অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधमाश्‍यांना हानीकारक कीटकनाशकांवर युरोपात बंदी !

मधमाश्‍यांना हानीकारक कीटकनाशकांवर युरोपात बंदी !

मधमाशी व परागीभवन करणाऱ्या कीटकांना हानीकारक ठरण्याच्या कारणांवरून युरोपीय आयुक्तालयाने तीन कीटकनाशकांच्या वापरांवर मर्यादित स्वरूपाची (रिस्ट्रिक्‍टेड) दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. "निओ निकोटिनाइड्‌स' या रासायनिक गटातील इमिडाक्‍लोप्रिड, थायामेथोक्‍झाम व क्‍लोथीयानीडीन अशी या कीटकनाशकांची नावे आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी नुकतीच म्हणजे एक डिसेंबर 2013 पासून सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकरण समितीने (सीआयबी ऍण्ड आरसी) नेही यासंबंधी पावले उचलली आहेत. संबंधित रासायनिक गटातील काही कीटकनाशकांबाबतचा तपशील अहवाल (डाटा) मागवून त्यांची अभ्यास प्रक्रिया सुरू केली आहे.
युरोपीय देशांतील पीक पद्धतीत परागीभवनाच्या अनुषंगाने मधमाश्‍या, बंबल बी यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. मानवी अन्न सुरक्षिततेएवढेच महत्त्वाचे स्थान युरोपात पर्यावरण सुरक्षिततेला दिले जाते. अलीकडील वर्षांत मधमाश्‍यांच्या वसाहती कमी होणे, त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणे, ही युरोपीय देशांतील महत्त्वाची समस्या झाली आहे. त्यामागील कारणांपैकी "निओ निकोटिनॉईड्‌स' या रासायनिक गटातील काही कीटकनाशकांचा शेतीत होणारा वापर ही एक शक्‍यता असल्याचे कारण पुढे आले होते.
त्यानुसार युरोपीय आयुक्तालयाने युरोपीय अन्न सुरक्षितता महासंघ (युरोपीय फूड सेफ्टी ऍथॉरिटी-इफ्सा) या आपल्या सल्लागार संस्थेला यासंबंधी अभ्यास करून शास्त्रीय अहवाल देण्याचे सुचवले. पुरेशा अभ्यासानंतर "इप्सा'ने आपला अहवाल युरोपीय आयुक्तालयाला सादर केला. त्यामध्ये "निओ निकोटिनॉईड्‌स' गटातील इमिडाक्‍लोप्रिड, थायामेथोक्‍झाम व क्‍लोथीयानीडीन या कीटकनाशकांचा पिकांमध्ये होणारा वापर परागीभवन करणाऱ्या माश्‍यांना (मधमाश्‍या, बंबल बी आदी) विविध प्रकारे धोकादायक असल्याचा निष्कर्ष नोंदवला. युरोपीय आयुक्तालयाने हा अहवाल प्रमाण मानून त्याप्रमाणे संबंधित तीन कीटकनाशकांच्या वापरावर मर्यादित स्वरूपाची (रिस्ट्रिक्‍टेड) दोन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी एक डिसेंबर, 2013 पासून सुरू झाली आहे.
युरोपीय महासंघाच्या आरोग्य व ग्राहक (हेल्थ ऍण्ड कंझुमर्स) विभागातर्फे याविषयी ऍग्रोवनला माहिती देण्यात आली आहे.

युरोपीय आयुक्तालयाने घेतलेल्या निर्णयातील काही महत्त्वाचे मुद्दे असे-

1) मधमाशी, बंबलबी यांच्याद्वारा परागीभवन होणाऱ्या कोणत्याही पिकामध्ये वा वनस्पतींमध्ये इमिडाक्‍लोप्रिड, थायामेथोक्‍झाम व क्‍लोथीयानीडीन या कीटकनाशकांचा वापर बीजप्रक्रिया, मातीतून देणे (सॉईल ऍप्लिकेशन) व फवारणी यांच्याद्वारा करता येणार नाही.
2) हरितगृहांमध्ये व खुल्या शेतात मधमाश्‍या वा बंबल बी यांना आकर्षित करणाऱ्या पिकांमध्ये या कीटकनाशकांचा वापर केवळ पिकांच्या फुलोरा अवस्थेनंतरच करता येईल.
3) बंदी घातलेल्या दोन वर्षांच्या कालावधीत संबंधित कीटकनाशकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा होणाऱ्या शास्त्रीय व तांत्रिक दृष्ट्या अभ्यासाचे पुनर्मूल्यांकन युरोपीय महासंघाकडून केले जाईल. त्यानंतरच त्यांच्या वापराला पुनर्संमती देण्याचा निर्णय घेण्यात येईल.

मधमाश्‍यांना कुठून, केव्हा धोका पोचतो

"इप्सा'च्या अहवालात मधमाश्‍यांना धोका उत्पन्न करणारे तीन स्त्रोत :
-परागीभवन करताना फुलांतील अवयवांत राहणारे रासायनिक अवशेष
-रासायनिक बीजप्रक्रिया करताना वा दाणेदार कीटकनाशकाचा वापर करताना होणारे प्रदूषण
-रसायनांचा वापर झालेल्या पिकातून स्रवणाऱ्या पदार्थांशी मधमाश्‍यांचा संपर्क होतो त्या वेळी

भारतातही अभ्यासप्रक्रिया झाली सुरू

दरम्यान केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकरण समितीचे (सीआयबी ऍण्ड आरसी) सदस्य डॉ. टी.पी. राजेंद्रन ऍग्रोवनशी बोलताना म्हणाले, की भारतातही "निओनिकोटिनॉईड्‌स' गटातील काही कीटकनाशकांच्या पर्यावरण सुरक्षिततेविषयीचा डाटा मागवून घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील अभ्यास प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच या कीडनाशकांविषयी पुढील निर्णय घेण्यात येईल.

बंदी घातलेल्या कीटकनाशकांचा भारतातही होतो वापर:-

-इमिडाक्‍लोप्रिड, थायामेथोक्‍झाम व क्‍लोथीयानीडीन अशी त्यांची नावे
-ही कीटकनाशके शत्रुकीटकांच्या शरीरातील चेतासंस्थेवर (नर्व्हस सिस्टिम) परिणाम घडवून त्यांना मारतात.
-तीनही कीटकनाशके भारतातही वापरली जातात. विशेषतः इमिडाक्‍लोप्रिड व थायामेथोक्‍झाम यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बीजप्रक्रिया, मातीद्वारा देणे व फवारणी या तीनही प्रकारे त्याचा वापर अधिकृत ठरवण्यात आला आहे.
-इमिडाक्‍लोप्रिड कीटकनाशकाची शिफारस कापूस, भात, मिरची, ऊस, आंबा, सूर्यफूल, भेंडी आदी पिकांत केली आहे. तर थायामेथोक्‍झामची शिफारस कापूस, भात, भेंडी, टोमॅटो, वांगी, बटाटा, गहू आदी पिकांत, तर क्‍लोथियानीडीनची शिफारस भात व कापूस पिकात झाली आहे.
-तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी, वाळवी, खोडकिडा, गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी आदी किडींच्या नियंत्रणासाठी यातील वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर होतो.

स्वतंत्र चौकट....

युरोपात बंदी असली तरी घाबरण्याचे कारण नाही
एनआरसीने केले बागायतदारांना आवाहन

"एमआरएल' पाळल्यास धोका नाही

"ग्रेपनेट' कार्यक्रमांतर्गत युरोपसाठी द्राक्षनिर्यात करण्यासाठी वापरावयाच्या कीडनाशके वेळापत्रकातही (ऍनेक्‍श्चर पाच) सुधारणा करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे विशेष पत्रकही पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने (एनआरसी) जारी केले आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांनी युरोपीय देशांत अस्वीकृत; मात्र भारतात शिफारस असलेली कीडनाशके वापरण्यास हरकत नाही, केवळ त्यांच्या युरोपीय "एमआरएल' पाळणे गरजेचे असल्याचे एनआरसीने म्हटले आहे.
ऍग्रोवनला याविषयीचे स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. के. बॅनर्जी म्हणाले, की ऍनेक्‍श्चर पाचमध्ये शिफारस केलेल्या सर्व कीडनाशकांची यादी अद्ययावत (अपडेट) केली आहे. प्रत्येक रसायनापुढे युरोपात मंजूर वा नामंजूर असे वर्गीकरण केले आहे. यात बुरशीनाशके, कीटकनाशके व तणनाशकांचाही समावेश आहे.
त्यावरून युरोपात नामंजूर झालेल्या कीडनाशकांचा वापर भारतात द्राक्षपिकात करायचा की नाही, असा संभ्रम भारतीय द्राक्ष बागायतदार व निर्यातदारांमध्ये निर्माण होऊ शकतो. मात्र युरोपात असंमत कीडनाशकांचा विषय युरोपीय संघाचे नियम व निकषांनुसार तेथील देशांपुरता मर्यादित आहे. भारतात या कीडनाशकांचा वापर वा त्यावरील बंदी यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार सीआयबी ऍण्ड आरसी संस्थेकडे असल्याने, येथील शेतकऱ्यांना ते नियम लागू नाहीत. "एनआरसी'ने आपल्या संकेतस्थळावर सुधारित ऍनेक्‍श्चर पाच व यासंबंधीची माहिती बागायतदारांसाठी प्रसिद्ध केली आहे.

फक्त "पीएचआय' व "एमआरएल' पाळा

युरोपीय द्राक्षनिर्यातीसाठी "ग्रेपनेट' कार्यक्रमांतर्गत एनआरसीने कीडनाशकांचे डोस, पीएचआय, त्यांचा वापर केव्हा व किती वेळा करायचा याच्या शिफारशी केल्या आहेत. त्यांचे काटेकोर पालन केल्यास व युरोपीय एमआरएलचे निकष पाळल्यास युरोपात त्यांचा माल कायदेशीर रीत्या अस्वीकृत होण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे एनआरसीचे म्हणणे आहे.

सुपरमार्केटचे निकष खासगी; सरकारी नव्हेत

युरोपातील काही व्यापाऱ्यांनी किंवा सुपरमार्केटनी कीडनाशकांच्या आपल्या "एमआरएल' निश्‍चित केल्या आहेत. मात्र हे त्यांचे खासगी निकष आहेत. एनआरसी, अपेडा किंवा केंद्र सरकारचे त्यावर कोणतेही नियंत्रण राहू शकत नाही. त्यामुळे भारतीय निर्यातदारांनी त्याकडे लक्ष देऊन संबंधित सुपरमार्केटसोबत व्यापारासंबंधी वाटाघाटी कराव्यात. मात्र "ग्रेपनेट' अंतर्गत युरोपीय महासंघ व भारत सरकार यांच्यात जो सामंजस्य करार झाला आहे, त्यानुसार ऍनेक्‍श्चर पाचमधील कीटकनाशकांचा वापर स्वीकृत ठरवण्यात आला असल्याचेही डॉ. सावंत म्हणाले.
तरीही कीडनाशकांचे शिफारस केलेले पीएचआय असे आहेत, की ते कडकपणे पाळल्यास युरोपातील सर्वोच्य न्यूनतम पातळीच्या (0.01 मिलिग्रॅम प्रति किलो- डिफॉल्ट लिमिट) खाली एमआरएल राहणार असल्याने बागायतदारांनी चिंता करण्याची गरज नाही.

युरोपात "नामंजूर' म्हणजे काय

युरोपात "नॉट अप्रूव्ह्ड' (नामंजूर) कीडनाशके या संकल्पनेविषयी डॉ. सावंत म्हणाले, की पर्यावरणातील लाभदायक सजीवांना (परागीभवन कीटकांच्या अनुषंगाने) हानीकारक ठरणे, हे कारण काही कीडनाशकांच्या नामंजुरीमागे आहे. त्याशिवाय आपल्या काही उत्पादनांच्या पुढील व्यवसायाबाबत संबंधित कीडनाशक कंपन्यांना रस नसल्यास युरोपीय आयुक्तालयाकडे त्यांच्याकडून "रिव्ह्यू रिपोर्ट' दिला जात नाही. त्यामुळेही उत्पादन नामंजूर होऊ शकते.

निर्यातदार काय म्हणतात

नाशिक जिल्ह्यातील आघाडीचे द्राक्ष बागायतदार व निर्यातदार विलास शिंदे ऍग्रोवनशी बोलताना म्हणाले, की आमच्या बागायतदार- निर्यातदार गटाकडेही युरोपातील सुपरमार्केटकडूनही सूचना आली आहे. त्यामध्ये इमिडाक्‍लोप्रिडसारख्या कीटकनाशकाचा वापर पीक फुलोरा अवस्थेनंतर करू नये, असे त्यांनी सुचवले आहे.
आम्ही तर निर्यातीचे सर्वच नियम तंतोतंत पाळतो. परंतु मला असे सुचवायचे आहे, की युरोपातील किंवा आंतरराष्ट्रीय नियम सतत बदलत राहणार. केवळ त्यांची मागणी पूर्ण करायची म्हणून आपल्या शेती पद्धतीत बदल करीत राहण्यापेक्षा आपल्या तसेच भारतीय ग्राहकांच्या आरोग्याचा व त्यांच्या मागणीचा विचार करून शेती कशी सुधारित करता येईल, रसायनांचा वापर कसा नियंत्रित ठेवता येईल, याचा विचार झाला पाहिजे.

कीटकनाशकांमुळे कसा पोचतो मधमाश्‍यांना धोका

आंतरप्रवाही कीटकनाशकाची बीजप्रक्रिया किंवा फवारणी केली असेल तर असे कीटकनाशक
आंतरप्रवाही गुणधर्मामुळे संपूर्ण झाडात पसरते. साहजिकच फुले, परागकण कीटकनाशक प्रदूषित होतात.
परागकण गोळा करण्याच्या वेळी मधमाश्‍यांचा त्यांच्याशी संपर्क येतो.
निओनिकोटिनॉईड्‌स गटातील कीटकनाशके कीटकांच्या चेतासंस्थेवर (नर्व्हस सिस्टीम) परिणाम घडवून आणतात. अशा रीतीने मधमाश्‍यांची कीटकनाशकांपासून हानी होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

 

स्त्रोत: अग्रोवन ५ एप्रिल २०१४


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate