অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेणखत स्लरी ड्रिप मधून

शेणखत स्लरी ड्रिप मधून

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यातील वडगाव तनपुरे गावचे प्रयोगशील शेतकरी सुभाष तनपुरे यांनी ठिबक सिंचनाद्वारा (ड्रिपद्वारा) शेणखत स्लरी वा जीवामृत देण्याचे अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे. वेळ, मजुरी, पैसा व श्रम अशा विविध गोष्टींची बचत करणारे हे तंत्रज्ञान म्हणजे "टॅंक फिल्टर' अर्थात गाळणी यंत्र स्वरूपातील आहे. रासायनिक वा सेंद्रिय, तसेच जिरायती वा बागायती अशा कोणत्याही शेती पद्धतीत त्याची उपयुक्तता असून, अत्यंत सुलभपणे हे यंत्र वापरता येते.

सुभाष तनपुरे हे प्रयोगशील व प्रयत्नवादी वृत्तीचे शेतकरी. नगर जिल्ह्यात जिरायती, कर्जत तालुक्‍यातील वडगाव तनपुरे गावात संयुक्त कुटुंबाची मिळून त्यांची सुमारे सव्वादोनशे एकर शेती. प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून भरीव प्रगती कशी करता येईल, त्यातून समृद्ध कसे होता येईल, या दृष्टीने त्यांनी विविध प्रयत्न केले. पूर्वी त्यांच्याकडे दीडशे म्हशी, 50 गायी, शेळ्या, मेंढ्या एवढा पसारा होता. दुग्ध व्यवसाय तेजीत होता. मात्र मजूरसमस्येचा फटका बसून तो थांबवावा लागला. सध्या 20 गायी, चार बैल, दीडशे मेंढरे, 70 शेळ्या एवढे पशुधन त्यांच्याकडे आहे. नवे काही करीत राहण्याची त्यांची ऊर्मीच त्यांना शेतीतील नव्या वाटा दाखवत आहे. त्यातूनच त्यांनी ड्रिपमधून शेणस्लरी देण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच संशोधन असावे.

आपल्या संशोधनाबाबत तनपुरे म्हणाले, की सध्याचे युग सकस, आरोग्यदायी अन्ननिर्मितीचे असल्याने सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले. या शेतीत शेणखत किंवा जीवामृताचे मोठे महत्त्व आहे. परंतु ते उपलब्ध करायचे तर सकाळी लवकर उठून जनावरांचे शेण-मूत्र काढायचे, शेतात घेऊन जायचे, त्याचा वापर करायचा, त्यासाठी लागणारे श्रम, वेळ, व्याप, मजुरी, खर्च एवढा होता, की "प्रॅक्‍टिकली' हे काम करणे कठीण झाले होते. यावर उपाय शोधताना मनात विचार आला, की ड्रिपमधून शेणस्लरी वा जीवामृत देता आले तर? तर मग हा सगळाच व्याप वाचेल. मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरवातीला दगडी बांधकाम असलेल्या रचना (स्टक्‍चर्स) व त्याआधारे गाळणी यंत्रणा तयार करून पाहिली. त्यात काही प्रमाणात यश मिळाले. पण आम्हाला सहज वापरता येईल असे तंत्रज्ञान हवे, अशी शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागली.

टॅंक फिल्टरनिर्मितीचा ध्यास


टॅंक फिल्टर (टाकी गाळणयंत्र) यंत्रणा तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन अहोरात्र काम करण्यास तनपुरे यांनी सुरवात केली. कल्पकता, संशोधन वृत्ती, चिकाटी कायम ठेवली. आपल्या कल्पनेतील यंत्र बनवण्याचे काम पुणे येथील परिचित प्लॅस्टिक टॅंकनिर्मिती व्यावसायिकांकडे देण्यात आले. अनेक चाचण्या, त्रुटी सुधारत सुमारे चार वर्षांच्या प्रयत्नांतून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करू शकणारे टॅंकरूपी गाळणी यंत्र तयार करण्यात तनपुरे यांना यश आले.

कसे आहे गाळणी यंत्र?


-"एलएलडीपी" घटक असलेली ही प्लॅस्टिकची टाकी (टॅंक)
- लांबी साडेसात फूट, रुंदी चार फूट व उंची अडीच फूट.
- सुमारे 20-25 वर्षे उन्हात टिकाव धरू शकते.
- टाकीची क्षमता 2100 लिटर
- दोन व्यक्ती उचलून नेऊ शकतील असे टाकीचे वजन आहे. शेतात आपल्या सोयीनुसार कुठेही ठेवता येते. जागाही कमी लागते.

रचना व कार्यपद्धती -


- टाकीची विभागणी (पार्टिशन) दोन भागांत दोन फिल्टरद्वारा (गाळणी) केली आहे. टाकीच्या मुख्य भागात शेणखत, पाणी, गोमूत्र वा जीवामृत आदी घटक टाकता येतात. त्यानंतर गाळण प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होईपर्यंत चार तास थांबावे लागते. त्यानंतर ड्रिपद्वारा शेणस्लरी देण्याच्या कामास सुरवात करता येते.

गाळणीप्रक्रिया कशी होते?


टाकीत शेणस्लरी वा जीवामृत आल्यानंतर पहिल्या फिल्टरद्वारा गाळण प्रक्रिया सुरू होते. या फिल्टरमध्ये शेणस्लरीतील सर्व प्रकारचा काडीकचरा, चोथा बाजूला होतो. दुसऱ्या फिल्टरमध्ये हे द्रावण येताच तेथे द्रावणातील छोटे घटक अडवले जातात. त्यानंतर टाकीच्या आऊटलेटला आतून असलेल्या चार जाळ्या, त्याबाहेर दोन व व्हेंचुरीजवळ चार जाळ्या, अशा एकूण बारा फिल्टरमधून द्रावण गाळले जाते. त्यानंतर बाहेर येते ते स्वच्छ, पारदर्शक, चोथाविरहित शेणस्लरीचे पाणी.

ड्रिपद्वारा कसे द्याल?


विहिरीवरून अगर बोअरवरून "ड्रिप इरिगेशन'साठी येणाऱ्या "मेन पाइपलाइन'ला फिल्टर टाकीच्या पाइपचे कनेक्‍शन देता येते. व्हेंचुरीद्वाराही ते देता येते. द्रावण चोथाविरहित असल्याने ठिबक संचामध्ये ते "चोक अप' होत नाही. 2100 लिटर टाकी ठेवलेल्या जागेवरून दोन ते 25 एकरांपर्यंत हे द्रावण ड्रिपद्वारा पोचवता येते. थोडक्‍यात, विद्राव्य खते ड्रिपद्वारा दिली जातात, त्याच पद्धतीने हे द्रावण शेताच्या कोणत्याही प्लॉटपर्यंत पोचवणे शक्‍य होते.

नाबार्डतर्फे पुरस्कार


सन 2012 मध्ये नाबार्डने "रूरल इनोव्हेशन" ही स्पर्धा घेतली. भारतातून त्यातील केवळ 30 जणांची निवड झाली. त्यात तनपुरे यांच्या संशोधनाचा समावेश होता. त्यात शेतकरी म्हणून तनपुरे एकमेव होते. बाकी सर्व संशोधन वा स्वयंसेवी संस्थांचा समावेश होता.

पेटंटसाठी अर्ज-


भारत सरकारच्या मुंबई येथील पेटंट कार्यालयाकडे आपल्या संशोधनाचे तनपुरे यांनी नोंदणीकरण केले आहे. सध्या हे काम प्रक्रियावस्थेत आहे. नाबार्डने त्यासाठी मदत केली असून, हे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी व त्याला व्यावसायिक रूप देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

कांदा पोसला, गांडुळे वाढली


तनपुरे म्हणतात, की आमच्या प्रयोगात प्रत्येकी 100 किलो शेण व गोमूत्र, 10 किलो बेसन, 10 किलो गूळ, दोन किलो वडाखालची माती एकत्र करून त्याच्या चाचण्या घेतल्या. फिल्टर होऊन मिळालेले चोथाविरहित द्रावण ड्रीपमधून डाळिंब, कांदा या पिकांना दिले. डाळिंब बागेत गांडुळांची संख्या नैसर्गिकरीत्या वाढली आहे. त्याचा फायदा म्हणजे जमीन भुसभुशीत होणार आहे. कांदाही चांगला पोसला जाऊन त्याची गुणवत्ता वाढली आहे. कोणत्याही ड्रिपरमध्ये स्लरीचे द्रावण "चोक अप' झालेले नाही. आज रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे सेंद्रिय घटकांचा अधिकाधिक वापर व ड्रिपमधून ते देणे गरजेचे झाले आहे. शेळी-मेंढीचे लेंडी खतही (पाणीमिश्रित) ड्रिपवाटे शेताला दिले आहे. सद्यःस्थितीत जीवामृत बैलगाडीत ठेवून पाठीमागे पाइप धरून प्रत्येक झाडाला एकेक लिटर या पद्धतीने दिले जाते. त्याला लागणारा वेळ, मजुरी, श्रम, पैसै आम्ही वाचवले आहेत.

शेण टाकण्यासाठी टबाचा वापर


मुख्य टाकीत शेण टाकण्यासाठी छिद्रे असलेल्या टबची सुविधा केली आहे. टाकीजवळ पाण्याचे "कनेक्‍शन' घेऊन त्याचे पाणी योग्य "प्रेशर'ने टबवर धरले व गोठ्यातील शेण आणून एकेक पाटी त्यात टाकले, तर शेणाला हात न लावता ते पूर्ण "मिक्‍स' होऊन टाकीत पडते.

बॅक फ्लशची सुविधा - ड्रिपद्वारा शेणखत दिल्यानंतर टाकीत अडकलेला चोथा, काडीकचरा काढण्यासाठी "बॅक फ्लश'ची सोय आहे.

तज्ज्ञांनी व्यक्त केली तंत्रज्ञानाची उपयुक्तता


मॉफ या सेंद्रिय शेती क्षेत्रातील संस्थेचे (पुणे) उपाध्यक्ष दिलीपराव देशमुख-बारडकर यांनी तनपुरे यांच्या गावी जाऊन त्यांच्या शेतात बसवलेल्या "टॅंक फिल्टर' तंत्रज्ञानाची माहिती घेतली. त्याविषयी भाष्य करताना ते म्हणाले, की शेती रासायनिक असो वा सेंद्रिय, मजूरटंचाई ही गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे यांत्रिकीकरण महत्त्वाचे झाले आहे. पारदर्शक स्वरूपातील "लिक्विड' शेणस्लरी ड्रिपवाटे देण्याचे तनपुरे यांचे तंत्रज्ञान म्हणूनच अधिक महत्त्वाचे वाटते. यात मजूरबळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

आता अनेक शेतकरी ड्रिपचाच वापर करतात. खतेही ड्रिपनेच देतात. मात्र शेणस्लरी, जीवामृत, सप्तधान्यांकुर, पंचगव्य अजूनही ड्रिपद्वारा देण्याचे तंत्र आपल्याकडे उपलब्ध नव्हते. तनपुरे यांच्या माध्यमातून ते उपलब्ध झाले आहे. जीवामृतात अनेक लाभदायक जिवाणू व बुरशी, नत्र, स्फुरद, पालाश घटक आहेत. या तंत्रात जीवामृत पिकाच्या मुळांपाशीच पडते, हा सर्वांत चांगला फायदा आहे.

या टॅंक फिल्टरमधून पंचगव्यही देता येईल. हा घटक झाडाची प्रतिकारक्षमता वाढवणारा आहे. त्यामुळे पीक किडी-रोगाला प्रतिकारक होऊ शकते. जैविक खतांत ऍझोटोबॅक्‍टर, रायझोबियम, तसेच कीडनाशकांत ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया बॅसियाना, स्युडोमोनास आदी घटकही या फिल्टरद्वारा देणे शक्‍य आहे. दशपर्णी अर्क, अखाद्य पेंडी- उदा.- करंज पेंड, निंबोळी पेंडही (द्रावणरूपात) देता येतील. अल्पभूधारक शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान छोट्या टाकीद्वारा आणता येईल का, ते पाहणेही गरजेचे आहे.

भात, गहू पिकांतही ठिबकचे प्रयोग होत आहेत. तेथे, तसेच आदिवासी भागांत चढउतारावर भाजीपाला घेतला जातो. तेथे ड्रिप पद्धती बसवून त्यातून जीवामृतासारखे घटक देण्यासाठी सतत चढउतार करण्याची गरज भासणार नाही. नारळ, काजू, आंबा पिकातही हे तंत्र अजमावता येईल.

मातीचे आरोग्य


ड्रिपद्वारा जीवामृत पिकांच्या मुळांजवळ पडत असल्याने जमिनीत गांडुळांची संख्या नैसर्गिकरीत्या वाढण्यास मदत होईल. साहजिकच जमीन भुसभुशीत होईल. बाहेरून गांडूळ खत टाकण्याची गरज नाही.

जिरायती शेतीला लाभदायक


जिरायती शेतीत एक पाणी दिल्यानेही पिकाला फरक पडतो. अशा भागात पावसाचा मोठा ताण पडला तर ड्रिपद्वारा शेणपाणी देऊन पीक तगवता येईल. गव्हात 21 व्या दिवशी मुकुटमुळ्या वा फुटवे येतात. विसाव्या दिवशी पिकाला ड्रिपद्वारा शेणपाणी सुरू केले तर नत्रासारखा पुरवठा होऊन मुकुटमुळे फुटण्यास व फुटवे भरपूर येण्यास मदत होईल.

द्रावण आणि सेंद्रिय "मॅटर"


शेणस्लरी वा जीवामृत पारंपरिक पद्धतीने देण्याच्या पद्धतीत जैविक काडीकचराही (एकूण सेंद्रिय मॅटर) पिकाच्या सान्निध्यात दिला जातो. मात्र तनपुरे यांच्या गाळणी यंत्राद्वारा शेणस्लरीतील चोथा (जैविक काडीकचरा) मागे राहून अर्क पिकापर्यंत पोचतो आणि आपल्याला पिकाला हा अर्कच द्यायचा आहे. त्यात 90 ते 99 टक्के प्रमाणात चांगला परिणाम घडवणारे घटक असतात. ते द्रावणातून पिकापर्यंत पोचतात. आता जो काही जैविक काडीकचरा (तनपुरे तंत्रात चोथा होऊन मागे राहिलेला) तुम्हाला पिकाला द्यायचा आहे त्याची गरज सेंद्रिय आच्छादनाच्या वापरातून करता येईल- जे आपण नेहमी करतोच. लाभदायक जिवाणू सेंद्रिय मॅटरच्या सान्निध्यातच वाढतात. पण आपल्या शेतात पिकांचे अवशेष, पालापाचोळा, ओलावा, गुळाचे थोडे मिश्रण व अंधार (अतिनील किरणांपासून संरक्षित) असेल तर या जिवाणूंच्या वाढीस ते अनुकूल ठरते.

शास्त्रीयदृष्ट्याही परिणामकारकता तपासावी


ड्रिपमधून शेणखत देण्याच्या या तंत्रज्ञान वापराची परिणामकारकता किंवा "सायंटिफीक व्हॅलिडेशन' अभ्यासणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांकडून त्या दृष्टीने शास्त्रीय प्रयोग घेता येतील. त्याचे अर्थशास्त्रही अभ्यासता येईल.
मॉफतर्फेदेखील त्याच्या विविध चाचण्या व प्रयोग केले जाणार आहेत.

विश्‍वासभाऊंनी थोपटली तंत्रज्ञानाची पाठ


पाचोरा (जि. जळगाव) येथील प्रयोगशील सेंद्रिय शेतकरी विश्‍वासराव पाटील यांनीही तनपुरे यांच्या शेताला भेट देऊन हे तंत्रज्ञान अभ्यासले. ते म्हणाले, की जीवामृत किंवा शेणस्लरी ड्रिपमधून देण्याची सुविधा आतापर्यंत तरी माझ्या पाहण्यात किंवा वाचनात आलेली नाही. या गाळणी यंत्रातून मिळणारे द्रावण संपूर्ण चोथाविरहित आहे. ड्रिपर चोक अप होत असल्याचे दिसत नाही. पिकांना हवे असलेले नैसर्गिक घटक मुळांजवळ देण्याचे हे तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी आहे. आज मानवी आरोग्य, पर्यावरण, माती यांचे संरक्षण करण्याला अत्यंत महत्त्व आले आहे. त्या दृष्टीने सेंद्रिय घटकांचा व त्यातही जीवामृताचा वापर ड्रिपसारख्या तंत्रातून वाढला तर दुसरी चांगली गोष्ट आणखी कोणती असू शकते?

तनपुरे यांच्या तंत्रात मजूरबळ वाचणार आहे. केवळ एक व्यक्ती गाळण यंत्राचे सर्व काम करू शकते. एकाच जागेवरून दोन एकरांपासून ते 25 एकरांपर्यंत ड्रिपने जीवामृत देता येते. शास्त्रज्ञ नेहमी सांगतात, की शेणखत एवढ्या प्रमाणात द्या, रासायनिक खतांचे एवढे बेसल डोस द्या. मात्र माझे सांगणे आहे, की शेण खत किंवा लेंडी खत पिकाच्या मुळाजवळ टाकले व तिथे ड्रिप केले तर ते सोन्याहून पिवळे असेल.
जिरायती शेतीसाठी हे अत्यंत चांगले तंत्रज्ञान आहे.

आपण जमिनीत उडीद, मूग, शेंगा घेतो. पिकाचे अवशेष, पालापाचोळा जमिनीलाच दिला पाहिजे. जमिनीत सेंद्रिय घटक चांगल्या प्रमाणात असतील तर लाभदायक जिवाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते. मृगाचा वा रोहिणीच्या पावसानंतर जमीन ओली झाल्यानंतर त्यातील मूळ जिवाणू जमिनीवरती येतात. अशा ठिकाणी जीवामृताची स्लरी दिल्यास ते जिवाणूंसाठी फायदेशीर ठरते. आपल्या जमिनीचे परीक्षण करून त्याआधारे जे घटक त्यात कमी आहेत ते तनपुरे यांच्या तंत्राद्वारा देता येतील. आज निंबोळी अर्काचीही प्रत्येक पिकाला गरज आहे, तर त्याचाही वापर या तंत्राद्वारा करायला हवा.

तनपुरे यांनी आपल्या टॅंक फिल्टरद्वारा पिकाला द्यावयाचे जे द्रावण तयार केले त्याच्या नमुन्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे पृथक्‍करण केले. त्यात पुढील घटक आढळले.

सामू - (पीएच)- 8.24
सेंद्रिय कर्ब - टक्के- 0.18
उपलब्ध नत्र - 0.088 (किलो प्रति हेक्‍टर)
उपलब्ध स्फुरद - 0.0215 (किलो प्रति हेक्‍टर)
उपलब्ध पालाश - 0.32 (किलो प्रति हेक्‍टर)
तांबे - 31.99 पीपीएम
लोह - 24.21 पीपीएम
मॅंगेनीज-2.44 पीपीएम

(जीवामृत वा शेणस्लरीत कोणत्या जनावराचे (वयानुसार व दुभते, देशी, गर्भार यानुसार) शेण वापरले त्यानुसार त्यातील घटकांचे प्रमाण बदलते.)
  • -मंदार मुंडले

 

---------------------------------------------------------------------------------------------

 

स्त्रोत: अग्रोवन- ऍग्रो स्पेशल

अंतिम सुधारित : 12/6/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate