অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंजीर फळांच्या वाढीकडे द्या लक्ष

सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीकडे लक्ष द्यावे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे काही भागात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

यंदा अंजीर लागवड पट्ट्यात पाऊस उशिरा सुरू झाला असल्यामुळे खट्टा बहर जवळजवळ दीड ते दोन महिने उशिराने आहे. सध्याच्या काळात फळे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. खट्टा बहर घेण्याची परंपरा पुणे जिल्ह्यातील खोर, सोणोरी, झेंडेवाडी, काळेवाडी, जाधववाडी, अंबोडी, शिवरी, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी या गावांच्या परिसरात आहे. याचबरोबरीने पुणे जिल्ह्यातील काही गावे, तसेच नगर, सातारा, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांच्यामध्ये मीठा बहर घेतला जातो. या बहराचे व्यवस्थापन सप्टेंबर ते ऑक्‍टोबर महिन्यात सुरू होते. या बहराची फळे फेब्रुवारी ते मेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. मीठा बहराची फळे चवीस गोड असतात. तसेच ती अधिक टिकाऊ असतात. सदरची फळे सासवड, नीरा, जेजुरी, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, सुरत, अहमदाबाद, दिल्ली येथील बाजारपेठेत विकली जातात.

सध्याच्या काळातील परिस्थिती

  • अंजिराची दोडी गळ (कच्ची फळे किंवा अपक्व फळे) सर्वच विभागांत दिसून आली.
  • अंजिराची पूर्ण वाढ झालेली पाने अकाली पिवळी पडून गळू लागली आहेत. त्याचामुळे फळवाढीवर विपरीत परिणाम होत आहेत.
  • थंडी, धुके व अवकाळी पाऊस यामुळे अंजिराच्या पानांवर व फळांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. यामुळे देखील 30 ते 35 टक्के उत्पादनात घट येईल. तांबेरा वाढला, तर संपूर्ण पानगळ होते. सर्व फळे उघडी पडतात, फळांची वाढ पूर्ण न होताच ती पिकून गळून पडतात. त्यामुळे उत्पादनात घट येते.
  • काही गावांमध्ये गारांचा मार खोडांना व फांद्यांना बसला असून, त्यामुळे अंजिराचे सुप्त डोळे व फुटलेले डोळे यांना गंभीर इजा पोचली आहे.
  • खट्या बहराच्या बागांमध्ये तांबेरा रोग, तसेच अवकाळी पावसाने फळसड रोगाचे प्रमाण अधिक आहे.
  • अंजीर फळांवर फळमाशीचा उपद्रव वाढल्यामुळे अंजिराची फळे तोंडाजवळ सडत आहेत.
  • अवकाळी पावसामुळे काही बागांच्यामध्ये खट्ट्या बहराच्या बागांमध्ये अति अल्प पाने दिसतात. फळे उघडी पडलेली आहेत, त्याची वाढ होत नाही. ती रंगहीन तसेच पक्वतेकडे जाताना दिसत आहेत. अशा फळांना चव नाही व टिकाऊपणा देखील नाही. सदर फळे विक्रीस योग्य राहत नाहीत.
  • अवकाळी पाऊस, धुके, सूर्यप्रकाशाची कमतरता व वाढलेली आर्द्रता याचा अंजीर बागांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तांबेरा रोग आणि फुलकिडे, पांढरे ढेकूण, खवले कीड, तुडतुडे, कोळी, फळमाशी यांचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसतो आहे.
  • अंजीर बागांच्या मुळांचा देखील अभ्यास केला असता, पाहणीमध्ये सूत्रकृमी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. कालांतराने ही झाडे कोलमडून पडण्याची शक्‍यता आहे.

अंजीर व्यवस्थापन सल्ला

  1. अंजिराचा बहर घेताना स्थानिक हवामान जसे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, धुके, अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस यांचा अभ्यास करावा. त्यावरून खट्टा बहर की मिठा बहर धरावयाचा हे ठरवावे.
  2. हवामानातील बदलाचा अंजीर बागेच्या वाढीवर व उत्पादनावर वाईट परिणाम झालेले आहेत. झाडांच्या पानांची व फळांची वाढ समाधानकारक होऊ शकली नाही, त्याचे प्रमुख कारण म्हणजे कमाल व किमान तापमानातील मोठी तफावत अंजीर बागांना मानवली नाही.
  3. हवामानातील बदलाचा अंजीर पिकांवर होणारा परिणाम पाहता, अंजीर बहराचे महिने बदलले तरच हे पीक तग धरू शकेल.
  4. बदलाच्या हवामानात बागेचे थंडी, अवकाळी पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वारा थोपवण्यासाठी दाट झाडी लावणे गरजेचे आहे. सुरू, सिल्व्हर, ओक, निरगुडी, बांबू, मोगली एरंड, साग, सिसम, फायकस, शेवरी, चिल्हार इ. स्थानिक उपलब्ध झाडांची रांग लावावी.
  5. अवकाळी पाऊस पडलेल्या बागांवर 1 टक्का बोर्डोमिश्रण (1 किलो मोरचूद + 1 किलो चुनकळी + 100 लिटर पाणी) किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 300 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
  6. जी अंजीर फळे तोंडाजवळ सडली असतील त्यांच्या नियंत्रणासाठी डायक्‍लोरव्हॉस (76 ई.सी.) 200 मि.लि. + थायोफेनेट मिथाईल (70 टक्के) 200 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  7. फळमाशीच्या नियंत्रणासाठी गंध सापळ्यांचा वापर करावा. प्रति एकरी पाच सापळे लावावेत. गंध सापळ्यात मिथाईल युजेनॉल हे ल्यूर वापरावे. त्याद्वारे किडीचे सर्व्हेक्षण व नियंत्रण करावे.
  8. तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी 1 टक्का बोर्डोमिश्रण किंवा क्‍लोरोथॅलोनील (75 टक्के) 200 ग्रॅम + कार्बेन्डाझीम (50 टक्के) 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मॅन्कोझेब (75 टक्के) 300 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम (50 टक्के) 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता पाहून 8 ते 10 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.
  9. फुलकिडे, पांढरे ढेकूण, तुडतुडे, कोळी, फळमाशी किडीच्या नियंत्रणाकरिता ऍसिफेट (75 टक्के) 100 ग्रॅम किंवा अबामेक्‍टीन (1.9 टक्के ) 50 मि.लि. किंवा डायकोफॉल (18.5 ई.सी.), 200 मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (17.8 टक्के ), 50 मि.लि.किंवा फिप्रोनील (0.3 टक्के), 100 मि.लि. प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किडींची तीव्रता पाहून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  10. कोलमडलेली झाडे सरळ करावीत. त्यांना मातीचा व बांबूचा आधार द्यावा. मोडलेल्या फांद्या छाटाव्यात. झाडांना योग्य आकार द्यावा. छाटणी झाल्याबरोबर त्वरित 1 टक्का बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 300 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यातून फवारावे.
  11. फळे वाढीच्या काळात चार ते पाच वेळा चाळणी किंवा खांदणी करण्याची पद्धती आहे. चाळणीनंतर गरजेनुसार खतांचा पुरवठा करावा व बागेस पाणी द्यावे. यामुळे झाडे जोमदार वाढू लागतात व फळांचे आकारमान सुधारते. अप्रतिम फळे उत्पादित होतात.
  12. फळांची काढणी सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत करावी, त्यामुळे बागेस पक्ष्यांपासून होणारा उपद्रव सहज टाळता येतो.
  13. अंजिराची फळे अवकाळी पिकून गळत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे हवामानातील बदल. थंडीमध्ये फळांच्या वाढीसाठी लागणारे घटक मिळत नाहीत, त्यामुळे फळे पूर्णपणे विकसित न होता गळून पडत आहेत. थंडीमध्ये झाडास 200 ते 250 ग्रॅम पोटॅशची मात्रा द्यावी. शिवाय फवारणीद्वारा 0ः0ः50 हे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  14. सूत्रकृमी (निमॅटोड) व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा प्लस 100 ग्रॅम प्रति झाड शेणखत किंवा गांडूळखताबरोबर जमिनीतून घ्यावे.
  15. जेव्हा तापमान 10 पेक्षा कमी असते, धुके असते, त्या वेळेस सकाळी व सायंकाळी बागेभोवती शेकोट्या कराव्यात.


संपर्क - डॉ. विकास खैरे - 9423082397 
( लेखक फळबाग तज्ज्ञ आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate