অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शोध हरवलेल्या कृषी संस्कृतीचा ....

शोध हरवलेल्या कृषी संस्कृतीचा ....

“कोणत्याही प्रदेशातील सण, उत्सव हे तेथील संस्कृतीचे व्यक्त आविष्कार असतात. सणउत्सवांत होणारे बदल तेथील सांस्कृतिक बदलांची जाणीव करून देतात. याचे प्रत्यंतर भारतीय कृषी संस्कृतीतही पाहायला मिळते. सणांच्या माध्यमातून जोपासलेल्या कृषी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केलेला आहे ....

‘सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे’ ही मंगेश पाडगावकरांची काव्यसुमनांजली एकांतात शांत ठिकाणी ऐकणे हा माझा कितीतरी वर्षांचा परिपाठ आहे. हे गीत मला माझ्या बालपणीच्या शालेय जीवनात अनुभवलेल्या ग्रामीण भागामधल्या कृषी संस्कृतीची आठवण प्रकर्षाने करून देते आणि मन हळवे होऊन जाते.

भारतीय संस्कृतीमधला प्रत्येक सण, वार आणि उत्सव हा शेतकर्‍याशी आणि त्याच्या शेतीशी निगडित आहे हे माझे विधान; म्हटले तर थोडे धाडसाचे, पण तेवढेच सत्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला भारतीय नवीन वर्ष सुरू होते. त्याचे स्वागत आपण गुढ्यातोरणे उभारून करत असतो. प्रभू रामचंद्रांनी रावणाला पराजित केले. त्यानंतर ते जेव्हा अयोध्या नगरीत परतले, तेव्हा नगरीत प्रवेश करताना मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो शेतकर्‍यांनी रामचंद्रांचे स्वागत केले. त्यांच्या विजयाप्रीत्यर्थ गुढ्या उभारण्यात आल्या, तोरणे बांधण्यात आली. राजाच्या सन्मानार्थ साजरा केलेला प्रजेचा म्हणजेच शेतकर्‍यांचा हा आनंदोत्सव होता. हाच तो गुढीपाडवा.

चैत्रगौरीचा सण हाही शेतकर्‍यांचा उत्सव.आंबा, शेतामधली इतर फळे, फुले यांच्या साहाय्याने चैत्रगौरीची आरास होत असे. बंगाल प्रांतामतल्या जमीनदारांकडे याच काळात पूर्वी होणारा देवीचा उत्सव आपल्याकडच्या ‘चैत्रगौरी’सारखाच असे. शेकडो शेतकरी आणि मजूर या कार्यक्रमासाठी दिवसरात्र मेहनत घेत. शेतात जे पिकते त्याचे इथे प्रदर्शनच असे. शेतात राबणार्‍या अनेक शेतकर्‍यांचा सन्मान जमीनदाराकडून या वेळी केला जात असे.

श्रावणामधला प्रत्येक वार, त्याची पूजा, कहाणी हे सारे शेतीशीच निगडित आहे. रिमझिम झरणार्‍या श्रावणधारा शेतीलाही तृप्त करतात, आणि म्हणूनच या महिन्यामधल्या प्रत्येक सणाला आनंदाची एक वेगळीच किनार असते. नवरात्रातली घटस्थापना हा शेतकर्‍यांचाच सण. घटामधली माती शेतामधून गोळा करून आणलेली असते. रब्बीसाठी कोणते पीक लावायचे, याची ती घरामधली छोटी प्रयोगशाळाच पूर्वी समजली जात असे. साठवलेले बी-बियाणे, त्याची उपजक्षमता याच घटांमधून शेतकरी पडताळून पाहत असे. शितावरून भाताची परीक्षा म्हणतात ना, अगदी तसेच. कोकणातला आणि गोव्यातला गणेशोत्सव हा निसर्गाशी आणि शेतीशी जोडलेला आहे. महालक्ष्मीच्या सणानिमित्त ‘ज्येष्ठाकनिष्ठा’ या गौरींना धान्याने भरलेल्या उतरंडींवर पूर्वी उभे केले जात असे. या सणासाठी सोळा प्रकारची धान्ये आणि तेवढ्याच भाज्या लागत, आणि तेही सगळे स्वतःच्याच शेतामधले. हा उत्सव आता इतिहासजमा झाला आहे.

शेतामधल्या धान्याचे मूषकापासून रक्षण करणारा साप हा शेतकर्‍यांचा खरा मित्र. या जीवलग मित्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीचा सण पूर्वी सर्व शेतकरी शेतात साजरा करत असत. बैलांना कष्ट न देता उत्पादित होणार्‍या धान्यांपासूनचे अन्न ग्रहण करून शेत व बैल यांच्याविषयी आदर व्यक्त करणारा आगळावेगळा सण म्हणजे ॠषिपंचमी. बैलांच्या कष्टाचे ऋण म्हणून एक दिवस त्यांच्या आनंदासाठी साजरा केलेला सण म्हणजे पोळा. दसरा, दिवाळी या सणांनिमित्त पोराबाळांना गोडधोड खाऊ घालणारा आणि नवीन कपडे घेणारा शेतकरी पोळ्याच्या दिवशी मात्र हे सर्व आपल्या राजा-सर्जासाठी करतो. कोजागरी पौर्णिमा म्हणजेच नवान्न पौर्णिमा. शेतकर्‍यांनी पिकवलेल्या नऊ धान्यांचा हा उत्सव.

स्वातंत्र्यपूर्व भारतात जवळपास 98 टक्के जनता शेतीशी आणि कृषी व्यवसायाशी निगडित होती. त्यामुळेच जनतेने त्यांच्या आनंदोत्सवासाठी अनेक सण, वार, उत्सव, यात्रा यांना शेतीचीच पार्श्वभूमी दिलेली आढळते. उद्देश एकच; आणि तो म्हणजे निसर्ग, शेती आणि सोबत पशुपक्षी यांना एकत्र घेऊन आनंद साजरा करणे. खरिपाची पेरणी पूर्ण झाल्यानंतर इथला शेतकरीवर्ग आनंदी मनाने आषाढी वारीला जातो आणि परत येतो तेव्हा शिवारातली पिके त्याच्यापेक्षाही जास्त आनंदाने डोलत असतात.

हरीतक्रांतीच्या कृषी स्थित्यंतरात भारतामधल्या कृषी संस्कृतीचा फार मोठा र्‍हास झाला. शेतकर्‍यांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेले सर्व सण, वार, उत्सव ग्रामीण भागामधून जवळपास इतिहासजमा झाले; मात्र शहरी संस्कृतीमध्ये त्यांत सोयीनुसार बदल करत जसेच्या तसे उचलले गेले.

आज महाराष्ट्रामधला बैलपोळा, दक्षिण भारतातला पोंगल आणि मध्य उत्तर भारतामधला वसंत पंचमी ह्या सणांचा अपवाद वगळता; एकही सण शेतकर्‍यांचा असा म्हणून आज कुठे दिसत नाही. माघ शुक्ल पंचमीला उत्तरेकडे ‘बसंत पंचमी’ असे म्हणतात. याला शेतकरी ‘मोहरीचा उत्सव’ असेही म्हणतात. फुललेल्या मोहरीच्या शेतात शेतकरी स्त्रियांचे ‘बसंत पंचमी’ला होणारे नृत्य पाहण्यासारखे असते. पिवळा रंग ताणतणाव कमी करून आनंद द्विगुणित करतो, म्हणून पूर्वी दसरादिवाळीला पिवळा झेंडू, शेवंती यांना महत्त्व होते. नवरात्राच्या आणि दसर्‍याच्या उत्सवात शेतकर्‍यांची शिवारे कारळ्याच्या पिवळ्या फुलांनी भरून गेलेली असत. पारंपरिक शेतीचा हा सुगंध त्या काळी शेतकर्‍यांच्या आनंदाचा ऊर्जास्रोत होता.

‘बसंत पंचमी’ ही उत्तराखंडातल्या सेंद्रिय शेतीचीच पूजा आहे. पंजाबमधल्या शेतकर्‍यांची ‘बसंत पंचमी’ बैशाखीपर्यंत (वैशाखापर्यंत) चालते. महाराजा रणजितसिंह ह्यांनी ह्या सणाला जोडून पतंगउत्सव सुरू केला. ज्या शेतकर्‍याचे उत्पन्न जास्त, त्याचा पतंग सर्वांत उंच ही त्यांची प्रोत्साहनाची पद्धत वेगळी होती. आजही पंजाबमध्ये पतंगउत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो; मात्र आता त्याचा शेतीशी काहीही संबंध उरलेला नाही. उत्तर भारतात ‘बसंत पंचमी’ला मोठ्या लाकडी ओंडक्यावर हळदीने होलिकेची प्रतिमा काढून गावामध्ये पारंपरिक ठिकाणी ठेवतात. प्रत्येक दिवशी त्यावर अमंगल, द्वेषात्मक विचाराचे प्रतीक म्हणून झाडांच्या वाळलेल्या फांद्या, गोवर्‍या प्रत्येक जण टाकत असतो. फाल्गुन पौर्णिमेला बरोबर 40 दिवसांनी ही अमंगल, द्वेषरूपी विचारांची होळी पेटवून आनंदउत्सव साजरा केला जातो. शेतकर्‍यांच्या होळीचा सण हा असा होता. हा अर्थ आम्हांला दुर्दैवाने समजलेलाच नाही. शेतकर्‍यांचा हा सण आज मोठमोठ्या शहरांत ढोलताशे बडवून साजरा केला जात आहे.

केरळमधल्या ‘ओणम’ सणाला पूर्वी केवढे महत्त्व होते! तिथल्या नौकास्पर्धांमध्ये शेतकरी त्यांच्या शेतातल्या उत्पादनांचा आनंद द्विगुणित करत, आता पर्यटनामुळे या सणाला व्यापारी स्वरूप आले आहे. सण, वार, उत्सव, यात्रा यांमधून गरीब, अल्पभूधारक शेतकरीवर्ग हळूहळू बाहेर पडत आहे; ही भारतीय कृषिसंस्कृतीची शोकांतिका आहे.

पूर्वी प्रत्येकाचे घर धान्याने समृद्ध असे. दसरा, दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा, चैत्रगौरी यांचा आनंद एकमेकांमध्ये वाटून साजरा केला जात असे; आता शेतावरचे धान्य घरात येतच नाही; हातांत पैसा आला, तरच सण. तोही आनंदापेक्षा उरकण्याकडेच जास्त कल. पूर्वी आषाढी-कार्तिकी वार्‍यांना येणारा शेतकरी अतिशय समाधानी होता आणि म्हणूनच कळसाच्या दर्शनामध्येसुद्धा तो तृप्त असे. हरवलेल्या कृषी संस्कृतीचा शोध घेताना मला प्रामुख्याने जाणवले की गेल्या दोन तीन दशकात एकत्र कुटुंब पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणावर र्‍हास झाला आहे. सण, वार हे एकत्र कुटुंब पद्धतीमधूनच साजरे केले जातात. तो आनंदच वेगळा आहे. कुठे हरवली ही कृषी संस्कृती? ही कृषी संस्कृती लुप्त होण्यामागील कारणमिमांसा करताना  मला तिचे मुळे रासाययनिक शेतीच्या माध्यमातून निर्माण झालेला शेती उत्पादनाचा हव्यास, त्यामधून निर्माण झालेले ताण-तणाव व कर्जबाजारीपणाची भूतावळ यामध्ये आढळते.

मी जेव्हा हरवलेल्या कृषी संस्कृतीचा विचार करतो; तेव्हा लक्षात येते की, आपली पारंपरिक शेती आणि सेंद्रिय खतांचा सुगंध ह्या गोष्टी ग्रामीण भागामधून केव्हा लुप्त झाल्या हे आपल्याला समजलेच नाही. आज मी हरवलेल्या नद्या, जलस्रोत, उजाड जंगले आणि सभोवतालच्या नष्ट झालेल्या जैवविविधतेमध्ये शेतकर्‍यांची कृषी संस्कृती आणि तिला जोडलेले सण, वार, उत्सव ह्यांचे मजबूत धागे शोधत आहे. यात मला एक जरी धागा मिळाला, तरी माझ्या बळीराजाच्या आनंदाचे सुंदर वस्त्र परत पुन्हा विणता येऊ शकते.

दिवाळीच्या पहाटेच्या स्नानाला आम्ही फटाके उडवत, गोडधोड खात आनंद लुटत असतो; मात्र त्याच वेळी शेतकरी कापूस विक्रीकेंद्रावर थंडीत काकडत उघड्या पांढर्‍या सोन्यावर झोपलेला असतो. कशी साजरी होत असेल त्याच्या कुटुंबाची दिवाळी? ऊसतोड कामगार म्हणजे शेतकरीच. दिवाळीच्या पहाटे ह्याच लोकांच्या बैलगाड्या कारखान्यांच्या दिशेने महामार्गावर हळूहळू चालत असतात. लुप्त होत चाललेली कृषी संस्कृती परत प्राप्त करायची असेल, तर गरीब शेतकर्‍यांना सध्या तरी आर्थिक बळाची गरज आहे. पारंपरिक पीकपद्धतीला प्रोत्साहन, सेंद्रिय शेती, वृक्षशेती, 50 टक्के नफा देऊन त्यांची धान्यखरेदी, रासायनिक खते, कीटकनाशकाला फारकत ह्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. सण, वार ह्यांचा आनंद घेण्यासाठी हा गरीब, अल्पभूधारक शेतकरी सर्वप्रथम कर्जमुक्त होणे आवश्यक आहे. ज्याच्या हातांत पैसा, त्यानेच सण साजरा करायचा हे कुठे तरी थांबायला हवे. ‘कृषी संस्कृती’ हे दोन शब्द आज परस्परांपासून विभक्त झाले आहेत. आम्हांला फक्त ‘कृषी’ एवढेच माहीत आहे. मात्र तिची संस्कृतीपासून फारकत झाली आहे हे कुणाच्याच लक्षात येत नाही. अन्नदाता शेतकरी मुख्य प्रवाहातून बाजूला होत आहे, दुर्लक्षिला जात आहे; तो परत आपणा सर्वांबरोबर एकाच प्रवाहात आला, तरच हे दोन शब्द पुन्हा एकत्र येऊ शकतात. निसर्ग जगला, पाणी मुरले, वनराई वाढली, जैवविविधता फुलली; तरच हे शक्य आहे. बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे’ ह्या कवितेतला आनंद सर्वत्र हवा असेल, तर आपला शेतकरी आणि त्याची हरवलेली कृषी संस्कृती आपल्याला परत मिळायला हवी. आनंदाची नवीन व्याख्या या शोधातच दडलेली आहे.

डॉ. नागेश टेकाळे, निवृत्त प्राध्यापक, वनस्पतिशास्त्र विभाग, बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे

संपर्क: 9869612531

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate