Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 10:26:28.016109 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/20 10:26:28.023205 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 10:26:28.053006 GMT+0530

अवर्षण

एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय.

अवर्षण

एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय. अवर्षण (अ-नाही, वर्षण-वृष्टी) ही संज्ञा काहीशी सापेक्ष आहे. त्याचे वातावरणीय, कृषिविषयक, जलीय  अवर्षण असे प्रकार केले जातात. वातावरणीय अवर्षण म्हणजे दीर्घकाळ पर्जन्यविरहित परिस्थिती, कृषी अवर्षण म्हणजे पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पाण्याची किंवा आर्द्रतेची कमतरता, जलीय अवर्षण म्हणजे भुजल पातळी खाली जाणे किंवा वाहते प्रवाह आटणे.

भारतीय वातावरणविज्ञान विभागाच्या व्याख्येनुसार सामान्य पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त तूट असेल तर तीव्र अवर्षण आणि २५ ते ५० टक्के तूट असेल तर मध्यम अवर्षण मानतात. अवर्षण ही जरी नैसर्गिक घटना असली तरी मानवी क्रियाही त्यास जबाबदार ठरतात. ओझोन स्तराचा र्‍हास, जागतिक तापमान वृद्धी, वनांचा र्‍हास, झोत वारा ( वातावरणातील दहापंधरा किमी. उंचीवर वाहणारे विशिष्ट प्रकारचे वेगवान वारे), प्रदूषण, अणु-चाचण्या एल् निनो (पॅसिफिक महासागरातील दक्षिण अमेरिकेच्या किनार्‍याजवळील उष्ण प्रवाह) इ. अवर्षणाची कारणे आहेत.

अवर्षण काळात बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन अधिक असते. हवा कोरडी असते. जलचक्र असंतुलित असते. नद्या, ओढे, सरोवरे, तलाव व विहिरी यांच्यातील जलपातळी कमी असते किंवा हे जलस्त्रोत कोरडे पडतात. पाण्याचे दुर्भिक्ष असते. शेती, उद्योग व वैयक्तिक उपयोगांसाठी पाण्याचा तुटवडा जाणवतो. मृदेतील ओलावा कमी झाल्याने मृदाकण सुटे होऊन तिची धूप वाढते. जीवनावश्यक वस्तुंची टंचाई भासते. दुष्काळी स्थिती निर्माण होते. वनस्पती व प्राणी यांचे जीवन धोक्यात येते. अवर्षणामुळे येणार्‍या रोगराईमुळे मृत्युमान वाढते. औद्योगिक उत्पादन घटते. महागाई व बेकारी वाढते. याचा परिणाम त्या प्रदेशाच्या आर्थिक नियोजनावर होतो. उपजीविकेची साधने घटल्याने लोक स्थलांतर करतात. आर्थिक विषमता आणि सामाजिक व आनुषंगिक समस्या निर्माण होतात.

जगातील सर्वाधिक अवर्षणप्रवण क्षेत्र आफ्रिका खंडात आहे. अल्जीरिया, लिबिया, नामिबिया, उत्तर सुदान, उत्तर केनिया, सहारा व कालाहारी वाळवंट आणि नैऋत्य आफ्रिका ही आफ्रिकेतील अवर्षणप्रवण क्षेत्रे आहेत. याशिवाय अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दक्षिण भाग, रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश, प. मेक्सिको, द. अमेरिकेतील ब्राझीलचा दक्षिण भाग, पेरू, उत्तर चिली, अटाकामा वाळवंट, आशियाचा खंडांतर्गत प्रदेश, सौदी अरेबिया, इराण, इराक, पाकिस्तानचा पूर्व भाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया हे जगातील प्रमुख अवर्षणप्रवण प्रदेश आहेत.

जलसिंचन आयोगानुसार भारतात वार्षिक सरासरी ७५ सेंमी. पेक्षा कमी पावसाचा प्रदेश अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. एकूण पाऊस किती पडला यापेक्षा त्यामधील सातत्य, नियमितता व कालिक वितरण महत्त्वाचे असते. भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सु. एक तृतीयांश क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. अवर्षणाच्या तीव्रतेनुसार देशातील अवर्षण प्रवण क्षेत्राचे तीन भाग पाडता येतात. त्यांपैकी अत्यंत तीव्र अवर्षण क्षेत्रात राजस्थान व गुजरातमधील कच्छ प्रदेश, तीव्र अवर्षण क्षेत्रात माळव्याचे पठार व पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेचा प्रदेश, तर साधारण अवर्षणप्रवण क्षेत्रात कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांतील काही भागांचा समावेश होतो.

मॉन्सून पर्जन्याची विचलितता, त्याचे आगमन व निर्गमन यांमधील अनिश्चितता आणि पर्जन्याचे असमान वितरण यांमुळे भारतात वारंवार कोणत्या ना कोणत्या भागात अवर्षणाची स्थिती निर्माण होते. भारतातील साधारण ६७ जिल्हे दीर्घकालीन अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात. देशातील एकूण अवर्षणप्रवण क्षेत्र सु. ५,२६,००० चौ. किमी. असून त्यापैकी सु. ६० % क्षेत्र राजस्थान, कर्नाटक व आंध्र प्रदेशात आहे.

 

लेखक - वसंत चौधरी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

3.04255319149
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
Pavan Raju Chechare Sep 21, 2016 01:59 PM

महाराष्ट्रतील अवर्षण प्रवण जिल्ह्ये किती आहेत, याबाबत माहिती मिळणेबाबत.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 10:26:28.359433 GMT+0530

T24 2019/05/20 10:26:28.365692 GMT+0530
Back to top

T12019/05/20 10:26:27.894766 GMT+0530

T612019/05/20 10:26:27.913843 GMT+0530

T622019/05/20 10:26:27.986136 GMT+0530

T632019/05/20 10:26:27.987186 GMT+0530