অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिंबूवर्गीय फळबागेतील अवस्थेनुसार करा उपाययोजना

लिंबूवर्गीय फळबागेतील अवस्थेनुसार करा उपाययोजना

लिंबूवर्गीय बागांमध्ये झाडे धरलेल्या बहर नियोजनप्रमाणे विविध अवस्थेत आहेत. त्यानुसार करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ 
सध्या लिंबूवर्गीय फळबागांमध्ये खालीलप्रमाणे स्थिती असेल. 
  • संत्रा बाग - काही संत्रा बागेत आंबिया बहराची फळांची काढणी जवळपास पूर्ण झाली किंवा होण्याच्या स्थितीत असतील. मृग बहराची फळे मोठ्या लिंबा एवढी (60 ग्रॅम वजनाची) किंवा त्याहून मोठी अंदाजे (4-5 महिन्यांची) झालेली आहेत. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भारी जमिनीत ताण देण्यास सुरवात केली असेल.
  • कागदी लिंबू - मृग बहराची फळे परिपक्व होऊन काढणीस तयार आहेत किंवा काढण्यात आलेली आहेत. हस्त बहर घेणाऱ्या व भारी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी जमिनीत ताण देण्यास सुरवात केली असेल. हस्त बहराच्या बागेत काही भागांत फुलोरा आलेला आहे, तर काही भागांत फळधारणा झालेली आहे.
आपल्या बागेतील स्थितीनुसार खालीलप्रमाणे योग्य उपाययोजना कराव्यात. 
  1. मागील हंगामातील आंबिया बहराची फळे कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपर्यंत काढावीत. फळ काढणीचे साधारणतः 15 दिवस अगोदर कार्बेन्डाझिम 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी घ्यावी. फळे तोडणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर (जमिनीच्या मगदुरानुसार) पाणी देणे बंद केल्यास फळास गोडी व आकर्षक रंग प्राप्त होईल.
  2. अंबिया बहराच्या बागेत ताण देणे व सोडताना
  • पुढील आंबिया बहरास योग्य ताण बसण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार 40 ते 50 दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा.
  • हिवाळ्यामध्ये (डिसेंबर, जानेवारी) तापमान सतत सात दिवसपर्यंत 13 अंश सेल्सिअसपेक्षा खाली राहिल्यास झाडे सुस्त अवस्थेत जातात. फांद्या किंवा पानांमधील जीए संजीवकाचे प्रमाण कमी होऊन फुलधारणा होण्यास मदत होते. जानेवारी-फेब्रुवारीतील तापमान साधारणतः 32 अंश सेल्सिअसपेक्षा वर व हवेतील आर्द्रता 65 टक्‍क्‍यांच्या आसपास असल्यास संत्र्याला फुलधारणा होण्यास प्रेरणा देतात.
  • तणाच्या कालावधीत वाढरोधक संजीवक क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड (सीसीसी) (1000 पीपीएम) 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारल्यास झाडातील जिबरेलिक संजीवकाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे झाडांची शाखीय वाढ थांबून कर्ब संचय होतो. पानातील कर्बसंचय व जिबरेलिक संजीवकाचे कमी झालेले आणि ऍबसेसिक ऍसिडचे वाढलेले प्रमाण या बाबी फुलधारणेस पोषक ठरतात. यासाठी झाडे ताणावर सोडताना सायकोसीलची 1000 पीपीएम (1 ग्रॅम प्रति 1 लि. पाण्यात) फवारणी करावी. ताण योग्य न बसल्यास 15-20 दिवसांनी हीच फवारणी पुन्हा करावी. ताणाच्या कालावधीत पाऊस आल्यास, सीसीसी संजीवकाची फवारणी करणे क्रमप्राप्त ठरते.
  • ताण तोडताना (झाडाला ओलित करताना) झाडांना खताचे नियोजन करावे. याकरिता पोटॅशिअम नायट्रेट (1 टक्का) 10 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. झाडाला 600 ग्रॅम नत्र अधिक 400 ग्रॅम स्फुरद अधिक 400 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावा. यासह शेणखतात मिसळून 100 ग्रॅम अझोस्पिरीलियम अधिक 100 ग्रॅम पीएसबी अधिक 500 ग्रॅम व्हॅम अधिक 100 ग्रॅ. ट्रायकोडर्मा प्रति झाड द्यावे. राहिलेली नत्राची अर्धी मात्रा (600 ग्रॅम) फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी. पावसाळ्यात शेणखत दिलेले नसल्यास प्रति झाड 50 किलो शेणखत (10 वर्षं व त्यावरील झाडाकरिता) ताण तोडताना द्यावे.

3.  मृग बहराची फळे असलेल्या बागेत 
मृग बहराच्या फळांची वाढ वेगाने होण्याच्या अवस्थेत आहेत. या फळांना कॅल्शिअम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मुबलक पुरवठा झाल्यास फळे आकाराने मोठी होतात व फळ गळण्यास प्रतिबंध होतो. यासाठी कॅल्शिअम (0.2 टक्का) 2 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणाची फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्याकरिता चिलेटेड स्वरूपातील सर्वसमावेशक सूक्ष्म अन्नद्रव्य (झिंक, मॅग्नेशिअम, लोह, बोरॉन यांसह) (0.5 टक्का) 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या कराव्या. फवारणी करताना द्रावणात दर्जेदार चिकट द्रव्याचा वापर करावा.

4. लिंबातील हस्त बहराची फळगळ रोखणे व फळ वाढीचा वेग वाढविण्यासाठी फळे चारोळीच्या आकाराची झाल्यावर जी.ए. 10 पी.पी.एम. (1 ग्रॅम) किंवा एनएए (1 ग्रॅम) किंवा 2-4 डी (1 ग्रॅम) यासह 0.1 टक्का कार्बेन्डाझिम (100 ग्रॅम) व युरिया 1 टक्का (1 किलो) प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • झाडाला नवीन नवती, फुलधारणा अवस्थेत ढगाळ वातावरण असताना सायट्रस सायला किडीचा उपद्रव वाढतो. मधल्या काळात हा उपद्रव ढगाळ वातावरणामुळे अधिक प्रमाणात दिसून आला असून, त्याचा फुलधारणेवर विपरीत परिणाम होतो. या किडीच्या नियंत्रणाकरिता क्विनॉलफॉस (25 टक्के) 10 मि.लि. किंवा सायपरमेथ्रिन (25 टक्के) 4 मि.लि. किंवा डायमेथोएट (30 टक्के) 8 मि.लि. यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पानावर अथवा फळावर कॅंकर (खैऱ्या) रोगाचा प्रादुर्भाव असल्यास स्ट्रेप्टोमायसीन (100 पीपीएम) 10 ग्रॅम अधिक -------------कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड (0.3 टक्का) 300 ग्रॅम प्रति 100 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज भासल्यास एका महिन्याने सल्ला घेऊन पुन्हा फवारणी करावी.

टीप : कागदी लिंबावर फुलधारणा असल्यास वरील कुठलीही फवारणी घेण्याचे टाळावे. फुलाची पाकळी गळाल्यानंतरच फवारणी करावी. 
5. या वर्षी कमी पाऊस झाला असून, उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासण्याची शक्‍यता आहे. याकरिता ठिबक सिंचनाचा वापर करावा. तसेच शेतातील व आजूबाजूचा पालापाचोळा, काडीकचरा गोळा करून आळ्यामध्ये 5-10 सें.मी. जाडीचे आच्छादन करावे. पॉलिथिनचासुद्धा (रंग काळा, 200 मायक्रॉन जाडी) आच्छादनासाठी वापर करता येईल.

6. तापमान (रात्रीचे) 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास मृग बहरातील संत्रा व हस्त बहरातील लिंबाच्या फळवाढीवर व झाडावर विपरीत परिणाम होतो. यासाठी सायंकाळी बागेत धूर करणे, रात्रीचे ओलित करणे अशा उपाययोजना कराव्यात.

टीप - झाडे आंबिया बहरासाठी ताणावर सोडलेली असल्यास ही उपाययोजना करू नये.

 

. दिनेश ह. पैठणकर, 9881021222 
(लेखक अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate