অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गहू - हवामान बदलाचे परिणाम

भारतामध्ये गहू संशोधन संचालनालयाने ठरविली दिशा


गेल्या काही वर्षांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असून, तापमानातील बदलामुळे गहू पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी करनाल (हरियाना) येथील गहू संशोधन संचालनालयामध्ये संशोधनाची दिशा ठरविण्यात आली आहे. या ठिकाणी गहू लागवड ते काढणीपर्यंत विविध टप्प्यांसाठी संशोधन करण्यात येत आहे. त्याचा लाभ गहू पिकांचे शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासाठी होणार आहे.

साधारणपणे जगभरात 200 दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड असते. त्यातून एकूण अन्न उत्पादनाच्या 21 टक्के इतका अन्नपुरवठा लोकांना होतो. अवेळी पाऊस, तापमानातील अकस्मात बदल, हंगामामध्ये बदल होत असल्याने विविध प्रकारच्या समस्या गहूसारख्या हंगामी पिकामध्ये निर्माण होत आहेत. भारतातील गंगा नदीच्या परिसरातील पठारी भाग या ठिकाणी सध्या अनुकूल, अधिक उत्पादनक्षम, ओलिताचे, कमी पर्जन्यमान असलेले वातावरण आहे. या भागातून जागतिक गहू उत्पादनाच्या 15 टक्के गहू उत्पादन होते.

जागतिक तापमानामध्ये होत असलेल्या बदलामुळे जगातील काही भागांमध्ये उत्पादन घटत आहे; तर काही भागांमध्ये हवामान गहू पिकासाठी अनुकूल होत आहे. तरीही या विभागामध्ये पुढील चार दशकांतील हवामानाचा विचार करता अधिक उष्ण, ओलिताखालील, कमी कालावधीचा रब्बी हंगाम असलेला भाग अशी विभागणी करावी लागणार आहे. त्यानुसार भारतातील संशोधन करण्याची आवश्‍यकता आहे. या प्रत्येक विभागानुसार, योग्य ताण सहनशील जातींची निर्मिती, लागवडीच्या योग्य पद्धती यावर सखोल अभ्यास होण्याची गरज आहे; अन्यथा हंगामामध्ये होत असलेल्या बदलामुळे गहू उत्पादनात घट होत जाऊ शकते. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा पूर्ण करणे शक्‍य होणार नाही. सध्या समन्वित गहू व बार्ली सुधारणा कार्यक्रम राबविला जात असून, वातावरण बदलाला योग्य प्रकारे सहन करू शकतील, अशा प्रजातींची ओळख पटवली जात आहे. त्याचप्रमाणे गहू लागवड व व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.

हवामान बदलाला सामोरे जाताना...

गहू पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये बदल किंवा सुधारणा करण्यासाठी गहू संचालनालयाच्या संचालिका इंदू शर्मा आणि शास्त्रज्ञ आर. के. शर्मा, आर. एस. चोकर यांच्या नेतृत्वाखाली संशोधन केले जात आहे. सध्या खालील महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

  • गव्हाचे काढणीनंतरचे अवशेष न जाळणे, अन्य पिकामध्ये त्यांचा वापर करतानाच कमी किंवा शून्य मशागत तंत्राचा अवलंब करणे.
  • लेसर तंत्रज्ञानाच्या मदतीने जमीन एकसमान करणे, पिकांची योग्य फेरपालट करून शेतीचे संवर्धन करणे, एकात्मिक खते व अन्नद्रव्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन व तण नियंत्रण यांचा अंतर्भाव पीक व्यवस्थापनामध्ये केला जात आहे.
  • यासारख्या उपाययोजनांचा वापर केल्याने दोन हंगामांतील अतिवृष्टीमध्ये तात्पुरते पाणी साठून होणारे नुकसान टाळता येते.
  • अधिक उत्पादकता असलेल्या प्रदेशामध्ये शून्य मशागत तंत्राच्या वापरासाठी मशागतीपासून पेरणी यंत्र व विविध यंत्रे विकसित करण्याचे संशोधन केले जात आहे. त्यातून मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढून सुपीकता वाढू शकेल.
  • या साऱ्या पद्धतीतून शाश्‍वत उत्पादनवाढीसोबतच कार्बन डायऑक्‍साईडच उत्सर्जन
  • कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्‍य होणार आहे; तसेच तापमानातील आकस्मिक बदल, दुष्काळी स्थितीवर मात करण्यामध्ये मदत होणार आहे.
  • चांगल्या प्रतीच्या पाण्याची उपलब्धता कमी होत असून, त्यावर सूक्ष्म सिंचन पद्धती फायद्याची ठरू शकते. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ शकेल.
  • उत्पादनातवाढ होण्यासाठी वेळेमध्ये पेरण्या करणे गरजेचे आहे. पेरण्या वेळेवर होण्यामध्ये सध्या मजुरांची टंचाई ही समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नवी सुधारित यंत्रे विकसित करण्यात येत आहेत; तसेच वातावरण बदलाला अनुरूप वेळेत पेरण्या केल्याने वातावरण बदलाचा परिणाम कमी करण्यास मदत होईल.
  • कापूस व ऊस या पिकांना अधिक कालावधी लागत असल्याने या भागातील शेतकरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही गहू पेरणी करतात. त्यामुळे उत्पादनात घट होते. त्यासाठी गहू रोप तयार करून, त्यांची पुनर्लागवड करण्याचा उपाय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी संशोधन सुरू आहे.
  • हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास भात लागवडीच्या अधिक काळ ओलिताखाली असलेल्या क्षेत्रामध्येही हे तंत्र उपयुक्त ठरू शकेल. सध्या भात शेतीच्या भागामध्ये प्रामुख्याने एकच पीक घेतले जाते. त्याऐवजी दोन पिकांच्या लागवडीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना शक्‍य होईल.
  • कापूस काढणीच्या पूर्वी साखळी पीक पद्धतीने (रिले क्रॉपिंग) गव्हाची पेरणी करणे आणि उसाच्या खोडव्यात गव्हाची टोकण पद्धतीने लागण करणे. यामुळे वेळेवर पेरणी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
  • येत्या भविष्यामध्ये विविध तणनाशकांसाठी प्रतिकारकता विकसित झालेले "फालारिस मायनर' हे तण गहू उत्पादक प्रदेशामध्ये समस्या निर्माण करणार आहे. त्याच्या नियंत्रणासाठी संशोधन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.


संपर्क - 0184-2267307
(गहू संशोधन संचालनालय, करनाल, हरियाना.)

स्त्रोत: अग्रोवन:

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate