অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉवर वीडर,छोटे ट्रॅक्‍टर

लहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, ग्रास कटर, आधुनिक फवारणी यंत्र आणि 10 ते 25 अश्‍वशक्तीचे ट्रॅक्‍टर्स उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो. प्रकाश बंडगर 

पॉवर वीडर

शेतामध्ये, बांधावर तसेच रस्त्याकडेला वाढणारे तण ही शेतकऱ्यांपुढील मोठी समस्या आहे. हे वाढलेले तण वेळोवेळी काढणे गरजेचे असते. वाढलेले तण जर उपटून घेतले तर जमिनीच्या पृष्ठभागाची माती सुटी होऊन ती पावसामुळे व वाऱ्यामुळे वाहून जाण्याची (धूप होण्याची) शक्‍यता असते. या समस्येवर उपाय म्हणून पॉवर वीडर हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर उपलब्ध आहे. 
कृषी मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने शेतकरी तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात; परंतु त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन परिणाम होतो. जैविक शक्तीचा विचार केल्यास या परिणामांवर उपाय म्हणून पॉवर वीडर वापरणे योग्य ठरेल. 
ज्या पिकांच्या सरींमधील अंतर 70 सें.मी.पेक्षा जास्त आहे अशा पिकांमध्ये तण काढणीसाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उदा. नारळ, केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, द्राक्षे इत्यादी विविध पिकांसाठी आपण पॉवर वीडरचा वापर करू शकतो. बाजारपेठेत विविध प्रकारचे पॉवर वीडर तीन ते सहा अश्‍वशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत.

पॉवर वीडरची वैशिष्ट्ये

1) वजनाने हलके, 2) आकाराने लहान, 3) वापरायला सोपे, 4) उत्कृष्ट कार्यक्षमता, 5) बहुपयोगी.

ग्रास कटर 

पारंपरिक पद्धतीनुसार गवत तसेच जनावरांची वैरण कापणीसाठी शेतकरी विळ्याचा वापर करतात; परंतु सध्या उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता तसेच वेळेची उपलब्धता लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी मनुष्यबळ व पैशाचा वापर करून गवत (वैरण) कापणी करणे गरजेचे आहे. यामुळे वैरण कापणीसाठी अत्याधुनिक ग्रास कटरचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. 
या यंत्राच्या साहाय्याने गवताबरोबरच भात, गहू या पिकांची कापणी करता येऊ शकते. या यंत्राच्या साहाय्याने साधारणतः एकरी गवत कापणीसाठी सहा ते आठ तास इतका वेळ लागतो आणि ताशी 0.6 ते 0.7 लिटर इतके इंधन लागते. 
अशा प्रकारची यंत्रे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी तसेच मोठ्या दूध उत्पादकांनी फायदा घेणे गरजेचे आहे. यामुळे त्यांना वेळ व आर्थिक नियोजन करण्यास मदत होऊ शकते. 
वैशिष्ट्ये - 
1) वजनाने हलके (10 ते 15 किलो), 2) 1 ते 2.5 अश्‍वशक्ती इंजिन, 3) वापरायला सोपे, 4) बहुपयोगी, 5) आकाराने लहान.

आधुनिक फवारणी यंत्रे

सुधारित पद्धतीने शेती करत असताना कीड, रोगनियंत्रण, तणनियंत्रणासाठी फवारणी यंत्राची गरज असते. 
बाजारपेठेत मानवी शक्ती वापरून (हाताने व पायाने वापरायची), स्वयंचलित, ट्रॅक्‍टरचलित अशा विविध प्रकारची फवारणी यंत्रे (स्प्रेअर्स) उपलब्ध आहेत. 
प्रकार - 
1) बकेट पद्धतीचा फवारणी पंप, 2) हॅंड कॉम्प्रेशन पंप, 3) फूट कॉम्प्रेशन पंप, 4) हाताने चालवायचा (रॉकिंग) फवारणी पंप, 5) पाठीवर बांधून चालवायचा (नॅपसॅक) पंप, 6) इंजिनचलित फवारणी पंप, 7) बॅटरीचलित फवारणी पंप. 
वैशिष्ट्ये - 
1) वापरण्यास सोपे, 2) एकसारख्या प्रमाणात फवारणी, 3) पाहिजे त्या ठिकाणी फवारणी, 4) पाहिजे त्या प्रमाणात फवारणी.

लहान ट्रॅक्‍टर्स

शेतीच्या आधुनिकीकरणामध्ये ट्रॅक्‍टरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या ट्रॅक्‍टरला पर्याय म्हणून लहान ट्रॅक्‍टर खरेदी करणे फायद्याचे ठरते. जी कामे मोठा ट्रॅक्‍टर करू शकतो, तीच कामे अगदी किफायतशीरपणे लहान ट्रॅक्‍टरही करू शकतो. ऊस वाहतुकीसारख्या कामासाठीसुद्धा बैलांऐवजी या लहान ट्रॅक्‍टर्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. एका बैलजोडीपासून साधारणतः एक अश्‍वशक्ती इतकी शक्ती उपलब्ध होऊ शकते; परंतु लहान ट्रॅक्‍टरपासून आपणास 10 ते 25 अश्‍वशक्ती इतकी शक्ती उपलब्ध होऊ शकते. शेतीमाल वाहतूक, फळबाग आंतरमशागत, कोळपणी, कीडनाशक फवारणीसाठी छोटे ट्रॅक्‍टर फायदेशीर आहेत. 
आकाराने लहान असल्याने शेताच्या कोणत्याही ठिकाणी जाऊन तिथली मशागत हा ट्रॅक्‍टर करू शकतो. तसेच रुंदी केवळ तीन फूट असल्यामुळे उसाच्या पट्टापद्धतीमधील मशागतीसाठी याचा सर्रास वापर होताना दिसत आहे. 

वैशिष्ट्ये 

1) लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, 2) वजनाने हलका असल्याने जमीन दबत नाही, 3) कमी जागेत वापर, 4) बैलांना पर्याय म्हणून उपयुक्त.
संपर्क - श्री. बंडगर - 9764410633 
(लेखक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate