অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मान्सूनचा अंदाज का चुकतो ?

मान्सूनचा अंदाज का चुकतो ?

 

मॉन्सूनचा अंदाज बांधणे, हे विज्ञानासाठी कोडे राहिलेले आहे. अंदाजासाठी किती घटक वापरले तर अचूक भाकीत करता येईल? याचे उत्तरही मजेशीर आहे. कारण एच. पी. ब्लॅनफोर्ड यांनी हिमालयातील बर्फाची पातळी हा एकमेव घटक वापरून १८८२ ते १८८५ साठी चांगला अंदाज मिळवला होता, तर गिल्बर्ट वॉकर यांनी जवळपास २०० घटक भारतीय मॉन्सूनवर परिणाम करतात, असे नमूद केले आहे. अधिक घटक वापरणे, कदाचित अंदाजाची अचूकता वाढवू शकेल; पण त्या सर्व घटकांतील परस्परसंबंध तपासणे आणि प्रत्येकाबाबत खात्रीपूर्ण आकडेवारी प्रत्यक्षात मिळवणे जिकिरीचे असते. तरी मर्यादित घटक घेऊन प्रगत गणिती प्रतिकृती आणि संगणक आधारित अनुकार पद्धती (सिम्युलेशन) वापरणे, हे धोरण सगळीकडे प्रचलित झाले आहे.
मॉन्सूनच्या दूरगामी म्हणजे जून ते सप्टेंबर कालावधीच्या अंदाजासाठी अनेक घटक वापरले जातात, पण ते पुढीलपकी एका गट-घटकात किंवा वर्गात मोडतात : *  क्षेत्रीय परिस्थिती * ईएनएसओ निर्देशांक *  विषुववृत्तीय-छेद प्रवाह * जागतिक/अर्ध गोलार्धातील परिस्थिती
वातावरण-समुद्र-भूमी यांचा घनिष्ठ संबंध दाखवणारे वरील गट-घटक मॉन्सून प्रक्रियेची जटिलता दाखवतात. तरी त्यांच्याबाबत उपलब्ध जुन्या आकडेवारीवर अनुभवजन्य आणि सांख्यिकी पद्धतींचा वापर करून अंदाज मांडले जातात. त्यात सामान्य सहसंबंध विश्लेषण ते प्रगत अशा प्रमाणभूत सहसंबंध विश्लेषण आणि न्यूरल जाळे प्रतिकृतींचा समावेश असतो.
अनेक अभ्यास असे दाखवतात की, ईएनएसओ निर्देशांक हा घटक अंदाज बांधण्यात कळीची भूमिका बजावतो. ईएनएसओ हा ‘एल निनो’ हा सागरी घटक आणि सदर्न ओसिलेशन हा वायूतील घटक या दोघांनी मिळून बनलेला असतो. सदर्न ओसिलेशन निर्देशांक प्रशांत महासागरातील ताहिटी आणि ऑस्ट्रेलियाजवळच्या हfxदी महासागरातील डार्वनि या भागातील प्रतलावरील वायूतील दाबामधील फरकावरून मोजला जातो. तसेच १९७१ साली शोधलेला मॅद्देन जुलियन ओसिलेशन (एमजेओ) हा वारे, समुद्र पृष्ठावरील तापमान, ढगांची घनता आणि पर्जन्यवृष्टी यातील बदल व्यक्त करणारा घटकही भारतातील मॉन्सूनवर परिणाम करतो.  तरी देशात सध्या असलेल्या ८०० हवामान निरीक्षण केंद्रांची संख्या किमान ६,००० पर्यंत वाढवून त्यांचे जाळे गुंफल्यास आणि त्यांनी दिलेली आकडेवारी वेळेत विश्लेषित करण्याची संगणकीय सुविधा यांची जोड मिळाल्यास, स्थानिक पातळीवर सहसा बिनचूक अंदाज देण्यास मदत मिळेल, जे नितांत गरजेचे आहे.
लेखक : डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate