অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कंपोस्टखत करण्याच्या पद्धती

 

 

बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर जसा परिणाम होत आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला कमी झालेल्या जमिनीचा कसही कारणीभूत आहे. संकरित जाती आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामांमध्ये एकापाठोपाठ पिके घेत आहे, त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने हजारो जमिनी क्षारपड झाल्या आहेत. अशा मानवनिर्मित समस्या सोडविण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत. जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते.

शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय.

कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती खाली दिल्याप्रमाणे आहेत -


इंदौर पद्धत -

- इंदौर पद्धतीलाच ढीग पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे 6 फूट रुंद व 5 ते 6 फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून शेतातील उरलेले पिकांचे अवशेष, काडीकचरा, शेण, तण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा त्यावर एक थर ठेवला जातो.
- ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर (ऑक्‍सिजनयुक्त) लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर-खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात.
- तसेच ओलावा टिकविण्याकरिता पाणी शिंपडले जाते. याशिवाय ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते. 3 ते 4 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.
- या खतामध्ये 0.8 ते 1.5 टक्के नत्र, 0.5 ते 1 टक्का स्फुरद व 1 ते 1.8 टक्के पालाश मिळून इतर अन्नघटक असतात.

बंगलोर पद्धत -


- बंगलोर पद्धतीलाच खड्डा पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर 15 ते 20 सें. मी. जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो.
- अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेणमाती मिश्रण करून लिंपून घेतले जाते.
- सेंद्रिय पदार्थांची कुजवण्याची क्रिया लवकर होण्याकरिता अधूनमधून पाणी शिंपडले जाते.
- कुजण्याची क्रिया सुरवातीला ऑक्‍सिजनविरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास वेळ लागतो.
- या पद्धतीमध्ये अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.

नॅपेड पद्धत -

- ही पद्धत पुसद येथील एक गांधीवादी शेतकरी कै. नारायण देवराव पांढरीपांडे यांच्या प्रयोगातून विकसित केली आहे.
- या पद्धतीत जमिनीवर पक्‍क्‍या विटांच्या साह्याने 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूट उंच अशा आकाराचे टाकीचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळींनंतर तिसऱ्या ओळीत खिडक्‍या ठेवल्या जातात.
- या पद्धतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडीकचरा, 100 कि. ग्रॅ. शेण, दीड टन चाळलेली माती भरली जाते.
- नॅपेड पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात.
- त्यानंतर 6 इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन त्यावर 100 लिटर पाण्यात 4 ते 5 कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते.
- यानंतर साधारणतः 1 ते 2 इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर अर्धा देऊन परत पाणी शिंपडून ओलावा केला जातो. अशा प्रकारे 3 ते 4 महिन्यांत उत्कृष्ट कंपोस्ट तयार होते.

कंपोस्ट खताचे फायदे -

- कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो.
- कंपोस्ट खतनिर्मिती ही खर्चिक नसून, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे. टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर होतो.
- कंपोस्ट खतामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने धूप कमी होते.
- कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.

 

--------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत- अग्रोवन-ऍग्रो प्लॅनिंग

 

अंतिम सुधारित : 5/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate