অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जीआयसी सायलो उपयुक्त

शेतामध्ये काळजी घेऊन पिकवलेल्या शेतीमालाची साठवण करण्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे साठवणीमध्ये अन्नधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी अत्याधुनिक सायलो उभारून धान्य साठवण उपयुक्त ठरू शकते.

  • सायलोमध्ये व्यवस्थित, स्वच्छ व सुरक्षितपणे दोन वर्षांपर्यंत धान्य साठविता येते.
  • सायलोची उंची अधिक ठेवत कमी जागेमध्ये त्याची उभारणी करणे शक्य असून, जागेची बचत होते.
  • धान्य आत ठेवणे व बाहेर काढण्याच्या प्रक्रियेतील नुकसान टाळले जाते.
  • मनुष्यबळ अत्यंत कमी लागते.
  • धान्यामध्ये हवा खेळती राहत असल्याने धान्यांचा दर्जा चांगला राहतो.
  • सायलोचा वापर खालील उद्योगासाठी करणे शक्य आहे

    • खाद्य तेल आणि अन्य उद्योग
    • साखर उद्योग
    • डिस्टिलरी उद्योग
    • पशुखाद्य उद्योग
    • धान्यापासून पीठनिर्मिती उद्योग
    • धान्य साठवणीसाठी
    • अन्नधान्याचे गोदाम
    • डाळ मिल
    • जीआयसी सायलो आणि पारंपरिक गोदामातील साठवणीतील फरक

      • सायलो उभारणीसाठी एकंदरीत कमी जागा लागते. गोदामांच्या उभारणीसाठी अधिक जागा लागते.
      • सायलोमध्ये काम करण्यासाठी ऑपरेटरची संख्या अत्यंत कमी असते. मात्र गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. धान्य हे पिशव्या किंवा पोत्यांमध्ये ठेवले जाते. त्यामुळे चढ-उतार आणि हाताळणीसाठी अधिक मनुष्यबळ लागते.
      • सायलोमध्ये धान्यामध्ये हवा खेळती राहते. गोदामांमध्ये पिशव्यांमध्ये साठवलेल्या धान्यामध्ये हवा खेळती राहत नाही. पर्यायाने रोग- किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
      • सायलोमध्ये प्रत्येक टप्प्यावर उच्च आणि कमी पातळीचे इंडिकेटर व स्वयंचलित साधनाची सुविधा असते. अनेक कामे ही स्वयंचलित होतात. गोदामांमध्ये स्वयंचलित पद्धतीच्या वापरावर अनेक मर्यादा येतात.
      • सायलोसाठी एमएचई पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे प्रक्रिया उद्योगासाठी धान्यांचा सातत्यपूर्ण पुरवठा करणे शक्य होते. गोदामांतील बहुतांश कामे व हाताळणी ही माणसांच्या साह्याने केली जात असल्याने त्यामध्ये मनुष्यनिर्मित दोष राहण्याची शक्यता असते, तसेच सातत्यपूर्ण पुरवठा शक्य होत नाही.
      • सायलोमध्ये धान्याची चढ-उतार करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. गोदामासाठी विद्युत ऊर्जेची अत्यंत कमी गरज लागते.
      • सायलोमध्ये पिशव्या किंवा पोत्यांची आवश्यकता नसते. गोदामांमध्ये प्रति टन धान्य साठवणीसाठी सुमारे 500 रुपये पोत्यांसाठी लागतात. त्यामुळे साठवण खर्चामध्ये वाढ होते.
      • सायलोमध्ये धान्याची नासाडी जवळपास होत नाही. गोदामामध्ये प्रति टन सुमारे 50 किलो धान्याची नासाडी उंदीर, रोग व किडीमुळे होते.
      • सायलोमध्ये धान्यांची चोरी करणे शक्य होत नाही. गोदामांमध्ये चोरीची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने गोदामांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात करावे लागतात.
      • सायलोमध्ये पाऊस व अन्य कारणांमुळे पाण्याच्या गळतीची शक्यता नसते, तर गोदामांमध्ये पावसाचे पाणी छतांची गळती किंवा खिडक्या, दरवाजांमधून वाहून आलेल्या पाण्यामुळेही होऊ शकते.
      • सायलोचे स्थलांतर करणे शक्य असते. सायलोचे विविध भाग खोलून पुन्हा त्यांची उभारणी करणे शक्य आहे. नट-बोल्ट आधारित रचना असल्याने खोलणे व उभारण्याची प्रक्रिया वेगाने होते. गोदामांचे स्थलांतर शक्य होत नाही. दुसऱ्या ठिकाणी गोदाम हलवायचे असल्यास आधीचे पाडावे लागते व नव्या ठिकाणी दुसऱ्या गोदामाची उभारणी करावी लागते. पर्यायाने खर्चामध्ये वाढ होते.
      • खर्च - सायलोचा प्राथमिक खर्च हा गोदामांच्या उभारणीइतकाच येतो. मात्र पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाचवणे शक्य होते. तसेच स्वयंचलित यंत्रणेमुळे खर्चात मोठी बचत होते. गोदामांच्या उभारणीसाठी जागा अधिक लागते, त्यामुळे जागा खरेदीपासून उभारणी व नंतरच्या काळात लागणारे मनुष्यबळ यांचा विचार करता खर्चाचे प्रमाण अधिक राहते.
      • सायलोमध्ये पहिल्यांदा आलेले धान्य प्रथम बाहेर पडते. त्यामुळे धान्य खराब होत नाही. गोदामामध्ये पहिल्यांदा ठेवलेली पोती शेवटी बाहेर पडतात.
      • धान्यांचा दर्जा सायलोमध्ये अधिक काळासाठी चांगला राहतो. गोदामांमध्ये अधिक काळ धान्य राहिल्यास धान्याचे नुकसान होण्याची शक्यता असते.
      • सायलोतील महत्त्वाचे घटक (आकृती एक)


        1. धान्य जमा करण्याचे ठिकाण (रिसीव्हिंग हॉपर)
        2. चेन आणि बेल्ट कन्व्हेअर (धान्य पुढील टप्प्याकडे नेले जाते.)
        3. बकेट इलेव्हेटर (धान्य अधिक उंचीपर्यत नेले जाते.)
        4. ग्रेन क्लिनर (धान्याची साफसफाई केली जाते.)
        5. बकेट इलेव्हेटर
        6. चेन कन्व्हेअर (धान्य सायलोमध्ये सोडले जाते.)
        7. जीआयसी सायलो
        8. स्वीप अगर (धान्य बाहेर काढण्यासाठी ओढले जाते.)
        9. अनलोडिंग गेट (धान्य बाहेर काढण्यासाठी दरवाजा)
        10. ट्रक किंवा गाडी किंवा प्रक्रिया उद्योगाकडे धान्य नेण्यासाठी कन्व्हेअर बेल्ट.

        संपर्क - ए. एस. साबळे - 9049004154
        020- 26708246 , 47
        (लेखक बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. - काढणीपश्चात यंत्र विभाग, पुणे येथे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.)

         

        स्त्रोत: - अग्रोवन

         

    अंतिम सुधारित : 10/7/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate