অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाजीपाला, फळपिकांवर दिसतोय रोगांचा प्रादुर्भाव

भाजीपाला, फळपिकांवर दिसतोय रोगांचा प्रादुर्भाव

सध्याचे ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रोगाची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही; परंतु वातावरण ढगाळ आहे त्या ठिकाणी पीक व्यवस्थापन करताना

काकडीवर्गीय वेलवर्गीय भाज्या, गवार, टोमॅटो, मिरची, वाटाणा आणि आंबा मोहोरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे.

लक्षणे
  1. पानांच्या वरच्या बाजूला राखाडी रंगाचे पावडर असणारे गोलाकार उंचवट ठिपके दिसतात. टिचकी मारल्यास त्यातून पावडर पडलेली दिसेल.
  2. याचा प्रादुर्भाव पानांच्या बरोबरीने कोवळे शेंडे, फुले, कोवळ्या शेंगा, कोवळ्या फळांवर दिसतात. यामुळे फुले आणि फळांची गळ होईल.
उपाययोजना
  1. गंधक (80 टक्के पाण्यात विद्राव्य) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पुढील फवारणी गरजेनुसार करावी.
  2. काकडीवर्गीय वेलभाज्यांवरील भुरीच्या नियंत्रणासाठी गंधक वापरू नये. त्याऐवजी डिनोकॅप अर्धा मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.

ज्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आहे असा ठिकाणी केवडा (डाऊनी मिल्ड्यू) या रोगाचा प्रादुर्भाव द्राक्ष, काकडीवर्गीय भाजीपाला पिकांवर होऊ शकतो.

लक्षणे
  1. पानांच्या वरच्या बाजूला फिकट पिवळसर गोलाकार ठिपके दिसतात.
  2. पान तोडून सूर्यप्रकाशाच्या दिशेने धरल्यास हे पिवळसर ठिपके अगदी प्रकर्षाने दिसतात. या पिवळ्या ठिपक्‍यांच्या बरोबर विरुद्ध बाजूस म्हणजे पानांच्या खालच्या बाजूस कापसाच्या धाग्यांसारखी बुरशीच्या तंतूची वाढ झालेली दिसते.
  3. रोगाची लक्षणे कोवळे शेंडे, फुले, फळे, पान आणि फळांच्या देठावर दिसतात.
  4. फुलगळ आणि फळगळ होते.
उपाययोजना
  1. नियंत्रणासाठी संयुक्त बुरशीनाशके उदा. मेटॅलॅक्‍झिल (8 टक्के) अधिक मॅंकोझेब (64 टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम किंवा सायमोक्‍झॅनिल (8 टक्के) अधिक मॅंकोझेब (64 टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारणी करावी.

करपा रोगाचे नियंत्रण

सध्याच्या परिस्थितीमध्ये कांदा, बटाटा या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. कांद्याच्या पातीवर जांभळट लंबगोलाकार ठिपके दिसतात. बटाटाच्या पानावर गोलाकार तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके एकमेकांत मिसळतात. यामुळे तीव्रता वाढताच संपूर्ण पीक करपलेले दिसते.

उपाय
  1. कांद्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  2. बटाट्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 25 ग्रॅम किंवा मॅंन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारावे.

पेरू

असलेल्या बागांमध्ये देवी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल.

लक्षणे

फळांवरती तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसतात. या ठिपक्‍याच्यावर बोट फिरविले असता उंचवटा सहज जाणवतो. संपूर्ण फळावर याचे व्रण पसरतात, फळ विक्रीयोग्य राहत नाही.

उपाय

पेरूची फळे सुपारी एवढी असल्यापासून दर 15 दिवसांच्या अंतराने मॅंन्कोझेब 25 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अंजीर

अंजीराच्या पानावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. अवकाळी पावसाच्या वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. मोठ्या प्रमाणावर पानगळ होईल. ज्या शेतकऱ्यांच्या बागेत खट्टा बहराची फळे आहेत, ती फळे पानगळ झाल्यामुळे चांगली पोसणार नाहीत. अशा फळांवरसुद्धा तांबेरा रोगाची लक्षणे दिसतील.

लक्षणे

पानांच्या खालच्या बाजूने तांबेरा रोगाच्या नारिंगी रंगाच्या पुळ्या दिसतात. संपूर्ण पानभर या पुळ्या सध्याच्या हवामानामुळे पसरतील. साधारणपणे जून पानांच्यावर या रोगाची लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात. रोग नियंत्रणाचे उपाय योजल्यास कोवळी पाने रोगमुक्त राहण्यास मदत होईल. तांबेरा रोगाच्या पुळ्या फळे, फळाचे देठ, कोवळ्या फांद्यावर दिसतात.

उपाय

तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी क्‍लोरथॅलोनील 20 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने गरजेनुसार चार ते पाच फवारण्या कराव्यात.

सीताफळ

ज्या बागांमध्ये उशिराच्या बहाराची फळे झाडावर आहेत अशा फळांच्या देठाजवळ ऍन्थ्रॅकनोज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल. पावसाच्या थेंबामुळे बुरशीचे बीज फांद्या, देठावरून वाहून येऊन फळाच्या देठाजवळच्या खोलगट भागात साचतील. ओलसरपणामुळे बीजाणू रूजून रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. फळे देठाकडून काळी पडण्यास सुरवात होईल. सध्याच्या हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ शकतो.

उपाय

बोर्डो मिश्रणाची (1 टक्का ) फवारणी करावी.

डाळिंब

ज्या परिसरात तेलकट डाग रोगाची समस्या कमी-जास्त प्रमाणात आहे तेथे सध्याच्या दमट आणि थंडीविरहित रात्रीमुळे पाने, फळे, फांदी, फळांवर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढेल.

उपाय

अशा बागांमध्ये रोगाच्या तीव्रतेनुसार बॅक्‍टीनाशक 250 पीपीएम (1 ग्रॅम प्रति चार लिटर पाणी) ते 500 पीपीएम (एक ग्रॅम प्रति दोन लिटर पाणी) अधिक कॅप्टन अर्धा टक्के (एक ग्रॅम प्रति दोन लिटर पाणी) 2 ते 3 वेळा फवारावे. मधूनच एक टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

पपई

पपईच्या बुंध्याजवळ पाणी साठून राहिल्यास बुंधाकूज या रोगाचा प्रादुर्भाव होऊन काही तासांमध्ये मोठी फळधारणा झालेली झाडे कोलमडून पडतात.

उपाय

या रोगाच्या नियंत्रणासाठी पपई लागवडीमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

टीप : फवारणीच्या द्रावणात अर्धा मि.लि.सर्फेक्‍टंट प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळावा.

स्त्रोत : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate