অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुरीचे नियंत्रण


येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये वातावरण अधूनमधून अंशतः ढगाळ राहिले तरीही सर्वसाधारणपणे निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे. वातावरणातील आर्द्रता आता कमी होत असल्यामुळे सकाळचे दवही कमी होत जाईल. सांगली, पुणे विभागांमध्ये थंडीचे वातावरण साधारणपणे मागील आठवड्याप्रमाणे तसेच राहील. सांगली, कोल्हापूर भागांमध्ये किमान तापमान 12 ते 15 सेल्सिअसपर्यंत वाढेल. बऱ्याचशा बागेमध्ये विशेषतः सांगली, कोल्हापूर येथील बागेमध्ये वरील पानांमध्ये जुनी डाऊनी पुन्हा फुललेली दिसली. अशा ठिकाणी डाऊनीच्या नियंत्रणासाठी फवारण्या घेण्याची कितपत जरुरी आहे, हे वातावरणातील थंडी व आर्द्रता पाहून ठरवावे.

- बागेत थंडीचे वातावरण राहून आर्द्रता कमी असल्यास, डाऊनी बागेत फुललेली असली तरीसुद्धा डाऊनीचा नवीन प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्‍यता नाही. अशा परिस्थितीमध्ये डाऊनीची लागण झालेली पाने, घड काढून टाकून बागेतील डाऊनीचा धोका कमी करावा. त्यानंतर पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणामध्ये फवारून घ्यावे. ज्या ठिकाणी थंडी नाही व आर्द्रता वाढलेली आहे, अशा ठिकाणी 4 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे हे रसायन फवारावे.

सर्व भागांमध्ये आता भुरी नियंत्रण महत्त्वाचे...

  • बहुतांशी बागा सध्या छाटणीनंतरच्या 70 ते 80 दिवसांमध्ये आहेत. अशा बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी आता रेसिड्यूच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास फक्त हेक्‍झाकोनॅझोल (0.65 मिली प्रति लिटर) आणि मायक्‍लोब्युटॅनिल (0.4 ग्रॅम प्रति लिटर) याच आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर शक्‍य आहे.
  • बागेमध्ये पोटॅशच्या कमतरतेमुळे भुरीची लागण जास्त होण्याची शक्‍यता असते. म्हणून बागेमध्ये मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (0ः52 ः34) किंवा सल्फेट ऑफ पोटॅश 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणामध्ये फवारावे.
  • वर नमूद केलेले आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारतानासुद्धा पोटॅशिअम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात मिसळून वापरल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशकाची रोगनियंत्रण क्षमता वाढते.
  • त्यानंतर तापमानामध्ये वाढ झालेली असल्यास भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (80 डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. सल्फरच्या फवारणीचे डाग येऊ नयेत म्हणून फवारणीमध्ये 0.1 मि. लि. प्रति लिटर प्रमाणात चांगल्या दर्जाची स्प्रेडर किंवा स्टिकर वापरावीत.
  • भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणीने चांगले कव्हरेज मिळणे अत्यंत आवश्‍यक आहे. या दिवसामध्ये जास्त दाट कॅनोपी असल्यास सावलीतील पाने पिवळी पडून गळून जातात. अशा सावलीतील पाने गळून पडेपर्यंत थांबू नका, ती हाताने काढून घ्या. म्हणजेच कॅनोपी विरळ होईल. कॅनोपीमध्ये खेळती हवा राहून आर्द्रता कमी होईल. त्याच बरोबर फवारणी केलेली बुरशीनाशके आतल्या कॅनोपीपर्यंत चागंल्या रीतीने पोचेल.

योग्य मात्रा आवश्‍यक

  • फवारणी करताना बुरशीनाशकांचे प्रमाण योग्य असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
  • वर दिलेल्या मात्रा हाय हॉल्यूम फवारणी यंत्रासाठी आहेत म्हणजेच एकरी चारशे लिटर पाणी फवारल्यास किती बुरशीनाशक लागेल, तो एकरी बुरशीनाशकाची मात्रा समजावी. उदा. 1 ग्रॅम प्रति लिटर लिहिले असल्यास एकरी चारशे ग्रॅम बुरशीनाशक लागेल. फवारणीसाठी चांगल्या दर्जाचे लो हॉल्यूम किंवा इलेक्‍ट्रोस्टॅटीक फवारणी यंत्र वापरायचे असल्यास पाणी कितीही फवारणार असला तरी बुरशीनाशकाचे शिफारसीचे एकरी प्रमाण कमी करू नये, तरच चांगले नियंत्रण मिळेल.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate