অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बदलत्या वातावरणाचा हापूस आंबा मोहोरावर परिणाम

हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्‍यक आहे. थंडी जर चांगल्याप्रकारे पडली नाही तर आंब्याला मोहोर चांगल्या प्रकारे येत नाही. आला तर तो उशिरा येतो. त्याचा फळ उत्पादनावर परिणाम दिसून आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून कोकणातील हापूस आंब्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. ज्यामुळे मोहोर वर्षे, फलधारणा, फळांची वाढ यावर विविध परिणाम दिसून येत आहे. आंबा मोहोर येण्याची प्रक्रिया ही बऱ्यापैकी क्‍लिष्ट आहे आणि ही प्रक्रिया निव्वळ एका घटकावर अवलंबून नाही. आंब्याचे झाड आणि वातावरण हे दोन्ही आंबा मोहोर येण्याला कारणीभूत आहेत. आंब्याच्या जातीपरत्वे आंब्याला मोहोर येतो. नैसर्गिकपणे विचार केल्यास हापूस आंब्याला एक वर्षाआड मोहोर येतो तर नीलम, रत्ना या जातींना दरवर्षी मोहोर येतो. हापूस आंब्याला जून काडीमधून मोहोर फुटतो. सुमारे एक वर्ष वयाच्या जून झालेल्या काडीतून हापूसला मोहोर येतो. याचा दुसरा अर्थ असा, की मोहोर येण्यासाठी आंब्याचे झाड सक्षम असावे लागते, तसेच पुरेसा कर्बोदकाचा साठा त्यामध्ये असावा लागतो.

हा कर्बोदकांचा साठा होण्यासाठी पानांद्वारे होणारी प्रकाशसंश्‍लेषण क्रिया महत्त्वाची ठरते. ही क्रिया चांगल्या प्रकारे झाली असल्यास फुले येण्यासाठी आवश्‍यक कर्बोदकांचा साठा झाडामध्ये होतो आणि अशा झाडांमधून मोहोर येण्याची शक्‍यता जास्त राहते.

आंब्याच्या झाडामध्ये अनेक प्रकारची वाढनियंत्रके हे कार्यरत असतात. यापैकी जिबरॅलिक ऍसिड आणि मोहोर येणे याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. झाडामध्ये म्हणजेच पाने व फांद्यांमध्ये जर जिबरॅलिनची पातळी जास्त असली, तर हापूस आंब्याच्या झाडामधून मोहोर येण्याची शक्‍यता अत्यंत कमी असते. जर जिबरॅलिनची पातळी कमी असली तर मात्र आंब्याला मोहोर येण्याची शक्‍यता दाट असते.

नैसर्गिकरीत्या हापूस आंब्याला जी एक वर्षाआड फळे येतात ती त्याचमुळे. जिबरॅलिनची पातळी ज्या वर्षी आंबे लागतात त्या वर्षी वाढते, पुढील वर्षी मोहोर अत्यल्प येतो अथवा येत नाही. ज्या वर्षी मोहोर कमी येतो अथवा येत नाही, त्या वर्षी जिबरॅलिनची पातळी कमी राहते. पुढील वर्षी आंब्याला मोहोर चांगला येतो.

झाडाच्या या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पॅक्‍लोब्युट्रॉझॉल या संजीवकाची शिफारस केली आहे.

थंडी आणि पाण्याच्या ताणाचा परिणाम

झाडाबरोबरच झाडाबाहेरील घटकदेखील मोहोर येण्यासाठी तितकेच आवश्‍यक आहेत. यातला सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे थंडी. हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13 अंश से. अथवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्‍यक आहे. थोडक्‍यात, थंडी जर चांगल्याप्रकारे पडली नाही तर आंब्याला मोहोर चांगल्या प्रकारे येत नाही. आला तर तो उशिरा येतो.

थंडीबरोबरच पाण्याचा ताणदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. पावसाळा संपल्यानंतर हा ताण झाडाला मिळण्यास सुरवात होते. जर पाऊस नियमित पावसाळा सोडून पुढेदेखील पडत राहिला, म्हणजे जर नोव्हेंबरपर्यंत पडत राहिला, तर आंब्याची मोहोर येण्याची प्रक्रिया रखडते व आंब्याला मोहोर उशिरा येतो.

काही वेळा आपल्याला असे दिसून येते, की पावसाळ्यात म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ज्या वेळी भरपूर पाऊस सतत पडणे अपेक्षित असते त्या वेळी जर मोठा खंड पडला, म्हणजे पाऊस न पडता 15 ते 20 दिवस जर सतत ऊन पडले तर अशा वेळेला या बागेमध्ये आंब्याला मोहोर यायला सुरवात होते. विशेषतः समुद्रानजीकच्या आंबा बागेमध्ये मोहोर अवकाळी येण्याची उदाहरण आढळतात. पाण्याचा ताण महत्त्वाचा आहे. जर पावसाळ्यानंतर आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले तर अशा आंब्याच्या झाडाला मोहोर उशिरा येण्याची दाट शक्‍यता असते.

कोकणामध्ये समुद्रालगत असलेल्या आंबा बागा उत्पन्नाच्या दृष्टीने आघाडीवर आणि सरस असतात असा एक समज आहे व तो बऱ्याच अंशी खरा आहे. याला कारण म्हणजे समुद्रावरून येणारा खारा वारा. समुद्रावरून येणारा वारा हा आपल्यासोबत क्षारांचे कण घेऊन येतो, हे क्षार आंब्याच्या पानांवर पडतात आणि त्यामुळे एक प्रकारचा ताण हा त्या झाडाला मिळतो आणि आंब्यामधून मोहोर येण्याच्या प्रक्रियेला मदत होते.

हापूसच्या मोहोरण्यावर सातत्याने बदललेल्या हवामानाचा परिणाम होतो आहे. गेल्या वर्षी पावसाळा जवळपास ऑक्‍टोबर अखेरपर्यंत लांबला. परिणामी मोहोर येणे लांबले.

मोहोर उशिरा आला तर फळधारणा उशिरा होते. सहाजीकच फळे काढणीसाठी उशिरा तयार होतात. हापूसचे वैशिष्ट्य म्हणजे लवकर बाजारात येणाऱ्या फळांना आकर्षक दर मिळतो तर उशिरा येणाऱ्या फळांना अन्य राज्यांमधून येणाऱ्या फळांशी स्पर्धा करावी लागते. परिणामी दर कमी मिळतो. काही वेळा उशिरा तयार होणारी फळे नियमित पावसाच्या अथवा मे महिन्यामध्ये येणाऱ्या अवेळी पावसामध्ये सापडतात. परिणामी या फळांचे नुकसान होते. या पावसामुळे वातावरणातील आर्द्रता वाढल्याने फळमाशीसारख्या किडींचे प्रमाणदेखील लक्षणीय प्रमाणात वाढते.

बिगर हंगामी पावसाचा परिणाम

कोकणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये पाऊस पडण्याचे प्रकार पडले आहेत. या वेळी उशिरा आलेल्या मोहोराची फळधारणा झालेली असते, तर आधीच्या मोहोराची फळे विकसित झालेली असतात. हा अवेळी पाऊस अल्प कालावधीसाठी म्हणजेच एखादा दिवस पडल्यास फारसे नुकसान होत नाही. अर्थात, या अवेळी पावसाच्या वेळी सोसाट्याचा वारा असल्यास फळे गळून पडतात; मात्र हा पाऊस दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास फळांवर डाग पडतात. अशा वेळी करपा रोगाचे प्रमाण वाढते.

आंब्याला मोहोर येणे त्यापासून फळधारणा होण्याच्या कालावधीमध्ये बिगर हंगामी पाऊस पडल्यास आंबा पिकाची मोठी हानी होते. कोकणामध्ये 2006, 2008 व 2010 च्या हंगामामध्ये अनुक्रमे फेब्रुवारी - मार्च व एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पडला. अवेळी पडलेल्या पावसामुळे अँथ्रॅकनोज या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर डाग पडतात. फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढते तसेच उर्वरित फळांना कमी दर मिळतो. पावसामुळे वाढलेल्या आर्द्रतेचे प्रमाण दीर्घकाळ राहिल्यामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणावर फळगळ होऊ शकते.

गेली दोन वर्षे कोकणामध्ये सर्वसाधारण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्याचप्रमाणे हा पाऊस जास्त कालावधीसाठी देखील पडला आहे. या पावसामुळे पावसाळ्यानंतर पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. जून फांद्यांमधून ज्या ठिकाणी मोहोर येणे अपेक्षित असते अशा ठिकाणी ही पालवी येते. ही पालवी किमान तीन महिने वयाची झाल्यानंतर त्यातून मोहोर येण्याची शक्‍यता असते. पॅक्‍लोब्युट्रॉझॉलचा वापर केला असल्यास या पालवीतून मोहोर येण्याची शक्‍यता दाट असते, परंतु पॅक्‍लोब्युट्रॉझॉलचा वापर केला नसल्यास अशा पालवीतून मोहोर येणे बऱ्याच प्रमाणात थंडीवर अवलंबून असते. सततच्या व जास्त पडणाऱ्या पावसामुळे रायझोक्‍टोनिया व बॉट्रीओडिप्लोडिया या बुरशीजन्य रोगामुळे फांदीवर रोगाचा प्रादुर्भाव कोकणात आढळून येत आहे.

मोहोराची क्रिया

सर्वसाधारणपणे कोकणातील पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये संपतो. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये उष्णता वाढते. हवामानातील आर्द्रता कमी होते. जमिनीमधील ओलावा तसेच पाण्याची पातळी कमी होते. नोव्हेंबर महिन्यापासून थंडी सुरू होते आणि हापूस मोहोरतो. या सर्वसाधारण परिस्थितीत पूर्ण वाढलेल्या हापूसच्या एका झाडावर सुमारे 1000 फुलांचे तुरे येतात. या प्रत्येक तुऱ्यामध्ये 1000 ते 2000 फुले असतात.

ही फुले नर व संयुक्त असा दोन्ही प्रकारची असतात. हापूस आंब्यामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण हे सर्वसाधारणपणे 11 ते 13 टक्के असते. उर्वरित फुले नर असतात. इतर जातीमध्ये हेच प्रमाण रत्ना (27 टक्के), केशर (30 टक्के), सिंधू (35 टक्के) तर गोवा मानकूर (25 टक्के) असते. आंब्याचा मोहोर येण्यासाठी 13 अंश से.पेक्षा कमी तापमान आवश्‍यक आहे. मात्र मोहोर आल्यानंतर जर सातत्याने तापमान कमी राहिले तर मात्र ते धोकादायक ठरते. मोहोरावस्थेत असताना सततच्या कमी तापमानामुळे संयुक्त फुलांचे प्रमाण खालावते.

मागील हंगामामध्ये आंबा मोहोरावस्थेत असताना डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुमारे 60 दिवस दहा अंश से.पेक्षा कमी तापमान राहिले यामुळे संयुक्त फुलांचे प्रमाण तीन ते पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले. एकूण संयुक्त फुलांपैकी 20 टक्के फुले अपूर्ण (काही भाग नसल्याने) गळून पडतात. 20 टक्के फुले कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे तर उर्वरित 40 ते 50 टक्के फुले प्रभावी परागीभवन न झाल्याने गळून पडतात.

फुलांमध्ये सरासरी दोन ते सहा तुऱ्यांमध्ये एक फळ किलोला हे ------उचल सर्वसाधारण समजले जाते. दीर्घकाळापर्यंतच्या कमी तापमानामुळे परागीभवनासाठी आवश्‍यक कीटकांचे प्रमाण देखील कमी होते. त्याचा परिणाम परागीभवनावर होतो. कमी तापमानामुळे परागीभवन होऊन फळधारणा झालेल्या फळांची वाढ संथगतीने होते. फळ पक्व होण्यासाठी आवश्‍यक एकक तापमान जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंबा फळे पक्व होत नाहीत. आवश्‍यक एकक तापमान जातीपरत्वे बदलते. गेल्या दहा वर्षांमध्ये वातावरणातील बदलामुळे देशाच्या विविध किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आंब्याच्या उत्पादकतेमध्ये लक्षणीय घट झालेली दिसून येते. 

(लेखक उद्यानविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

बदलत्या वातावरणाचा हापूस आंबा मोहोरावर परिणाम

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate