অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भात - हवामान बदलाचे परिणाम

हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आहेत. भात हे आपले मुख्य पीक आहे. या पिकावरही हवामानाच्या घटकांचे परिणाम जाणवत आहेत, त्यावर उपाय शोधण्यासाठी येत्या काळात गरजेनुसार विविध गुणधर्मांच्या जाती विकसित करून उत्पादन वाढवणे गरजेचे राहणार आहे.
महाराष्ट्रात भात पिकाखाली 15 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. सन 1960च्या दरम्यान महाराष्ट्रातील भाताची उत्पादकता हेक्‍टरी दहा क्विंटल होती. त्यानंतर तायचुंग नेटिव्ह-1, आय आर -8 अशा जातींच्या लागवडीवर भर देऊन जपानी पद्धतीने भाताची लागवड करण्यावर भर देण्यात आला. भारतात कमी कालावधीच्या, अधिक उत्पादन देणाऱ्या, खताला चांगला प्रतिसाद देणाऱ्या बुटक्‍या जातींच्या निर्मितीवर भर देण्यात आला. त्यातूनच जया जातीची निर्मिती झाली. या जातीखाली 80 टक्के क्षेत्र व्यापल्यानंतर भारतातील भाताचे उत्पादन वाढले. महाराष्ट्रात मात्र सन 1975च्या दरम्यान भाताची उत्पादकता हेक्‍टरी 15 क्विंटलपर्यंत पोचली. त्यानंतर ती 17 क्विंटलपर्यंत वाढली. यावरून पहिल्या 15 वर्षांत म्हणजे सन 1960 ते 1975 या कालावधीत उत्पादकता केवळ पाच क्विंटल प्रति हेक्‍टरी वाढली. सन 1975 ते 2010 या 35 वर्षांमध्ये उत्पादकता केवळ दोन क्विंटलने वाढून ती हेक्‍टरी 17 क्विंटलच्या जवळपास स्थिरावली आहे. यावरून त्यापुढे उत्पादकता वाढवण्यास मर्यादा आल्या आहेत असे दिसून येते. आता आपण जेव्हा दुसऱ्या हरितक्रांतीची स्वप्ने पाहात आहोत तेव्हा गेल्या 50 वर्षांचा इतिहास काय सांगतो तो नीट अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढील नियोजन महत्त्वाचे आहे.
संदर्भासाठी महाराष्ट्रातील भाताची उत्पादकता या आकडेवारीवर प्रकाश टाकू या.
महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात भातलागवड केली जाते, त्यानुसार उत्पादकता अशी -
क्र.विभागसरासरी उत्पादकता ( किलो / हेक्‍टरी)

1. कोकण विभाग2488
2. नाशिक विभाग1240
3. पुणे विभाग1361
4. कोल्हापूर विभाग2571
5. औरंगाबाद विभाग756
6. लातूर विभाग737
7. अमरावती विभाग770
8. नागपूर विभाग1330
एकूण महाराष्ट्र

हेक्‍टरी 20 ते 25 क्विंटल उत्पादकता मिळणारे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातील जिल्हे तर सातारा, सांगली, कोल्हापूर हे कोल्हापूर विभागातील जिल्हे असे एकूण सात जिल्हे प्रामुख्याने भात उत्पादनात अग्रेसर आहेत. या सात जिल्ह्यांतील पाऊसमान आणि हवामान भातलागवडीस पोषक आहे. तेथे उत्पादकता वाढवण्यास आणखी प्रचंड वाव आहे. चीनचे उत्पादन आणि उत्पादकता आपल्या उत्पादकतेपेक्षा चार पट असेल तर आपण कोठे कमी पडतो ही तपासण्याची ही वेळ आहे. नागपूर विभागातही भाताचे क्षेत्र अधिक आहे, तेथेही उत्पादकता वाढवण्यावर भर देणे गरजेचे ठरणार आहे.
हरितक्रांतीत भातपिकाचे महत्त्व अधिक आहे. त्या दृष्टीने या पिकाच्या बाबतीत लक्ष घालणे आवश्‍यक ठरणार आहे. भातपिकाच्या उत्पादकतेवर परिणाम करणारे हवामानघटक अभ्यासून भाताचे नवे वाण विकसित करण्याचा दृष्टिकोन ठेवायला हवा. अन्यथा उत्पादकता वाढणार नाही. शेतकरी भातपिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना त्याशिवाय मोठे यश लाभणार नाही. हवामानबदलाशी जुळवून घेणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी हवामान घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे.

हवामान घटक

पाऊस


मॉन्सूनचा पाऊस सुरू होण्याचा काळ महत्त्वाचा ठरतो. मॉन्सूनचे आगमन कधी वेळेत, कधी वेळेपूर्वी तर कधी वेळेनंतर होते. त्याच्या आगमनाचे भात उत्पादन आणि उत्पादकतेवर मोठे परिणाम करतात. मॉन्सूनचे आगमन लांबल्यास भातरोपे तयार होऊनही लागवडीस उशीर होतो. शास्त्रानुसार भातरोप लागवडीसाठी रोपांचे वय 28 दिवसांचे असावे. रोपांचे वय 26 ते 28 दिवस असताना मॉन्सूनचे आगमन व्यवस्थित झाल्यास लागवड वेळेत होते. पुढे पिकास योग्य पाऊसमान लाभल्यास वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज भासल्यास वाढ चांगली होऊन उत्पादन आणि उत्पादकता चांगली मिळते. पावसाचे मॉन्सून कालावधीतील वितरण ही बाब वाढीसाठी आणि उत्पादनासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. बऱ्याच वेळा मॉन्सून पावसात येणारे खंड भातवाढीवर आणि उत्पादकतेवर मोठे परिणाम करतात, त्यासाठी पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भातजातींची निर्मिती करण्यावर भर असायला हवा. भाताची उत्पादकता कमी असणाऱ्या सर्वच जिल्ह्यांची ही गरज आहे. अशा प्रकारे संशोधनावर भर न दिल्यास उत्पादनात फरक पडणे कठीण आहे. हवामानाशी जुळवून घेऊन पुन्हा योग्य हवामान प्राप्त होताच वाढीच्या पुढील अवस्था पूर्ण करून उत्पादनाचे उद्दिष्ट गाठणाऱ्या जातींची गरज आहे. कमी पाण्यावर उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचे दुसऱ्या हरितक्रांतीत योगदान होणे कठीण आहे. ज्या वेळी मॉन्सूनच्या पावसात मोठी उघडीप पडते, त्या वेळी पिकाची पाण्याची गरज वाढते. ती भरून काढण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रमाद्वारे एक किंवा दोन संरक्षित पाणी देण्याची तरतूद करावी लागेल.

ढगाळ हवामान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी


मॉन्सूनच्या कालावधीत ढगाळ हवामानाचा कालावधी वाढल्यास सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी पडतो. एकूण मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याची गरज यावर उपाय काढणे गरजेचे आहे. त्यासाठी कमी प्रमाणात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशातही वाढीवर परिणाम न होता उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या जातींच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे ठरणार आहे. केवळ वाढीच्या अवस्थेत सूर्यप्रकाश कमी पडल्याने उत्पादन, उत्पादकता आणि उतारा कमी होतो हे स्पष्ट संकेत आजवरील हवामान अभ्यासावरून दिसून येत आहेत. त्यासाठी जगभरातील जातींचा अभ्यास करून सूर्यप्रकाशाला संवेदनक्षम नसणाऱ्या वाणांचा अभ्यास करून त्यातील जनुकांचा (जीन) वापर नवीन जातींच्या निर्मितीसाठी करावा लागणार आहे. तसे न केल्यास चीनचे उत्पादन आपल्या चारपट आहे आणि आपले उत्पादन वाढत नाही अशी चर्चा करण्यातच वेळ निघून जाईल. आपण आहोत तेथे आणखी बराच काळ राहू आणि परिस्थिती बदलणे आपल्याला शक्‍य होणार नाही.

रात्रीचे वाढते तापमान


रात्रीचे वाढते तापमान हवामानबदलाचेच परिणाम आहेत. याचा उत्पादन आणि उत्पादकतेत परिणाम होताना दिसून येत आहे, त्यासाठी रात्रीच्या वाढीव तापमानाला संवेदनाक्षम नसणाऱ्या जातींचा अभ्यास करून पैदास तंत्रज्ञानात त्या गुणधर्माकडे लक्ष देणे गरजेचे राहणार आहे.

दिवसाचे वाढते तापमान


दिवसाचे कमाल आणि किमान तापमान साधारणपणे 0.6 अंश सेल्सिअसने वाढले आहे. यापुढे त्यात आणखी वाढ होणे शक्‍य आहे. तेव्हा कमाल आणि किमान तापमानात होणारी वाढ लक्षात घेऊन नवीन जाती निर्मिती करताना पैदासकारांनी त्यावर भर देणे गरजेचे आहे.
सारांश सांगायचा तर हवामान घटकांचा अभ्यास करून त्यांचा उपयोग करून नवीन जाती निर्माण करणे गरजेचे आहे.


- 9890041929
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate