অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गारिपटीनंतर पिकांचे व्यवस्थापन

गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून कमी-अधिक प्रमाणात वाचलेल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. त्यातच तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. त्याचाही विचार करावा.

डाळिंब काढणी अवस्थेतील बागांसाठी


ऑक्टोबरमधील हस्त बहार धरलेल्या डाळिंब बागांची फळे काढणी अवस्थेत असताना गारांचा, तसेच पावसाचा फटका जास्त प्रमाणात बसलेला आहे. या बागेतील फळांना इजा झाली असून, काही ठिकाणी फळे तडकण्याचे प्रमाण दिसून येत आहे. जमिनीमध्ये ओलावा असल्याने बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढू शकते. अवकाळी पावसानंतर त्वरित ६ ते ७ दिवसांच्या अंतराने बोर्डो मिश्रण (०.८ टक्का) (मोरचूद ८०० ग्रॅम, चुना ८०० ग्रॅम आणि २०० लिटर पाणी) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साइड २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच झाडांच्या मोडलेल्या फांद्या छाटून झाडांना योग्य आकार देऊन घ्यावा. झाडे पडली असल्यास किंवा वाकलेली असल्यास त्यांना बांबूंचा आधार देऊन खतांचे आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे.

गारपिटीमुळे इजा झालेली फळे काढून टाकावीत


आंबे बहारातील बहुतांश डाळिंब बागा फुलोरा अवस्थेत किंवा सुरवातीच्या अवस्थेत आहेत. या बागांमध्ये फुलकळ्या मोठ्या प्रमाणात गळालेल्या आहेत. अचानक पाऊस आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे फुलगळ वाढण्याची शक्यता आहे- ज्या ठिकाणी फुलांची लहान अवस्था असलेल्या बागांतील कळ्या काळ्या पडलेल्या आहेत.

उपाययोजना

  • बागेत फुलांची गळ होऊ नये म्हणून नॅप्थील अॅसेटिक ॲसिड (एनएए) २५ मि. लि. प्रति १०० लिटर आणि ०-५२-३४ पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे. यानंतर कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • तसेच पीक संरक्षणासाठी गारपिटीनंतर ४ ते ५ दिवसांच्या अंतराने बोर्डो मिश्रणाचे ०.५ टक्का किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साइड २ ग्रॅम प्रति लिटर फवारावे.
  • दुसरी फवारणी टेब्युकोनॅझोल १ मि. लि. प्रति अधिक कार्बोसल्फान २ मि. लि. प्रति लिटर एकत्रितपणे फवारावे.
  • तिसरी फवारणी कॅप्टन २.५ ग्रॅम प्रति लिटर अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.२५ ग्रॅम प्रति लिटर फवारावे.
  • चौथी फवारणी फोसेटिल एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर अधिक ॲसिफेट १.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रितपणे फवारावे. (अर्थात हवामानाचा अंदाज बघून फवारणी करावी.)

 

मार्चच्या शेवटी तापमान वाढण्यास सुरवात झाली असून, लाल कोळी आणि फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी सुरवातीला करंज तेल २ मि. लि. प्रति लिटर याची फवारणी करावी. एकरी २० चिकट सापळे लावावेत. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १ मि. लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. लाल कोळी असेल तर डायकोफॉल १.५ मि. लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

आंबा

आंबा पिकामध्ये गारपीट, तसेच वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळांची गळ झाली आहे. तसेच नवीन मोहरही गळून गेलेला आहे.
  • बागेतील फळगळ थांबविण्यासाठी १३:००:४५ हे खत १० ग्रॅम प्रति लिटर फवारावे.
  • भुरी व फुलकिडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हेक्झाकोनॅझोल १ मि. लि. अधिक फिप्रोनील १.५ मि. लि. प्रति लिटर एकत्रितपणे फवारावे.

पेरू

  • फांद्या मोडलेल्या असतील तर त्या व्यवस्थित कापून घ्याव्यात. फळांना व फांद्यांना इजा झालेली असल्यास कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर फवारावे.
  • देवी रोगाचा प्रादुर्भाव असल्यास कॉपर हायड्रॉक्साइड २ ग्रॅम प्रति लिटर अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन २५० पीपीएम (२५ ग्रॅम प्रति १०० लिटर) फवारावे.
  • बाग ताणावर सोडण्यापूर्वी अतिरिक्त स्फुरद व पालाश द्यावे. यासाठी जमिनीतून सुपर फॉस्फेट ५०० ग्रॅम व एमओपी १५० ग्रॅम प्रति झाड द्यावे. ००:५२:३४ ची पाच ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावी. यामुळे फांदी व खोडामध्ये अन्नसाठा वाढवून बहार चांगला येतो.

कांदा

कांद्याच्या पातीला गारपिटीमुळे जखमा झाल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी ॲझाक्सीस्ट्रोबीन ०.५ मि. लि. प्रति लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १ मि. लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १.५ मि. लि. लिटर स्टीकरसह फवारावे. दोन महिन्यांच्या आतील कांदा पिकांचे मर्यादित नुकसान झाले असल्यास पात वाढीसाठी १९:१९:१९ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
यानंतर दुसरी फवारणी १३:००:४५ ची पाच ग्रॅम प्रति लिटर अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मिश्रणांची २.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रितपणे फवारणी करावी. अशा अवस्थेत पिकास जमिनीतून एकरी ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

टोमॅटो

  • गारपिटीमुळे खोड व फांद्यांना इजा झाली असल्यास कॉपर हायड्रॉक्साइड २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बेनोमिल ०.५ ग्रॅम प्रति लिटर, फळ पोखरणाऱ्या अळी आणि फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ०.३ मि. लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारावे. तसेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १.५ मि.लि. प्रति लिटर अधिक करंज तेल २ मि.लि. प्रति लिटर स्टीकरसह फवारावे.

वेलवर्गीय भाजीपाला


वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भुरी आणि ॲन्थ्रॅक्नोज नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझॉल एक मि. लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करून घ्यावी.

ऊस

पूर्वहंगामी व सुरू उसासाठी गारपिटीमुळे पानांचे नुकसान झाले असल्यास जमिनीतून एकरी ५० किलो अमोनियम सल्फेट द्यावे. तसेच पानावर १९:१९:१९ एक किलो व युरिया एक किलो प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. ठिबक असेल तर ठिबकद्वारा पिकाच्या वाढीच्या अवस्थेचा विचार करून खते द्यावीत.

 

संपर्क

डॉ. भास्कर गायकवाड, ९८२२५१९२६०
(लेखक कृषी विज्ञान केंद्र - पायरेन्स बाभळेश्‍वर, ता. राहाता, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate