অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदल - किडी-रोग

पिकावरील किडी व रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कीडनाशके फवारणीचा खर्च वाढत आहे. किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. पाऊस, सूर्यप्रकाश, तापमान, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान, धुके या सर्व बाबी हवामान बदलाशी निगडित आहेत. या गोष्टींवर थोडा अधिक प्रकाश टाकू या.

हवामान बदल व किडी-रोग या काही घटकांचा अभ्यास

वाजवीपेक्षा अधिक पाऊस अथवा कमी पाऊस

गेल्या दशकातील आकडेवारीनुसार सन 2000, 2001, 2002 आणि 2003 या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झाला. त्याच काळात उसावर लोकरी मावा मोठ्या प्रमाणात जाणवला. सन 2005, 2006 आणि 2007 या वर्षी राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली. त्या काळात डाळिंबावरील "तेल्या'चे प्रमाण वाढले. सन 2010 पर्यंत डाळिंब पिकास हवामानबदल घातक ठरला. ज्या पिकाने यापूर्वी कोरडवाहू भागातील बाजरीचे क्षेत्र व्यापले, मात्र त्याच पिकास कोरडे हवामान न लाभल्याने रोगाचे साम्राज्य वाढले आणि अनेक प्रकारची कीडनाशके फवारणी करूनही नियंत्रण कमी प्रमाणात लाभले. आर्थिक उलाढालीच्या पिकांना हवामान बदलाचा फटका बसला आणि शेतकरी वर्ग हताश झाला.

तापमान

तापमानास संवेदनक्षम असणारी पिके आणि जाती या विशिष्ट तापमानात कीड आणि रोगांना बळी पडतात. विशिष्ट प्रकारच्या तापमानात ठराविक किडींची आणि रोगांची वाढ झपाट्याने होते. पावसात उघडीप होताच आणि चांगला सूर्यप्रकाश मिळून तापमान वाढू लागल्यावर काही किडी आपल्या वाढीची अवस्था पूर्ण करतात. झपाट्याने अनेक अंडी घालतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. लष्करी अळी, केसाळ अळी, हेलिकोव्हर्पा वा अमेरिकी बोंड अळी, फळमाशी, शेंगा पोखरणारी अळी, मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी असे एक ना अनेक किडींचे प्रकार दिसू लागतात. तापमान किडीच्या पैदाशीस आणि वाढीस अनुकूल झाल्यास त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. पिकांवर किडी हल्ला करून आपली उपजीविका करतात. विविध कीडनाशके वापरूनही किडी त्यांना दाद देत नाहीत. एप्रिल-मे महिन्यात सुरू उसाच्या पिकास त्यामुळेच खोड किडा आणि शेंडा पोखरणाऱ्या किडींचा उपद्रव होतो. भाजीपाला आणि अन्य पिकांमध्येही किडींच्या वाढीसाठी अनुकूल तापमान घातक ठरते. त्यामुळे तापमानाचा प्रश्‍न पिकापुरता मर्यादित न ठेवता किडींचा उपद्रवही विचारात घेणे आवश्‍यक आहे. किडींचा प्रादुर्भाव आणि तापमानाचा संबंध यांचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. पावसाची उघडीप होताच सोयाबीनवर किडींचा उपद्रव होऊन त्यास योग्य तापमान मिळताच मोठ्या प्रमाणात किडीची वाढ होऊन मराठवाडा, विदर्भात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशी पिकावरील किडींच्या प्रादुर्भावाची मोठीच यादी होईल. एकूण तापमान घटक या किडींच्या उपद्रवास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात.

हवेतील सापेक्ष आर्द्रता

हवेतील आर्द्रतेचा संबंध हा पिकांतील रोगांशी अधिक संबंधित आहे. जेव्हा सकाळची आर्द्रता 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 टक्‍क्‍यांवर असते तेव्हा हा घटक पिकांच्या रोगासाठी अनुकूल ठरतो. द्राक्ष पिकावरील डाऊनी आणि भुरी या रोगांचे प्राबल्य तेव्हाच वाढते जेव्हा अशा प्रकारची आर्द्रता 72 तास अथवा त्याहून अधिक काळ टिकते. पावसाळ्यात अशा प्रकारचे आर्द्रता प्रमाण राहण्याचा कालावधी अधिक असतो. हिवाळी हंगामातही पावसाळा संपल्यानंतर काही काळ अशा प्रकारे हवेत आर्द्रता टिकून राहते. पिकांच्या दृष्टीने हवेतील अधिक आर्द्रता उपयुक्त ठरते; परंतु त्याबरोबरच पिकांवरील रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीवांचे प्रमाण झपाट्याने वाढण्यास, रोग पसरण्यास आणि फैलावण्यास ती अधिक वेगाने कारणीभूत ठरते.

तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण

तापमान कमी असल्यास आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. तापमान वाढताच आर्द्रता कमी होते; मात्र तापमान आणि आर्द्रता हे दोन्ही घटक काही वेळा कीड आणि रोग हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात फैलावण्यास अनुकूल ठरतात. त्यामुळेच हवामानातील बदलांचा पिकांना कीड आणि रोगामुळे मोठ्या प्रमाणात उपद्रव होऊ शकतो. उन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, अधिक तापमान आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली आर्द्रता ही कीड आणि रोग पसरण्यास प्रतिबंध करते. त्यामुळेच उन्हाळी हंगामात पिके किडी-रोगांपासून बचावतात. त्यामुळेच पिकांचे उत्पादनही अधिक आणि मालाची प्रतही चांगली मिळते.

ढगाळ हवामान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी

पावसाळी हंगामात सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी मिळतो. त्यामुळे सूर्यप्रकाशही गरजेपेक्षा कमी मिळतो. मात्र तापमान योग्य असेल तर पिकांची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान जास्त काळ राहिल्यास हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते आणि पिके किडी-रोगांना बळी पडतात. पावसात उघडीप असल्यास कीडनाशक फवारणी करता येते; मात्र फवारणीनंतर पाऊस झाल्यास फवारलेले रसायन पावसाच्या पाण्याने निघून जाते. कीडनाशकाची तीव्रता कमी होते आणि किडी-रोगांचा जोर वाढून कीडनाशकांवरील खर्च वाढतो. थोडक्‍यात, पावसाळी हंगामातही हवामान बदलाचा फटका पिकांना बसतो. कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाने पिकांची प्रत खालावते आणि उत्पादन घटते. या सर्व समस्या हवामान बदलाने जाणवतात.

धुके आणि दव

सकाळी धुके पडल्यास हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक काळ राहते. त्यातच दव पडल्यास पिकांचे भाग ओले राहतात आणि बुरशीजन्य रोगांचा फैलाव होतो. पिकांच्या कोवळ्या भागास विशेष करून इजा पोचते. याचा फटका भाजीपाला व कांदा पिकास मोठ्या प्रमाणात जाणवतो. तुरीच्या पिकास शेंगा न लागणे, त्या पोचट राहणे असे प्रकार या वर्षी धुक्‍यामुळे मराठवाड्यातील पाथरी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जाणवले. तुरीसारख्या हुकमी पिकास धुक्‍याचा फार मोठा फटका बसला आणि उत्पादन घटले.


- डॉ. रामचंद्र साबळे - 9890041929
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate