অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समुद्रातील तरंगते ‘व्हेरिओज’ पुरवतील शहरांना शेतीमाल

किनाऱ्याच्या भागामध्ये समुद्राच्या पाण्यावर तरंगत्या स्वरूपातील हरितगृहे उभारून शहरांची शेतीमालाची भूक भागवणे शक्य होऊ शकते. या पर्यावरणपूरक हरितगृहांमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून बनवलेले गोडे पाणी वापरणे शक्य आहे. जर्मनी येथील औद्योगिक आरेखनकार फिलीप हटफ्लेस यांनी हे आरेखन तयार केले आहे.

कशी सुचली कल्पना

फिलीप हटफ्लेस हे जपानमध्ये राहत होते, त्या वेळी जपानमध्ये अनेक प्रकारचा शेतीमाल आयात करावा लागत असल्याचे दिसून आले. त्यामागील कारण जाणून घेता, शेतीसाठी जागा कमी पडत असल्याचे लक्षात आले. किनारा अधिक लांबीचा असलेल्या अनेक देशांमध्ये तरंगत्या प्रकारची हरितगृहे ही अधिक फायद्याची ठरू शकतील, या विचारातून त्यांनी तरंगत्या हरितगृहाचे आरेखन केले आहे. या प्रकारच्या हरितगृहांना त्यांनी ‘व्हेरिओज’ असे नाव दिले आहे.

व्हेरिओज अधिक पर्यावरणपूरक बनविण्यासाठी घेतले परिश्रम

  • किनाऱ्याजवळ असलेल्या शहरांमध्ये फळे, भाजीपाला व अन्य शेतीमालाची शेती करण्यासाठी व्हेरिओज उपयुक्त ठरतील.
  • समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी रिव्हर्स ऑसमॉसिस तंत्रज्ञानाने मिळविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती ऊर्जा सौर पॅनेलच्या माध्यमातून मिळविण्यात येईल. या गोड्या पाण्याचा वापर हायड्रोपोनिक्स तंत्राने हरितगृहातील पिकांसाठी केला जाईल. तसेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याचा पुनर्वापर करण्यात येईल.
  • हरितगृहाच्या सांगाड्यामध्ये ॲल्युमिनियम व आच्छादनासाठी प्लॅस्टिकचा उपयोग केला जाईल.
  • या हरितगृहाचा आकार ४२ वर्ग फुटांचा असून, त्यामध्ये मजले पद्धतीने भाज्यांची लागवड केली जाईल.

मुंबईसह अनेक शहरामध्ये राबविता येतील असे प्रकल्प

  • हटफ्लेस हे जर्मनीतील डर्मस्टॅड येथील युनिव्हर्सिटी ऑफ ॲप्लाइड सायन्सेस कार्यरत आहेत. त्यांनी तयार केलेला प्रबंध या वर्षाच्या जेम्स डायसन पुरस्कारासाठी पाठविण्यात आला आहे.
  • हटफ्लेस यांच्या मते, व्हेरिओज जाकार्ता, शांघाय, मनिला, मुंबई आणि लागोससारख्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकतील. या पद्धतीमुळे हजारो किलोमीटरपासून विनाकारण होणारा शेतीमालाचा प्रवास कमी करता येईल. त्यामुळे खर्चात व खनिज तेलांच्या वापरामध्ये बचत करता येईल.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate