অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्ष बागेतील भुरी नियंत्रणासाठी काही टिप्स...

द्राक्ष पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनाचा दर्जा घटण्यासोबतच उत्पादनामध्येही घट होते. भुरीच्या परिणामकारक नियंत्रणासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील. 
द्राक्ष पिकावर मण्यांवर व पानांवर भुरी येते. पानांवर भुरी आल्यावर पानांचा अन्ननिर्मितीचा वेग कमी होतो व पानांचा टिकाऊपणा कमी होऊन पाने लवकर खराब होतात. परिणामी एकरी वजनात घट येते. मण्यांवर भुरी आल्यावर फुगवट कमी होते व दुय्यम दर्जाचा माल तयार होऊन नुकसान होते. भुरी प्रतिबंधात्मक उपाय हीच भुरी नियंत्रणाची सर्वांत योग्य पद्धत. एकदा आलेली भुरी नियंत्रित करण्यास अवघड असते. भुरी नियंत्रित झाली की नाही हे उघड्या डोळ्यांनी बघून ठरवणे तसे अवघडच असते.

भुरी नियंत्रणाकरिता पुढील बाबी महत्त्वाच्या

  • भुरी येण्याचा कालावधी - फळछाटणीनंतर 20 दिवसांपासून अनुकूल हवामान असल्यास भुरी येण्यास सुरवात होते, तर मण्यात पाणी फिरेपर्यंत भुरी येते. नाना पर्पल, शरद, जम्बो या द्राक्ष जातीत तर मण्यात पाणी फिरल्यावरही मण्यांच्या देठावर भुरी येते.
  • भुरीसाठी अनुकूल हवामान - 13 अंश सेल्सिअस तापमान व 50 टक्के आर्द्रता या वातावरणात भुरीची सुरवात होते. 22 ते 30 अंश सेल्सिअस तापमान व 60 ते 70 टक्के आर्द्रता या हवामानात भुरी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मात्र आलेली भुरी ढगाळ हवामानात कोणत्याही तापमानाला वाढते, तसेच 36 व त्यापुढील तापमानामध्ये व आर्द्रता 98 टक्‍क्‍यांच्या पुढे व 40 टक्‍क्‍यांच्या आत असल्यास भुरी येत नाही.
  • सतत निरीक्षण महत्त्वाचे - सतत पानांचे व मण्यांचे निरीक्षण करणे महत्त्वाचे असते.
  • पानांवर भुरी शक्‍यतो वरील बाजूने येत असली तरी काही वेळेस मागील बाजूने येते. बागेत जिथे सतत व जास्त ओलावा असतो, तेथून भुरी वाढण्यास सुरवात होते.
  • ज्या पानांवर दिवसभरात कधीही ऊन पडत नाही, अशा तळातील पानांवर लवकर भुरी येते. त्याचप्रमाणे मांडवाच्या वरील फवारणी द्रावण कमी पोचणाऱ्या मण्यांवर व पानांवर भुरी लवकर येते.

भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात

हवामानानुसार छाटणीपासून 20 दिवसांनी भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात केली पाहिजे. 
हवामानानुसार दर 6 ते 10 दिवसांनी प्रतिबंधात्मक फवारणी केली पाहिजे. फुलोऱ्यात हे आवश्‍यक असते. फुलोऱ्यामध्ये भुरी नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा. फुलोऱ्याच्या आतच भुरी घडावर आल्यास भुरी नियंत्रित करणे अवघड जाते. मणी 6-7 मि.मि. आकाराचे होईपर्यंत भुरी नियंत्रणाकरिता केलेल्या फवाऱ्याचे कव्हरेज चांगले मिळते. यानंतर पुढील काळात मणी मोठे झाल्याने फवारणीचे कव्हरेज मिळत नाही म्हणूनच मणी 6-7 होईपर्यंत भुरी नियंत्रित ठेवली पाहिजे व पुढील काळात मण्यात पाणी भरेपर्यंत भुरी नियंत्रणाचे फवारे दिले पाहिजेत.

भुरी नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या वापराचे नियोजन

भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात फळछाटणीनंतर 20 ते 25 दिवसांनी केली पाहिजे.

  • सुरवातीस कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
  • त्यानंतर 30 दिवसांदरम्यान हेक्‍झाकोनॅझोल 1 मिलि प्रति मीटर प्रमाणे एकच फवारणी करावी. (त्याचा पीएचआय 60 दिवसांचा आहे.)
  • यानंतर पुढे फुलोरा अवस्थेमध्ये डायफेनकोनॅझोल (25 ईसी) अर्धा मिलि प्रति लिटर पाण्यास फवारणे. नंतर 6-7 दिवसांनी पुन्हा एक स्प्रे द्यावा. याचे गरजेनुसार तीन स्प्रेही चालतील. (याचा पीएचआय 45 दिवसांचा आहे.)
  • यानंतर दिवसाचे तापमान 25 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास 6 दिवसांच्या अंतराने एक ते दोन स्प्रे सल्फर (80 डब्लूजी) 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
  • यानंतर टेट्राकोनॅझोल (3.8 ईडब्ल्यू) 150 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (याचा पीएचआय 30 दिवसांचा आहे.)
  • यानंतर शेवटी मायक्‍लोबुटॅनील(10 डब्ल्यूपी) 80 ग्रॅम प्रति 200 लिटर या प्रमाणात फवारावे. याचे आपण 2-3 स्प्रे घेऊ शकतो. (याचा पीएचआय 30 दिवसांचा आहे. 2-3 स्प्रेमुळे अंदाजे पीएचआय 40 दिवसांचा गृहीत धरावा.)

भुरी नियंत्रणाकरिता पोटॅशिअम बायकार्बोनेटचा वापर

टेट्राकोनॅझोल, मायक्‍लोबुटेनिल या बुरशीनाशकासोबतच 2.5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात पोटॅशिअम बायकार्बोनेटचा वापर फायदेशीर ठरतो. गरजेनुसार एका हंगामामध्ये पोटॅशिअम बायकार्बोनेट 3-4 वेळा वापरावे. पानात पोटॅशची कमतरता असल्यास भुरी नियंत्रणात येत नाही. या फवारणीने पानातील पोटॅशची कमतरता भरून निघते व भुरीचे नियंत्रण मिळते.

अधिक भुरी प्रादुर्भावामध्ये करावयाची उपाययोजना

मणी 6-7 मि.मि.पेक्षा मोठे झाल्यावर अनेक वेळा भुरी नियंत्रित होत नाही. अशा वेळी बुरशीनाशकांचे एकरी प्रमाण 25 टक्‍क्‍यांनी वाढवावे. फवारणी द्रावण एकरी 800 लिटर घेऊन चांगले फवारावे. (उदा. मायक्‍लोबुटॅनिल एकरी 160 ग्रॅम अधिक 25 टक्के जादा म्हणजे 40 ग्रॅम म्हणजे 800 लिटर पाण्यात 200 ग्रॅम घेऊन फवारावे.)
संपर्क - वासुदेव काठे, 9922719171 
(लेखक दाभोळकर प्रयोग परिवाराचे महाराष्ट्रासाठी समन्वयक आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate