অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

थंडीच्या काळात अंजीर बागेचे व्यवस्थापन

थंडीच्या काळात अंजीर बागेचे व्यवस्थापन

अंजिराचे झाड फळांवर येण्याच्या बेतात असताना पाऊस पडला किंवा आकाश ढगाळलेले असेल तर ते वातावरण अंजीर फळांना हानिकारक ठरते. ओलसर, दमट हवामान मात्र या पिकास निश्‍चितपणे घातक ठरते. अति थंडीमुळे फळात साखर निर्माण होण्याची प्रक्रिया थांबते. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्राण वाढल्यास फळांना भेगा पडतात, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
अंजीर बागेस उष्ण व कोरडे हवामान मानवते. फळांची वाढ होत असताना उष्णतामान 27 ते 37 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असून आकाश निरभ्र असावे. कोरड्या हवामानात उत्तम प्रतीची फळे मिळतात.

हवामान व जमिनीचा प्रकार हे दोनच घटक अंजीर लागवड ठराविक भागात होण्यास अनुकूल ठरतात. अति कमी उष्णतामानात अंजिराचे झाड सुप्त अवस्थेत राहते. हिवाळ्यात उष्णतामान जेव्हा पाच सेल्सिअसपेक्षा कमी होते. तेव्हा झाड सुप्त राहते व स्वतःचा थंडीपासून बचाव करते. थंडीचे प्रमाण जेव्हा वाढते. त्या वेळेसच झाडांची पानगळ व फळगळ सुरू होते. थंडीच्या काळात अंजीर बागेस पालाश या घटकाची कमतरता जाणवू लागते व त्यामुळेदेखील पान व फळगळ होते. केवळ थंडीमुळे अंजीर उत्पादनात 30 ते 35 टक्के घट येऊ शकते.


अंजिराचे झाड फळांवर येण्याच्या बेतात असताना पाऊस पडला किंवा आकाश ढगाळलेले असेल तर ते वातावरण अंजीर फळांना हानिकारक ठरते. ओलसर, दमट हवामान मात्र या पिकास निश्‍चितपणे घातक ठरते. अति थंडीमुळे फळात साखर निर्माण होण्याची प्रक्रिया थांबते. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्राण वाढल्यास फळांना भेगा पडतात, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.

थंडीचा परिणाम


सन 2010 व सन 2011 चे हवामान गेल्या 40 वर्षांपेक्षा खूपच वेगळे असल्याचे तापमानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. या वर्षीच्या खट्टा बहरामध्ये अवकाळी पाऊस व सप्टेंबर, ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या महिन्यांतील अनुक्रमे 8, 7 व 6 दिवस सकाळी पडलेल्या तीव्र दाट धुक्‍यामुळे रोग व किडीची तीव्रता वाढली, संपूर्ण झाडे, पाने व फळेरहित झाल्यामुळे 60 ते 70 टक्के उत्पादनात घट येते. खट्टा बहर घेणारी सर्वच गावे जाधववाडी, दिवे, काळेवाडी, सोनोरी झेंडेवाडी, वनपुरी व खोर येथील अंजीर बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

मीठा बहर महाराष्ट्रात सर्वत्र घेतला जातो. सन 2010 ते 2011 मधील हवामान हे गेल्या 40 वर्षांपेक्षा प्रतिकूल स्वरूपाचे असल्याचे अंजीर उत्पादक शेतकरी सांगत होते. त्याकरिता मागील 40 वर्षांच्या हवामानाची व सन 2010-2011 ची तुलना केली असता असे दिसून आले, की सदर हवामान अंजीर पिकास हानिकारक होते.

हवामानातील बदलाचा अंजीर बागेच्या वाढीवर व उत्पादनावर वाईट परिणाम झालेला आहे. बागेतील झाडांच्या पानांची व फळांची वाढ समाधानकारक होऊ शकली नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कमाल व किमान तापमानातील मोठी तफावत अंजीर बागांना मानवली नाही. सन 2010-2011 मध्ये किमान तापमान डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये अनुक्रमे 5.5 ते 16.6 अंश से. 4.5 ते 13.1 अंश से. 9.5 ते 18.1 अंश से. व 10.1 ते 17.7 अंश से. होते. सन 2010-2011 मध्ये किमान तापमान आठ अंश से.पेक्षा कमी दोन महिने राहिले व त्यांचे वाईट परिणाम अंजीर बागांवर झाल्याचे सर्वत्र आढळून येत आहे. सदरच्या हवामानातील बदलामुळे उत्पादनात 70 ते 90 टक्‍केपेक्षा अधिक घट असल्याचे दिसून आले आहे. काही अंजीर बागा 100 टक्के उत्पादनात घट आल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
हवामानातील बदलाचा अंजीर पिकांवर होणारा परिणाम पाहता, अंजीर बहराचे महिने बदलले तरच हे पीक तग धरू शकेल व त्यासाठी नवीन बहराचे संशोधन हाती घेणे गरजेचे आहे.

थंडीमध्ये बागेचे व्यवस्थापन


  • बागेची स्वच्छता व व्यवस्थापन महत्त्वाचे.
  • पिकांचे पोषण व पाणी व्यवस्थापन.
  • बदलत्या हवामानाप्रमाणे बहरतात बदल करणे काळाची गरज.
  • बागेच्या पश्‍चिम व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, मलबेरी, करंज, शेवगा, हलगा, पांगारा, जांभूळ इ. लागवड करावी.
  • हिवाळ्यात बागेतील झाडांत पसरणारी वाटाणा, वाल, चवळी, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, पालेभाज्या आदी मिश्र पिके घ्यावीत, म्हणजे जमिनीत उष्णतामान टिकून राहण्यास मदत होते.
  • अंजीर बागेला विहिरीचे, पाटाचे पाणी घ्यावे. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेचे उष्णतामान थोडे वाढते आणि झाडांच्या वाढीवर थंडीचा विपरीत परिणाम होत नाही.
  • अंजीर बागेत रात्री जागोजागी शेकोटी पेटवून धूर धुमसत राहील असे पाहावे. त्यामुळे बागेत धुराचे दाट आवरण तयार होईल व बागेचे तापमान वाढीस मदत होईल.
  • अंजीर बागेच्या वाफ्यांमध्ये शक्‍य असल्यास कडबा, गवत, सरमाड, पालापाचोळाचे आच्छादन करावे.
  • लहान लावलेली कलमे, रोपवाटिकेतील रोपे व कलमे यांना तुरंट्या, कडबा, पाचट अथवा पॉलिथिनचे छप्पर करावे.
  • थंडीचे प्रमाण वाढल्यास प्रति झाड 200 ते 500 ग्रॅम या प्रमाणात म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश हे खत जमिनीतून घ्यावे. असे केल्यास फळ गळ थांबते.
  • पोटॅश नायट्रेट किंवा पोटॅश क्‍लोराईड त्याचे कमी तीव्रतेचे द्रावण झाडास दिल्यास झाडांचा काटकपणा वाढू शकतो.
  • तांबेरा नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा तीन ग्रॅम डायथेन एम 45अधिक बाविस्टीन एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांनी फवारावे.
  • अंजिराची निरोगी झाडे, अशक्त, रोगट किंवा कीडग्रस्त झाडापेक्षा जास्त थंडी सहन करू शकतात. त्याकरिता अंजीर बागेची उत्तम निगा ठेवून अंजिराची झाडे निरोगी व कीडरहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


संपर्क - डॉ. खैरे, 9371015927 
(लेखक प्रकल्प अधिकारी, अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र, 
जाधववाडी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate