অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकामध्ये कॅडमिअमचे प्रमाण

विषारी जड धातू पिकातून येतात जनावरे आणि माणसांच्या आहारात



मातीचा सामू आणि लोहाच्या प्रमाणावरून मातीतल्या कॅडमिअमच्या उपलब्धतेविषयी अंदाज मिळवणे शक्य असल्याचे न्यूझीलंड येथील लिंकन विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल क्वालिटी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील मातीतून पिकामध्ये येणाऱ्या कॅडमिअमसारख्या विषारी धातूंचे प्रमाण सीमित ठेवण्यासाठी मदत होणार आहे. 

न्यूझीलंडमधील गवताळ प्रदेश हे पर्यटकांसाठी स्वर्गासारखे दिसत असले तरी त्यामागे दडलेल्या कॅडमिअमसारख्या विषारी धातूंचा धोका वाढत आहे. न्यूझीलंड देशातील पडीक जमिनीमध्ये कॅडमिअमचे प्रमाण वाढले असून, पडीक जमिनीमध्ये उगवलेले गवत, मातीतून विषारी जड धातूंचे शोषण केले जाते. हे गवत जनावरे, शेळ्या- मेंढ्या यांच्या खाद्यामध्ये येतात. पर्यायाने त्यांच्या दुग्ध आणि मांसामध्ये कॅडमिअमची तीव्रता वाढली असून, त्याचा माणसांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून ज्या दुग्ध पदार्थांवर न्यूझीलंडची अर्थव्यवस्था उभी आहे, त्यावरचा घाला येऊ शकतो. त्या संदर्भामध्ये न्यूझीलंड येथील लिंकन विद्यापीठातील शास्त्रज्ञ ब्रेट्ट रॉबिन्सन यांनी या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 

कॅडमिअमचे प्रमाण वाढण्याची कारणे


- गेल्या दशकापासून सातत्याने होत असलेला कॅडमिअमच्या भेसळयुक्त स्फुरदयुक्त खतांच्या वापरातून या समस्येला चालना मिळाली आहे. अद्यापही या खतांचा वापर केला जातो. रॉबिन्सन आणि त्यांच्या गटाने मातीतील नेमक्या कोणत्या घटकांचा कॅडमिअमच्या तीव्रतेवर अधिक परिणाम होतो, हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयोगामध्ये मातीतील सामू, लोहाची तीव्रता हे घटक एकूण कॅडमिअमच्या पातळीचा अंदाज देण्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले. त्यातून जैविकदृष्ट्या पिकांसाठी उपलब्ध कॅडमिअमचे प्रमाण मिळवणे शक्य होणार आहे. 
- त्यासाठी रॉबिन्सन यांनी कोळसा खाण कंपनी सॉलिड एनर्जी न्यूझीलंड आणि स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यासह संशोधनात्मक प्रयोग करून, पिकातील कॅडमिअमच्या शोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मातीतील योग्य त्या घटकांना ओळखण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जगभरच्या कॅडमिअम प्रदूषणावर उपाययोजना करणे शक्य होणार आहे. 

कॅडमिअम शोषणावर नेमका पडला प्रकाश

त्याचप्रमाणे पिकाकडून कॅडमिअम शोषणाच्या नेमक्या पद्धतीवर प्रकाश पाडण्याचा रॉबिन्सन यांनी प्रयत्न केला आहे. 
१) अधिक आम्लधर्मी असलेल्या मातीमध्ये अधिक कॅडमिअमचे पिकाकडून शोषण होते. तिची आम्लता कमी करण्यासाठी चुन्याचा वापर केल्यास मातीमध्ये कॅडमिअम अडकवून ठेवणे शक्य होईल. 
२) त्याचप्रमाणे आयर्न ऑक्साइड हे मातीमध्ये कॅडमिअमला बांधून ठेवण्याचे काम करते.

 

 

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate