Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:39:2.420558 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / हवामानाप्रमाणे शेतीत बदल
शेअर करा

T3 2019/05/24 20:39:2.425502 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:39:2.456497 GMT+0530

हवामानाप्रमाणे शेतीत बदल

हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, उष्ण तापमान आदी घटक शेतीवर परिणाम घडवू लागले आहेत.

आपल्यालाही हवामानाप्रमाणे शेतीत बदल करावे लागणार

हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, उष्ण तापमान आदी घटक शेतीवर परिणाम घडवू लागले आहेत. भविष्यात हवामानाशी सुसंगत उपाययोजना वा तंत्रज्ञानाचा शोध व त्याकडे वळणे गरजेचे झाले आहे. त्यावर टाकलेला संक्षिप्त दृष्टीक्षेप.

अँटीहेल झेलेल गारांना करील पिकांचे संरक्षण

गारपीट व अवकाळी पावसाने महाराष्ट्रात नुकताच हाहाकार उडवला. मात्र शेतकऱ्यांनी हतबल होण्याची गरज नाही. पिकांचे अशा आपत्तीपासून संरक्षण करण्याचे उपाय आहेत, जगभरात ते वापरलेही जातात. त्याविषयी.

नेटहाऊस क्षेत्रातील काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अँटिहेल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकेल असा विश्‍वास व्यक्त केला आहे. ऍग्री प्लास्ट कंपनीचे राजीब रॉय यांना नेटहाऊस विषयातील अनेक वर्षांचा अनुभव आहे. नागपूर येथे लवकरच आपण यासंबंधीचा प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातस्थित नील ऍग्रिटेक कंपनीचे अधिकारी अनंत पाटसकर यांच्या मते अँटिहेलसारख्या नेटसाठी प्रति चौरस मीटरचा खर्च 70 ते 80 रुपये याप्रमाणे एकरी तो तीन लाख रुपयांपर्यंत येऊ शकेल. मात्र त्यासाठी लागणाऱ्या हार्डवेअरचा खर्च वेगळा असेल.

गारा तयार न होऊ देणारे यंत्र

गार तयार होण्याची अवस्थाच बिघडवून टाकण्याचे काम छायाचित्रात दिसणाऱ्या या यंत्राद्वारा केले जाते. ज्या वेळी वादळी हवामान स्थिती तयार होते, गारा पडण्याची शक्‍यता दिसू लागते, त्या काळात त्याचा वापर करायचा असतो. या यंत्रात विशिष्ट पद्धतीने तयार केलेला ब्लास्ट चेंबर आहे. त्याद्वारा ऍसिटीलीन वायू आणि हवेला उद्दिप्त केले जाते. त्यातून स्फोटासारखा दाब उत्पन्न होऊन त्याच्या तीव्र लहरी तयार होतात. त्यांचा मोठा आवाज निर्माण होतो.

ध्वनीच्या वेगाने त्या आकाशात घुसतात. त्यांच्याद्वारा गार तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा तयार होऊन तिची निर्मिती थांबवली जाते. मात्र गार जर तयार झालेली असेल तर ती मात्र या यंत्राद्वारा वितळवता येत नाही. पाचशे मीटरच्या परिघापर्यंत हे यंत्र प्रभावशाली काम करू शकते. प्रत्येकी चार सेकंदांनी या यंत्राद्वारा अशा प्रकारे फायरिंग करता येते. यंत्र चालू-बंद करण्यासाठी मनुष्यबळाऐवजी रडार नियंत्रित यंत्रणेचा वापरही केला जाऊ शकतो. न्यूझीलंडमधील एका कंपनीने हे यंत्र विकसित केले असून अनेक वर्षांपासून या देशात त्याचा वापर केला जातो.

गारारोधक नेट तंत्रज्ञानाविषयी

गारारोधक नेट तंत्रज्ञानाविषयी तमिळनाडूस्थित ऍग्रीप्लास्ट कंपनीचे राजीब रॉय यांनी दिलेली माहिती अशी

 • गारा (हेल), हिमवर्षाव (स्नो) आदींपासून पिकांचे संरक्षण करता येते. मात्र बर्फाच्या गोळ्यांचे ओझे सहन करण्याची ताकद व क्षमता असलेले नेट वापरावे लागेल. महाराष्ट्रात नुकतीच झालेली प्रचंड स्वरूपाची गारपीट हा तसा पहिलाच मोठा अनुभव असल्याने यापूर्वी त्यावर फारसा विचार झाला नव्हता. मात्र आता नागपूर जिल्ह्यात आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
 • स्थानिक भौगोलिक हवामान परिस्थिती लक्षात घेऊन त्या पद्धतीच्या नेटहाऊसचा अभियांत्रिकी आराखडा वा संरचना तयार करणे गरजेचे आहे. विविध प्रकारचा भाजीपाला, फुले, केळी, लिंबूवर्गीय फळे व अन्य फळांत गारारोधक नेटचा (अँटीहेल) वापर परदेशात केला जातो. पडणाऱ्या गारांचा वेग हा मुख्य मुद्दा असणार नाही, तर नेटची गुणवत्ता अशी हवी की पडणाऱ्या गारांचा प्रभाव झेलण्याबाबत "फ्लेक्‍सीबल' असण्याचा गुणधर्म त्यात असायला हवा. प्रति मीटर वर्ग क्षेत्रफळात जमा होणाऱ्या गारा वा बर्फकणांचा प्रभाव नेटहाऊसच्या आराखड्याशी संबंधित आहे.
 • अशा स्वरूपाच्या नेटहाऊसचे डिझाईन वा बांधणी नेहमीच्या नेटहाऊसच्या तुलनेत वेगळीच करावी लागते. पीक कोणते आहे, वाऱ्याचा वेग किती आहे, पाऊसमान, प्रति मीटर क्षेत्रफळात जमा होणाऱ्या कमाल गारांची संख्या या घटकांवर त्याची बांधणी अवलंबून आहे.
 • खर्च - पिकाचे क्षेत्र, अँटीहेल नेटहाऊसची संरचना यावर खर्च अवलंबून आहे. प्रति चौरस मीटरला तो 200 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत येऊ शकतो. एकरी सुमारे 4000 चौ.मी. क्षेत्र हिशेबाने हा खर्च 12 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. त्याला कृषी विभागाचे 50 टक्के किंवा त्याहून अधिक अनुदान मिळाले तर हा खर्च कमी होऊ शकतो.
 • गारपीट ही वर्षातील काही ठराविक काळातच होते असे गृहीत धरल्यास वर्षातील उर्वरित काळासाठी नेट काढूनही ठेवता येते. यातील 95 टक्के "मटेरिअल' एका जागेपासून दुसऱ्या जागी हलवताही येते. नेटहाऊसची गुणवत्ता, हवामान परिस्थिती यांचा निकष धरल्यास हे नेट दहा वर्षांपर्यंत टिकून राहू शकते.
 •  

  इस्राईल किंवा जगभरात अशा प्रकारचे प्रकल्प यशस्वी झाले आहेत.

  पॉलिहाऊसमध्ये केळी

  भारतात प्रयोगाला झाली सुरवात


  जळगावस्थित जैन उद्योग समूह कंपनीतील वरिष्ठ शास्त्रज्ञ के.बी. पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात अद्याप केळी पिकात शेडनेट वा पॉलिहाऊसचा प्रयोग केल्याचे माझ्या पाहण्यात वा ऐकिवात नाही. मात्र जैन उद्योग समूहाने याविषयीचे प्रयोग आपल्या संशोधन व विभाग प्रक्षेत्रात सुरू केले आहेत.

  सध्याच्या हवामान बदलाच्या काळात अशा प्रयोगांकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. केळी पिकासाठी पांढऱ्या रंगाची नेट वापरली तर तापमान नियंत्रित होऊन बाष्पीभवनाचा वेग कमी होऊ शकतो. सुमारे 30 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्याची बचत होऊ शकते. केळी बागेचे अतिउष्णतेपासून संरक्षण करणे गरजेचे असते. नेटच्या साह्याने आतील आर्द्रता वाढविल्याने केळी पिकाला ते आवश्‍यक होते. घडाचे वजन, लांबी, जाडी, रंग, लुसलुशीतपणा वाढतो. एकरी उत्पादनासोबत केळीची गुणवत्ताही वाढते. केळीमध्ये विषाणूजन्य रोगांची मोठी समस्या असते. या रोगाचे रसशोषक किडीवाहक असतात. त्यांना रोखण्यासाठी नेटहाऊसचा उपयोग होऊ शकतो.

  सध्या टाकरखेडा येथील आमच्या प्रक्षेत्रात पॉलिहाऊसमध्ये घेतलेल्या केळी प्रयोगाला जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे. सहा बाय सहा फुटांवर केळी घेतली. त्यात एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन आले आहे. येत्या जूनपासून आम्ही शेडनेटमधील केळी प्रयोगाला सुरवात करणार आहोत.

  हरियाना सरकारने सुरू केला पॉलिहाऊसमध्ये केळीप्रयोग


  पाटील म्हणाले की, पॉलिहाऊसमध्ये केळी घेण्याचा प्रयोग हरियानात नुकताच सुरू झाला आहे. तेथील सरकारनेच त्यासाठी पुढाकार घेतला असून सरकारी प्रक्षेत्रात अर्धा एकरात त्याचे प्रयोग आमच्या कंपनीच्या सहकार्यातून सुरू आहेत. हरियानासारख्या प्रदेशात थंडीची लाट, धुके येते. अशा परिस्थितीत केळीची वाढ जागेवरच थांबते. नवी फूट येत नाही. थंडीमुळे पाने जळतात. अशा स्थितीत पॉलिहाऊसमधील केळीचा प्रयोग फायदेशीर ठरणारा आहे.

  मोरोक्कोत पाच हजार एकरांवर केळी


  मोरोक्को देशात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रावर ग्रीनहाऊसमध्ये केळी पीक घेतले जाते. हा थंड हवामानाचा प्रदेश आहे. तेथे कृत्रीम पद्धतीने प्रकाश पुरवला जातो. तापमान, प्रकाश, आर्द्रता, पाणी व खते यांचे काटेकोर पद्धतीने नियंत्रण केले जाते. वास्तविक या देशात नेटबाहेरील हवामान केळीला अनुकूल नसले तरी हवामानाशी सुसंगत असे प्रयोग तेथे सुरू आहेत.

  तुर्कस्तानातही पॉलिहाऊस

  या देशात मोरोक्कोप्रमाणे नियंत्रण व्यवस्थापन न करता केवळ पॉलिहाऊसमध्ये सुमारे अडीच हजार एकरांवर केळी पीक घेतले जात आहे. हा देश केळी निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे केळीची गुणवत्ता टिकवण्यासाठी देश प्रयत्नशील आहे.

  इस्राईलमध्ये उच्च तापमानापासून बचाव करण्यासाठी व त्या अनुषंगाने पाण्याची बचत करण्यासाठी शेडनेटमध्ये केळी घेतली जात आहेत.

  बटाटा हे पंजाबचे मुख्य रब्बी पीक. या पिकात उशिराचा करपा (लेट ब्लाइट) हा अत्यंत महत्त्वाचा रोग आहे.
  हे लक्षात घेऊन लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने "इंटरनेटद्वारे हवामानातील घटकांवर आधारित रोगाचा आगाऊ इशारा व सल्ला' हा प्रकल्प यशस्वी केला. रोग येण्यासंबंधी शेतकऱ्यांना आधीच सावध करणारे वा इशारा देणारे "फोरकास्टिंग' मॉडेलही तयार केले. त्याची अंमलबजावणीही केली.

  विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. पी. सिंग ऍग्रोवनशी बोलताना म्हणाले की, हा प्रकल्प विद्यापीठात 2008 मध्ये सुरू झाला. तो पूर्ण झाला आहे. त्याचा प्रसार अद्याप शेतकऱ्यांपर्यंत सुरू आहे. पंजाबातील सहा महत्त्वाच्या ठिकाणी "ऍटोमॅटिक वेदर स्टेशन' बसविण्यात आली आहेत.
  कोणत्याही किडी-रोगाच्या नियंत्रणासाठी असा प्रकल्प सुरू करायचा तर त्याविषयीचा काही वर्षांचा पुरेसा "डाटा' असणे महत्त्वाचे असते. त्यानंतर या पद्धतीची शास्त्रीय सिद्धता पडताळावी लागते. प्रयोगशाळेत चाचण्या घ्याव्या लागतात.

  आम्ही राबविलेला प्रकल्प हा विद्यापीठाचा स्वतंत्र उपक्रम आहे. पंजाब सरकारचा त्यात सहभाग नाही. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा मिळत आहे. बटाटा उत्पादकांत आम्ही सातत्याने या पद्धतीविषयी जागृती करतो आहे. इथल्या शेतकऱ्यांची नवी पिढी आमच्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या पद्धतीविषयी माहिती व सल्ला पाहते व त्यानुसार पीक नियोजन करते. या सल्ल्यामुळे रोगाचा आगाऊ इशारा मिळू लागल्याने पिकाची योग्य काळजी घेणे व बुरशीनाशकांच्या अनावश्‍यक फवारण्या वाचवणे त्यांना शक्‍य झाले आहे. कोणत्याही राज्यात असा प्रकल्प राबवला जाऊ शकतो. आपल्या भागातले मुख्य पीक, मुख्य किडी-रोग ओळखून तसे काम सुरू केले पाहिजे. "वेदर स्टेशन'ची देखभाल करणे अवघड गोष्ट नाही. ते आम्ही करून दाखविले आहे. आता खरबूज, कलिंगडावरील डाऊनी रोग आदींवर आम्ही याच पद्धतीने काम सुरू केले आहे.

   

  स्त्रोत: अग्रोवन

3.03539823009
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:39:2.998390 GMT+0530

T24 2019/05/24 20:39:3.005993 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:39:2.350444 GMT+0530

T612019/05/24 20:39:2.370753 GMT+0530

T622019/05/24 20:39:2.410070 GMT+0530

T632019/05/24 20:39:2.410852 GMT+0530