অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीचा वारसा जपण्याची गरज

शेतीचा वारसा जपण्याची गरज

शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या महाविद्यालयीन युवकाचे मनोगत

काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये मौखिक चाचणी सुरू होती. एका मित्राची चाचणी सुरू असताना सरांकडून त्याच्यावर सलग चार प्रश्नांचा भडिमार झाला. त्याला एकाही प्रश्नाचं उत्तर दुर्दैवानं देता आलं नाही. सरांचा पारा चढला. त्यावरून त्याला अभ्यासाची आणि भावी जबाबदारीची जाणीव करून देण्याची ऊर्मी त्यांना कदाचित झाली असावी. त्यांनी त्याला पाचवा ‘सार्वजनिक प्रश्न’ केला, “तुला आयुष्यात पुढे काय करायचंय?” त्या प्रश्नाच्या हल्ल्यानंतर मात्र त्या वर्गमित्राकडून क्षणात प्रत्युत्तर आलं, “मी पुढे जाऊन शेती करणार आहे.” मघाशी कोमजलेला त्याचा चेहरा हे उत्तर देताना मात्र आत्मविश्वासानं फुलला होता.

सरांच्या प्रश्नावर त्या विद्यार्थ्याकडून आलेलं हे अत्यंत ‘दुर्मीळ’ उत्तर आणि ते उत्तर देताना स्वाभिमानानं उजळलेला त्याचा चेहरा पाहून आम्हां सर्वांना क्षणभर ‘पांढरा कावळा’ दिसल्यागत झालं. याउलट सरांच्या चेहर्यावर मात्र त्याच्याबद्दलच्या कौतुकानं हास्याची कळी उमलली होती. सरांनी त्याच्या उत्तराला प्रेमळ प्रतिसाद देत, त्याच्या ध्येयाला पाठिंबा दिला, ‘शेती करणार आहेस, तर मन लावून कर. एक यशस्वी शेतकरी हो.’ त्या दुर्मीळ उत्तरानं त्या वर्गमित्राबद्दल माझ्याही मनात कुतूहल निर्माण केल होतं. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर कळलं की, हा पठ्ठा आठवड्यातल्या सात दिवसांपैकी पाच दिवस कॉलेज करून उरलेले दोन दिवस पुण्याहून गावी जाऊन वडलांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची शेती करतो.

त्या वर्गमित्रानं दिलेलं उत्तर आजघडीला तसं अनोळखीच! कारण, ‘मी पुढे जाऊन शेती करणार.’ असं मनापासून उत्तर देणारे आणि ते अमलात आणणारे जिगरबाज आजच्या काळात जणू उंबराचं फूल झाले आहेत. मात्र दिवसेंदिवस ते काळाची गरज बनत चाललेत हेही तितकंच खरं.

असंच एकदा दुसर्या एका सोबत्याच्या गावी जत्रेच्या निमित्तानं जाणं झालं. तिथून निघताना मित्राचे वडील म्हणाले, “पोरांनो, चांगला अभ्यास करा आन तिकडंच चांगली नोकरी बघा. या शेतीच्या नादी लागू नगा. आजकाल आमचं जगणं म्हंजी सट्टेबाजावाणी झालंय. दरवर्षी दोन हंगामांत सार्या आयुष्याचा सट्टा खेळतो. निसर्गानं आन बाजारपेठेनं साथ दिली, तर उत्पन्न येतंय. आकडा लागला तर ठीक, नाहीतर उभं वर्ष आकडा फसलेल्या सट्टेबाजावाणी कर्जाच्या पैशांनी पोट भरावं लागतंय.” उपदेशाची ही शिदोरी घेऊन सुन्न मनानंच आम्ही तिथून निघालो.

प्रस्तुत दोन्हीही प्रसंग तसे आपल्या परिचयाचेच आहेत. शिवाय ते परस्पर विरोधाभास दर्शवणारे आहेत. दुसर्या प्रसंगात त्या सोबत्याच्या वडलांनी केलेला उपदेश हा साधारण नसून एका शेतकर्यानं कृषी व्यवसायाच्या अनुभवांतून बनलेल्या नकारात्मकतेतून पोटच्या मुलाला केलेला उपदेश आहे. कृषिक्षेत्र ज्या देशाचा कणा आहे, त्या देशात कृषी व्यवसायाबद्दल जेव्हा जन्मदात्याकडूनच पुढच्या तरुण पिढीला असा नकारात्मक उपदेश केला जातो; तेव्हा त्या व्यवसायाची आणि साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेची धोकादायक वाटचाल सुरू झालेली असते. इथे तो मित्र आणि त्याचे वडील हे आजच्या भारतातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबातल्या ‘तरुण आणि प्रौढ पिढी’चं प्रतिनिधित्व करतात. जेव्हा स्वतःच्या व्यवसायाबद्दल अशी नकारात्मकता एखाद्या व्यावसायिकाच्या मनात तयार होते, तेव्हा त्याला कारण त्या व्यवसायात सातत्यानं सोसावं लागलेलं ‘अपयश’ असतं. त्या व्यवसायाला पोषक अशी ‘निसर्गसाथ’ आणि ‘आर्थिक सुबत्ता’ यांअभावी सततची ‘उत्पन्न-अनिश्चितता’ तयार होते. दरवर्षी कर्जाऊ पैशानं बियाणे घेऊन पेरणी केली जाते. त्यात निसर्ग साथ देईल की नाही याची हमी नसते. काही वेळा दुष्काळ, अवकाळी वादळ-पावसामुळं पीक नष्ट होतं. सुदैवानं पीक सहीसलामत हाती लागलंच आणि भरपूर उत्पादन मिळालंच, तरी आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय बाजारपेठेतल्या चढउताराचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होतो. त्यात भरीस भर म्हणजे बाजारपेठ आणि शेतकरी यांमधला अघोषित दुवा असलेला ‘व्यापारी वर्ग’ कच खातो. परिणामी; आलेल्या पिकाला किफायतशीर भाव मिळत नाही. व्यापारिवर्ग सरकारनं जाहीर केलेल्या पिकाच्या हमीभावाहून कमी भावात मालाची मागणी करतो.

2015 सालचीच गोष्ट! केळी या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन झालं, पण राष्ट्रीय बाजारपेठेतल्या बदलाचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला. एरवी प्रतिक्विंटल बाराशे ते तेराशे रुपये या भावानं विकली जाणारी केळी स्थानिक व्यापारी प्रतिक्विंटल दीडशे ते अडीचशे रुपये या दरानं मागू लागलेे. परिणामी, शेतकर्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन हजारो केळीचे घड शेतकर्यांकडून रस्त्यावर टाकून देण्यात आले. काही वर्षांपासून कांदा आणि टोमॅटो या पिकांबद्दलही आपण कित्येकदा हेच ऐकतोय. शेवटी त्या शेतकर्याच्या वाट्याला पैशाऐवजी फक्त हतबलताच येते. मौजमजा तर दूरची गोष्ट, पण त्याचं कुटुंब कितीतरी वेळा अन्नालाही मोताद होतं. शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत जातोय. भरघोस उत्पादन होऊनही आलेल्या उत्पन्नातून आवश्यक ती मिळकत येत नसेल, तर त्या प्रौढ शेतकरी पिढीच्या मनात ह्या कृषी व्यवसायाबद्दलची नकारात्मकता आपसूकच जन्माला येते. ही नकारात्मकता धोकादायक आहे. कारण याच अनिश्चिततेमधून उद्याची तरुण पिढी घडतेय. हे आपल्या देशातल्या कृषी व्यवसायाचं आजचं वास्तव रूप आहे.

पहिल्या प्रसंगात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आजच्या काळात फार दुर्मीळ झालंय, याला अजूनही बरीच कारणं आहेत. आर्थिक सुबत्तेवरून उपवर मुलाच्या प्रतिष्ठेची पारख केली जाते. कृषी व्यवसायातल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शेती या व्यवसायामध्ये शाश्वत उत्पन्नाची हमी नसल्यानं उपवर शेतकरी मुलाला मुलगी न देण्याचं प्रमाणही आजकाल वाढीला लागलं आहे. ग्रामीण भागात सररास दिसणारा हा प्रकार कृषी व्यवसायावरच्या अविश्वासाचंच दर्शन घडवतो. मानवी जीवनात ‘बुद्धिजीवी आणि श्रमजीवी’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही बाजूंना समान महत्त्व असायला हवं. आपल्या देशात माणसाकडे केवळ माणूस म्हणून न बघता दुर्दैवानं त्या दोघांनाही एकाच तराजूत तोललं जाऊन श्रमजीवीपेक्षा बुद्धिजीवीला जास्त महत्त्व दिलं जातं. हे वरच्या उदाहरणातून आपल्याला दिसून येतं. कारणं कितीही असली, तरीही शेती व्यवसायाला पुन्हा गतवैभव मिळवून देणं ही आपलीच जबाबदारी आहे. शेतीचा हा वारसा आपणच जपण्याची गरज आहे हेही तितकंच खरं!

लेखक: गंगेश पाटील, संपर्क : 9890304893

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate