अकोला परिसरामध्ये हरभरा पिकात रोपे कुरतडणारी अळी, गोनोसेफॅलम भुंगे व खोडातील सोंड्याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. आपल्या पिकाचे व्यवस्थित सर्वेक्षण करून या किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
अकोला येथील दहीगाव गावंडे व ग्राम कोठारी या परिसरात रोपे कुरतडणारी अळी, गोनोसेफॅलम भुंगे (स्थानिक नाव- काळी म्हैस) यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला. या किडीचा प्रादुर्भाव अन्य रब्बी पिकांनासुद्धा होऊ शकतो.
नुकसानाचे स्वरूप
- या किडीच्या अळ्या बियाण्याचे अंकुर, तसेच भुंगे मुळे व खोड कुरतडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व वाळून जातात. त्यामुळे एकरी झाडांची संख्या कमी होते. उत्पादनात लक्षणीय घट येते. अधिक प्रादुर्भावामध्ये दुबार पेरणीचीसुद्धा पाळी येते.
- पावसाळ्यात पावसाच्या लहरीपणामुळे सतत पावसाच्या हलक्या सरी व भारी पावसाची वारंवारता अत्यंत कमी यामुळे या किडीच्या जमिनीतील प्रजोत्पादनास चालना मिळाली आहे. प्रामुख्याने ही कीड न कुजलेल्या पिकांच्या अवशेषावर जगते व तिथेच त्यांचे प्रजोत्पादन होते. पिकांचे अवशेष न
मिळाल्यास ती अंकुरलेल्या बियाण्यावर व रोपांवर हल्ला करते.
उपाययोजना
1) शेतामध्ये न कुजलेल्या पिकांच्या अवशेषांचे, शेणखताच्या ढिगांची हंगामापूर्वी विल्हेवाट लावावी.
2) पडीत जमिनीमध्ये किडीच्या प्रजोत्पादन चक्रास चालना मिळते, म्हणून जमीन पडीत ठेवू नये.
3) रोपावस्थेतील पिकावर प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) 250 मि.ली. प्रति 100 लिटर पाण्यात घेऊन ड्रेचिंग करावे. सर्वसाधारणपणे एकरी चारशे लिटर पाणी लागते. ड्रेचिंगसाठी पंपामध्ये तयार केलेले द्रावण टाकून नोझलमधील टिकली काढून धारेच्या रूपाने द्रावण प्रत्येक ओळीवर रोपाच्या शेंड्याकडून खोडाकडे जाईल असे पाहावे. जमिनीत रोपाच्या खोडाच्या आजूबाजूला व मुळाच्या भागात द्रावण पसरणे आवश्यक आहे.
- आवश्यकता भासल्यास 15 दिवसांच्या अंतराने पुन्हा सल्ला घेऊन अन्य कीटकनाशक द्रावणाचे ड्रेचिंग करावे.
संपर्क - डॉ. अनिल कोल्हे, 9922922294
स्त्रोत: अग्रोवन