Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 19:04:58.564740 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / योग्य दिशेने दिलेला रेटा : शाश्वत शेतीच्या उत्तेजनासाठी कृषी-सल्ला सेवेचा उपयोग
शेअर करा

T3 2019/05/26 19:04:58.569243 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 19:04:58.594524 GMT+0530

योग्य दिशेने दिलेला रेटा : शाश्वत शेतीच्या उत्तेजनासाठी कृषी-सल्ला सेवेचा उपयोग

शेतकऱ्यांना हवामान अन्दाजाविषयीचा सल्ला नियमितपणे मिळावा म्हणून भ्रमणध्वनी या दूरसंचार सेवेचा वापर वेगाने वाढत आहे. शेतीची उत्पादकता वाढावी आणि उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत व शोधकवृत्तीने शेती करण्याचा सल्लाही याद्वारे मिळत असतो. जे शेतकरी अशा सल्ल्यांचा उपयोग करून घेतात ते खते व कीटकनाशके योग्य मात्रेतच वापरतात आणि शेत कसण्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब करून कृषी निविष्ठांवरील खर्च कमी तर करतातच आणि शिवाय त्यांना उत्पादन वाढ मिळाल्याचा प्रत्ययही येतो, असे संशोधनांती आढळले आहे. कृषी सेवेतील महत्वाचा वाटा जरी हवामान आधारित सल्ला देण्याचा असला तरी या ब्लॉगपोस्टमध्ये मात्र आम्ही हवामान सुसंगत आणि शाश्वत शेती पद्धतीला उत्तेजन देणारे जे भ्रमणध्वनी संदेश असतील त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत.

माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा उपयोग शाश्वत शेती पद्धतीचा स्वीकार आणि ती उचलून धरणे यासाठी कसा करता येऊ शकतो याचे स्पष्टीकरण अलीकडेच झालेल्या वर्तन-विषयक संशोधनातून समोर आले आहे. शेतकरी ज्या वेळी तणावाखाली असतात वा वर्षभरातील अधिक काम असलेल्या काळात कामामध्ये फारच गुंतलेले असतात त्यावेळी त्यांचे नियोजन नीटसे होत नाही आणि ते योग्य निर्णयही घेऊ  शकत नाहीत; परिणामी प्रत्यक्ष कृती आणि त्यांचे हेतू एकमेकास पूरक राहत नाहीत, असे डफ्लो आणि तिच्या सहकार्यांनी (Duflo et. al.) निदर्शनास आणले आहे. शेतीसाठी व्यवस्थापनशास्त्रातील अनेक चांगल्या पद्धतींसाठी आणि शाश्वत दृष्टीकोनाकरिता उच्चस्तर प्रणालीपद्धतीची गरज असल्याने कृषी व्यवस्थापनाचा स्वीकार करावयाचा झाल्यास हा मुद्दा फारच महत्वाचा ठरतो. शेतकरी स्वतःच्या शेतात किडी व कीटक हल्ल्यांपासून ते पावसाने ताण दिल्याने निर्माण झालेल्या कोरडया हवामानापर्यतच्या इतक्या  सर्व आव्हानांना सामोरा जात असतो की, त्याला उपरोक्त बाबींचे आकलन वा बोधन होणे आणि योग्य व्यवस्थापनाचे नियोजन करून ते प्रत्यक्षात आणणे याचा त्याच्यावर  एक अतिरिक्त भारच निर्माण करत असतो . वर्तन-निगडित अर्थशास्त्रातील (behavioural economics) संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, लोक अगदी पद्धतशीरपणे चुका करण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे उत्तम प्रकारच्या विवेकी प्रक्रिया व तंत्राचा ते अवलंब करीत नाहीत. या अशा मर्यादा लक्षात आल्याने आम्ही थोडा हस्तक्षेप करून धोरणे निश्चित करण्यासाठीचे आरेखन (डिझाईन) तयार करीत आहोत.  अशा परिस्थितीत स्मरण करून देणारे संदेश पाठविण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यास शेतकऱ्यांना उत्तेजन मिळते याचा निश्चित असा पुरावा मिळाला आहे. अधिकतर बचत करण्यासाठी आणि पूर्व-निश्चित उद्दिष्टांपर्यंत पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी थोडासा रेटा दिल्यास स्मरण संदेश पाठविण्याचा दूरगामी परिणाम होतो असे सूक्ष्म पत-पैसा (मायक्रो-क्रेडिट) क्षेत्रात आढळले आहे. आणि आरोग्य क्षेत्राच्या संदर्भात असे दिसून आले आहे की, रुग्णास जर योग्य वेळेत स्मरणसंदेश पाठविला गेला तर रुग्णाने वैद्यकीय औषधोपचार अंगिकारण्यात लक्षणीय वाढ होते.

एखाद्या व्यक्तीला जर योग्य वेळी थोडासा रेटा देण्यासाठी स्मरणसंदेश पाठविला तर त्या व्यक्तीने शेतीच्या संदर्भात पूर्ण करावयाच्या जबाबदाऱ्या आणि त्याच्या कामाचे नियोजन या बाबतीतील त्याचे हेतू आणि कृती यांच्या दरम्यान असलेली दरी सांधली जाते असे आढळले आहे. संपर्क माध्यमामार्फत सल्ला देणारे संदेश हे जरी महत्वाचे झाले असले तरी ते समोरासमोर जाऊन घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीस पर्याय ठरू शकत नाहीत. भारतात भ्रमणध्वनीचे जाळे सर्वदूर पोहोचले असले तरी नवीन तंत्र व शेती पद्धती यांची यथार्थता एखद्या व्यक्तीने शेतात प्रत्यक्ष वापरून दाखविल्यावरच शेतकरी या नव तंत्राचा व पद्धतींचा स्वीकार करतील हे लक्षात घेणे जरुरीचे आहे .शेतकऱ्यांच्या गरजा व मागण्या लक्षात घेवून त्यांना आवश्यक त्या निविष्ठा व सहाय्य पुरविण्याचे काम ‘डब्ल्यूओटीआर’ म्हणजे ‘वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) ’च्या कृषीतज्ञांचा व प्रशिक्षित निमकृषी वैज्ञानिकांचा चमू (जे प्रकल्प क्षेत्रातच वास्तव्यास असतात) करत आहे. शेतकऱ्यांसमवेत सलग अशा बऱ्याच प्रत्यक्ष भेटींचा उपक्रम पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांची सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची बांधिलकी टिकून राहावी म्हणून या उपक्रमांच्या अंतिम टप्प्यात ‘डब्ल्यूओटीआर’ संदेश आधारित सल्ले देत राहून शेतकऱ्यास सहाय्य करते. ‘WOTR’ सध्या 66,817 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीकनिहाय सल्ले देत आहे. सध्या शेतकऱ्यांना भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पाच जिल्ह्यांमधील प्रकल्पांतर्गत समाविष्ठ असणाऱ्या 104गावांमधील स्वयंचलित स्थानिक हवामान केंद्रांकडून प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीच्या संकलनातून असे सल्ले दिले जात आहेत. या बरोबरच शेतकऱ्यांनी शाश्वत व्यवस्थापन पद्धती अंगिकारावी म्हणून पीकनिहाय सल्लाही दिला जात आहे.

शेतकऱ्याला स्थानिक पातळीवरची उपयुक्त असलेली माहिती व कृती अवगत करून देत असतानाच त्याने ते व्यवस्थित समजून घ्यावे आणि त्याचा निरंतर स्वीकारही करावा यासाठी प्रत्यक्ष भेट आणि माहिती व संपर्क तंत्रज्ञान या दोन्हींचा एकत्रित वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिसादानुसार म्हणजे ‘फीडबॅक’ नुसार अशा सल्ला सेवेस वैधता मिळते आणि त्यात सुधारणा करण्यास वावही राहतो .अशा या शिकण्या –शिकविण्याच्या क्रिया अत्यंत गरजेच्या असतात कारण यातूनच कृषी सल्ला सेवा कशी उंचावेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना सर्वात उपयुक्त आणि व्यवहार्य असणारी माहिती क्रमाक्रमाने कशी द्यावी हे समजणे शक्य होते . आमचे सल्लागार जेव्हा व्यक्तिगत शेतावर प्रत्यक्ष जावून विशेष अशी सेवा देतात तेव्हा ते खूपच परीणामकारक  ठरते, असा आमचा अनुभव आहे . वास्तविक ग्राहकांच्या गरजांनुसार सल्ला देणे अत्यंत महत्वाचे असले तरी असे सल्लागार मोठ्या प्रमाणावर तयार करणे अतिशय कठीण असते  कारण यासाठी आवश्यक असणाऱ्या विषयतज्ञांसाठी करावी लागणारी मनुष्यबळ गुंतवणूक आणि माहितीचे व्यवस्थापन हे फारच मोठे काम आहे. शेती विषयी सल्ला देणाऱ्यांना खूप मोठा वाव आहे---केवळ महाराष्ट्रातूनच ‘ग्रामीण कृषी-मौसम सेवा’ (GKMS) आणि ‘एम-किसान’ सेवा यांच्यामार्फत शासनाकडे पाच दशलक्ष शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नेहमीचे रूढ तंत्रज्ञान वापरून व्यक्तिगत व व्यक्तीच्या विशिष्ठ गरजेस अनुसरून सल्लागार तयार करणे शक्य नाही. अशा या आव्हानावर मात करण्याच्या दृष्टीकोनातून ‘डब्ल्यूओटीआर’ ही संस्था भारतीय हवामानशात्र विभाग, ‘कोरड क्षेत्रीय शेती मध्यवर्ती संशोधन संस्था,’ (CRIDA) राज्य कृषीविद्यापीठे आणि महाराष्ट्र शासन यांच्या समवेत काम करत आहे. अशा या एकत्रित प्रयत्नांतून माहिती तंत्रज्ञानावर आधारित ‘विषय व्यवस्थापन आणि निर्णय सहाय्यता प्रणाली’ (‘कंटेंट मॅनेजमेंट अॅण्ड डिसीजन सपोर्ट सिस्टीम’) ची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यामुळे विषयतज्ञांसाठी वेळीच करावी लागणारी मनुष्यबळाची गुंतवणूक गरज किमान असेल आणि पीकनिहाय व शेतकारीनिहाय सहाय्य स्वयंचलित पद्धतीने देणे शक्य होवू शकेल. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य तर होईलच शिवाय प्रत्येक शेतकऱ्याच्या विशिष्ठ गरजेप्रमाणे लक्ष पुरविता येईल आणि त्या बरोबरच हवामान बदलास व त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्याला एक प्रभावशाली मदतनीस मिळू शकेल.

लेखक : करण मिस्किटा, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्‍ट, पुणे

2.9
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 19:04:58.788581 GMT+0530

T24 2019/05/26 19:04:58.794953 GMT+0530
Back to top

T12019/05/26 19:04:58.494895 GMT+0530

T612019/05/26 19:04:58.511372 GMT+0530

T622019/05/26 19:04:58.554860 GMT+0530

T632019/05/26 19:04:58.555696 GMT+0530