অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अजैविक ताणांची समस्या

प्रतिकूल हवामानाचा काही पिकांवर झालेला परिणाम आपण अभ्यासला. त्याच प्रकारे आणखी काही पिकांचा अभ्यास या भागात करू या. यामध्ये जैविक ताणांबरोबरच अजैविक ताणांमुळे पिकात काय बदल होत आहेत किंवा भविष्यात होऊ शकतात यावर चर्चा करू या.

ऊस

पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच्या कडाक्‍याने ग्रासल्याने विदर्भ, मराठवाड्यातील आणि विशेषतः अमरावती भागातील उसास फुटवा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हेक्‍टरी एकूण उसांची संख्या कमी होणार आहे. पर्यायाने हेक्‍टरी उत्पादन घटणार आहे. अजैविक ताणामधून काय घडू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. सहजासहजी ही बाब लक्षात येणारी नाही. पूर्वहंगामी उसाची लागवड ऑक्‍टोबर महिन्यात केली जाते. उगवणीनंतर फुटवा निघतो. फुटवा निघण्याच्या वेळी डिसेंबर - जानेवारीतील थंडीने विपरीत परिणाम होऊन फुटव्यावर परिणाम झाला. फुटवा कमी निघाला.
आडसाली आणि सुरू उसाच्या बाबतीत जमिनीच्या आणि हवेतील तापमानात झालेले बदल, तसेच दिवसांचा कमी कालावधी म्हणजेच एकूण कमी तासाचा सूर्यप्रकाश या बाबी उसाचा तुरा निघण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या आहेत. जेव्हा असा प्रकारचे हवामान जैविक ताणतणाव निर्माण करते तेव्हा उसाला तुरा येणे, तसेच आर्द्रतेचे प्रमाण हवेत अधिक राहिल्यास पांगशा फुटणे हे प्रकार होऊन उसाची प्रत खालावते.
या वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यातील अति थंड हवामानाने साखर उतारा घसरला. जेव्हा किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदले जाते तेव्हापासूनच उसात तयार होणाऱ्या साखरनिर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. या वर्षी सलग 10 ते 15 दिवसांचा कालावधी कमाल तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असलेला होता. त्या वेळी सर्वच पिके बचाव करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यात साखरनिर्मितीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे या वर्षी साखरउताऱ्यात घट झाली आहे.

कांदा

महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात रब्बी कांदा पिकाखालील 40 टक्के क्षेत्र असते. याच भागात डिसेंबर-जानेवारी महिन्यात तापमानात मोठी घट झाली. सरासरी तीन ते चार अंश सेल्सिअसने किमान तापमान 15 ते 20 दिवस घसरले. त्याच काळात हवेत भरपूर आर्द्रता होती. त्यामुळे सकाळी धुके जाणवते. अवकाळी पावसाने ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमधील लागवडीस फार मोठा धोका निर्माण झाला. लागवड केलेल्या क्षेत्रास मोठा फटका बसला. कांदा पिकाची पुनर्लागवड करावी लागली. कदाचित गेल्या 25 ते 30 वर्षांतील ही पहिली वेळ असावी. अशाप्रकारे बदलते हवामान कांदा पिकास घातक ठरले. कांदा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आणि ग्राहक दोन्ही अडचणीत आले. अजैविक ताणतणाव कांदा पिकास धोकादायक ठरले. कांद्याचे भाव वाढले. सर्वसामान्यांनी आहारात कांदा वानगीदाखल वापरला.

डाळिंब

अवेळी होणाऱ्या पावसाने आणि हवेतील वाढत्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचे प्राबल्य वाढले असून, बऱ्याच लागवड भागातील डाळिंब पिकाचे नुकसान झाले. एकूण डाळिंब पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे, मात्र डाळिंबाचे उत्पादन घटल्याने या वर्षी मिळालेल्या उत्पादनास तेजीचे भाव मिळाले. मात्र सर्वसामान्यांच्या आहारात डाळिंब फळ येऊ शकले नाही. एकूण रोगपासून संरक्षण करण्याचा खर्च वाढूनही उत्पादन मात्र घटलेले आहे, याचा विचार होणे गरजेचे ठरणार आहे.

भाजीपाला

भाजीपाला पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले, त्यामुळे आवक घटून भाजीपाल्याचे भाव कडाडले. सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर काहीवेळा भाव गेले, त्यांपैकी काकडीसारख्या पिकाची आणि शेवगा पिकाची उत्पादकता घटल्याने भावपातळी उच्चांकी ठरली. एकूणच अजैविक ताणतणावांमधून भाजीपाला उत्पादन घटल्याने शेतकरीवर्गाचे नुकसान झालेच, शिवाय ग्राहकाला भाजीपाला चढ्या दराने खरेदी करावा लागला. त्यामुळे एकूण महागाई वाढण्याचा वेग वाढला असून, अन्नसुरक्षा धोक्‍यात येऊ शकते.

द्राक्ष

हवामानबदलाने द्राक्ष पिकाचे अलीकडील काही वर्षे सतत नुकसान होत आहे. अवकाळी आणि अवेळी पाऊस, वाढणाऱ्या आर्द्रतेचा धोका त्यामुळे उद्‌भवणाऱ्या किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी करावा लागत असलेला एकरी दोन लाखांहून अधिक खर्च या सर्व बाबींमुळे द्राक्ष पीक धोक्‍यात येऊन या पिकाखालील लागवड क्षेत्र कमी झाले आहे. या पिकासाठी वेगळे तंत्रज्ञान विकसित करण्याची वेळ आली आहे.

लसूण


कांदा पिकाप्रमाणे लसूण लागवड धोक्‍यात आल्याने सामान्यांना 200 रुपये प्रति किलो भावाने लसूण विकत घ्यावा लागत आहे, लसणाचा वापर त्यामुळे कमी झाला असून, महागाई निर्देशांक वाढवण्यात या पिकाचाही वाटा आहे. एकूण उत्पादनात घट, मागणीत वाढ आणि त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्‍यात येण्याची घंटा वाजू लागली आहे. या सर्व बाबी तपासून नवीन तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल, तरच हा अन्नसुरक्षेचा धोका कमी होईल.

काकडी

काकडी पिकावरही हवामानबदलाचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. एकूण उत्पादन घटले, त्यामुळे भाव वाढले. उत्पादकाला नुकसान सहन करावे लागले तर ग्राहकाला वाढीव दराने कमी प्रमाणात काकडी खरेदी करावी लागली.
9890041929
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

स्त्रोत -अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate