অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामानाचा ‘महावेध’

हवामानाचा ‘महावेध’

हवामानविषयक अचूक माहितीचा वेध घेणारी आधुनिक यंत्रणा शासनाने प्रथमच स्कायमेट वेदर सर्व्हिसेसच्या माध्यमातून प्रत्येक महसूल मंडळामध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यातील सर्वच भागात ही यंत्रणा कार्यान्वित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दर दहा मिनिटांनी हवामानविषयक संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.

हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना कायम नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. सातत्याने पावसात पडणारा प्रदीर्घ खंड, दुबार पेरणीचे संकट त्यासोबतच अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे होणारी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी अशा अनेक अस्मानी संकटांचा सामना, हवामानाची अचूक माहिती मिळत नसल्यामुळे करावा लागत होता. स्वयंचलित हवामान केंद्राचे राज्यात जाळे उभारण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. अशी माहिती यापूर्वी नागपूर, पुणे आदी वेधशाळेमार्फत उपलब्ध होत होती. परंतु ही माहिती संपूर्ण विभाग व राज्यासाठी असल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ अंदाजावर अवलंबून राहावे लागत असे. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीमध्ये तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची रियल टाइम माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध होणार असून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचा शेतकऱ्यांना रियल टाइम माहिती देणारा प्रकल्प राज्याच्या सर्वच भागात सुरू व्हावा, यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित झाला आहे.

पहिले राज्य

स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे मिळणारी संपूर्ण संगणकीय माहिती ग्रामपंचायतीमध्ये डिजीटल बोर्डाद्वारे प्रदर्शित करण्यासोबतच, शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती एसएमएसद्वारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. असे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत डोंगरगावच्या पहिल्या केंद्राचे उद्घाटन झाले. राज्यातील सर्व केंद्रे जूनअखेरपर्यंत सुरू करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

माहितीमध्ये अचूकता

महावेध या प्रकल्पासाठी महसूल विभागातर्फे जागा उपलब्ध करून दिली असून स्कायमेट वेदर सर्व्हिसेस गुंतवणुकीतून हवामान केंद्राची उभारणी करून, पुढील सात वर्षात स्व:खर्चाने चालवणार आहे. शासनास सार्वजनिक उपयोगाच्या प्रकल्पाकरिता ही संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीचा उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारित पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन व आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे. या केंद्रांच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे हवामानाच्या माहितीमुळे अचूकता येणार आहे. त्यासोबतच संशोधन व अव्यावसायिक स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी शासनाच्या अधीनस्थ असलेल्या संस्था व विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी ही माहिती नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.

सर्व महसूल मंडळांत सुविधा

राज्यातील सर्व महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून यामध्ये सर्वाधिक एकशे एक केंद्र यवतमाळ जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यात 100, सोलापूर 91, नाशिक 92, बुलढाणा 90, सातारा 91, अहमदनगर 97, तसेच अतिदुर्गम व डोंगराळ भागातही महसूल मंडळाप्रमाणे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 40, चंद्रपूर 50, गोंदिया 25, वर्धा 47 तर नागपूर जिल्ह्यातील 70 केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. ‘महावेध’ हा प्रकल्प स्कायमेट वेदर सर्व्हिसेस स्व:खर्चाने चालवणार आहे. तसेच शासनास मोफत हवामानविषयक माहिती पुरवणार आहे.

महावेध प्रकल्पाचे फायदे

- शेतकरी कल्याणाचा हा उद्देश समोर ठेवून शेतकरी आणि

- सार्वजनिक हितासाठी हवामानविषयक सर्व माहिती व सल्ला मोफत उपलब्ध करून देणे.

- महसूल मंडळात हवामान सल्ला केंद्र विकसित करणे.

- कृषी हवामान सल्ला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे.

- नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना व आपत्ती व्यवस्थापन.

- संशोधन आणि विकास.

- कल्याणकारी विकासाच्या योजना राबवण्यास सहाय्यभूत.

हवामानाची नोंद दर 10 मिनिटांनी

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज गावापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व महसूल मंडळात

‘महावेध’ प्रकल्पांतर्गत 2 हजार 65 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या हवामान केंद्रामुळे

12 कि. मी. परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर 10 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्यमान, तापमान, हवेची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप करण्यात येईल. जमा झालेली हवामानविषयक माहिती हवामानावर आधारित पीक विमा योजना, पिकविषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे.

‘कृषी विभाग’ व ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ यांच्या संयुक्त भागीदारीतून स्वयंचलित हवामान केंद्राचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी गावातच अचूक हवामानाची माहिती घेऊन पिकांचे योग्य नियोजन करणे शक्य होईल.

-अपर्णा डांगोरे-यावलकर.

स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे माहितीचे संकलन, हवामान केंद्र स्कायमेट माहिती संकलकाशी जोडलेली आहे आणि संवेदकाद्वारे नोंद केलेली हवामानाची आकडेवारी संकलित होते. स्वयंचलित हवामान केंद्र सौर घटकांवर चालत असल्यामुळे देखभाल कमी करावी लागते. या केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता व वाऱ्याच्या दिशाची नोंद होत असल्याने शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाबद्दल सूचना व सल्ला देण्यास सक्षम यंत्रणा उभी राहिली आहे.

लेखक: अनिल गडेकर,

जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate