‘कोर्बाना’ संस्थेच्या पुढाकारातून या देशातील केळीला ‘बनानो ऑफ दि कोस्टारिका’ या नावाने जी. आय. प्राप्त झाले आहे. जी. आय. मानांकन लाभल्यामुळे येथील केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली असून आज केळी निर्यातीत कोस्टारिका जगात तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. येथील वाढते उत्पादन आणि वाढती निर्यात यांचा भरपूर आर्थिक फायदा तर केळी उत्पादकांना झालाच, पण सुमारे 45,000 लोकांना प्रत्यक्षरीत्या रोजगार प्राप्त झाला आहे.
  • - स्कॉच व्हिस्की - स्कॉटलंडमध्ये पाचशेपेक्षा जास्त वर्षांपासून स्कॉच व्हिस्कीचे उत्पादन स्थानिक व्यवसायिकांकडून घेण्यात येते. ही व्हिस्की बार्लीपासून तयार केली जाते. स्कॉटलंड देशाला लाभलेले थंड हवामान आणि व्हिस्की तयार करण्याची पारंपरिक पद्धत यामुळे या व्हिस्कीला जी. आय. देण्यात आले. स्कॉटलंडमधून दरवर्षी या व्हिस्कीचे नव्याण्णव दशलक्ष बॉक्स (एक बॉक्स = बारा बाटल्या) निर्यात होतात. जी. आय. नोंदणीमुळे या व्हिस्कीला जागतिक प्रसिद्धीबरोबरच जागतिक संरक्षणही प्राप्त झाले.
  • - द्राक्ष वाइन - ब्राझीलमधील रिओ ग्रान्दे दो सुल या भागातील हवामान समशीतोष्ण आहे. तिथे चारही हंगामांत पाऊस पडतो. त्यामुळे द्राक्षांची चव वेगळी बनते. या द्राक्षांपासून निर्माण होणार्‍या वाइनला तेथील वाइन उत्पादक असोसिएशनच्या पुढाकारातून जी. आय. मिळाले. त्यामुळे वाइन निर्यातीमध्ये ब्राझील आघाडीवर जाऊ शकले.
  • - चाचा वाइन - जॉर्जिया देशातील पोषक माती आणि तिथले वातावरण, तसेच पारंपरिक शेतीपद्धती  इत्यादी घटक द्राक्षलागवडीसाठी अनुकूल आहेत. त्यामुळे येथे हजारो वर्षांपासून द्राक्षांची लागवड केली जाते. त्याचबरोबर हा देश वाइनचा जगातील सर्वांत जुना पुरवठादार प्रदेश म्हणून ओळखला जातो.  येथील चाचा वाइन हे जॉर्जियाचे पारंपरिक आणि राष्ट्रीय पेय म्हणून ओळखले जाते. 2011मध्ये या पेयाला जी. आय. मानांकन मिळाल्यानंतर देशातील वाइन व्यवसायाला गती मिळाली आहे.
  • - टकीला - ब्ल्यू अगावे पिकावर प्रक्रिया करून पारंपरिक पद्धतीने हे पेय तयार केले जाते. सुमारे दोनशेहून अधिक वर्षांपूर्वीपासून मेक्सिकोमध्ये ब्ल्यू अगावे हे पीक घेतले जाते. जी. आय. मानांकन मिळाल्याने आज या पेयाची निर्यात 64.6 दशलक्ष लीटरहून 146.4 दशलक्ष लीटरपर्यंत पोहोचली आहे.

जगभरातील अशा विविध उत्पादनांना भौगोलिक चिन्हांकन लाभल्यामुळे निर्यातीबरोबरच शेतकर्‍यांना आणि अन्य उत्पादकांना अतिरिक्त उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. हे लक्षात घेऊन भारतानेही आता त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केवळ जी. आय.पुरते मर्यादित न राहता आपल्या देशातील दार्जिलिंगच्या चहाला युरोपीयपन युनियनचे ‘संरक्षित भौगोलिक मानांकन’ (PGI) मिळवले आहे. त्यामुळे या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लाभली, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उत्पादनाचे अद्वितीय स्थान टिकून राहावे यासाठी आवश्यक ते संरक्षणदेखील मिळवले आहे.

जी. आय. प्राप्त झालेले किंवा त्या प्रतीक्षेत असलेले किंवा त्या यादीपर्यंत अद्याप न पोहोचलेले असे असंख्य पीकवाण आणि त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थ देशभरात विशेषतः महाराष्ट्रात आहेत. अशा आपल्या भोवतालातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना जी. आय. मानांकन यादीत आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील लोणावळा चिक्की, नाशिकची द्राक्षे, सातार्‍याचे कंदी पेढे, कोल्हापूरचा गुळ हे पदार्थ जी. आय. मानांकनासाठी पात्र आहेत. जागतिक बाजारपेठेत स्वतःची एक ओळख निर्माण करून देण्याचा मार्ग या उत्पादनांसाठीही आता खुला झाला असून त्याचा फायदा त्या-त्या भागातील लहानातील लहान उत्पादकांना कसा करून देता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

जी. आय. मानांकित उत्पादन ओळखण्याची खूण म्हणजे त्या उत्पादनाला मिळालेले बोधचिन्ह (जी. आय. लोगो). मात्र जी. आय.चा लोगो ही अस्सल (ओरिजनल) पदार्थ ओळखण्याची महत्त्वाची निशाणी आहे याबाबत देशातील 95 टक्के ग्राहक अजूनही अनभिज्ञ आहेत. याबाबतही जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. थोडक्यात जी. आय. या बौद्धिक संपत्तीच्या अधिकाराविषयी जागरूकता वाढवणे; ग्रामीण भागातील कारागिरांना, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना हे मानांकन मिळवून देणे; त्यांना जागतिक बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी मदत करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

लेखक: अ‍ॅड. गणेश हिंगमिरे

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate